दण्डी
सखे माझे परतोनि घरा येता । तुवा सजणे हा समाचार घेता ॥
तया शोके घायाळ ह्रदय होता । कसी होसिल ते आठवितो आता ॥५१॥
थोर होतील बाळ तुझे बाळे। तुला कामा येतील वेलहाळे ॥
माय माझी बैसेल शोकसाळे । मला आळविता ह्रदय तिचे पोळे ॥५२॥
मालिनी
सदय ह्रदय याचे भूप हा तापहारी ।
म्हणुनि परिसता मी होय येथे विहारी ॥
मजहि वध कराया पातकी पातला जो ।
वरुनि पति तसा ही भूमि कैसी न लाजो ॥५३॥
वसंततिलका
येणेपरी परिसता अति दीन वाचा । हेलावला नळ पयोधि दयारसाचा ॥
सोडी. वदे "विहर जा अथवा फिराया । राहे यथा निजमनोरथ हंसराया !" ॥५४॥
मालिनी
सुटुनि खग पळाला बैसला शालशाखे ।
क्षणभरि निजदेही मुक्तिविश्रांति चाखे ॥
स्वजन तव तयाचे भोवताले मिळाले ।
कवळीति निजबंधू बाष्पबिंदू गळाले ॥५॥
शिखरिणी
विसावा हे काही उडुनि लवलाही परतला ।
नृपाळाचे स्कंधी बसुनि मणिबंधी उतरला ॥
म्हणे हंस क्षोणीपतिस "तुज कोण्ही सम नसे ।
दयेचाही केवा तुजजवळि देवा बहु वसे ॥५६॥
दण्डी
ऐक राया तु थोर दयासिंधू । नीतिसुंदर तू, तूचि दीनबंधू ॥
निखंदूनी बोलिलो नको मंदू । सकल-वंदनीय पाय तुझे वंदू ॥५७॥
पारधीमाजी खगा मृगा राजे । करिति हिंसा जे ते बरीच साजे ॥
तुवा दिधली मज मोकळीक गा जे । दया केली हे कीर्ति तुझी गाजे ॥५८॥
हंस मिळणेस कठिण महीलोकी । सोनयाचा तो नवल हे विलोकी ॥
तशा मजलाही सोडिले तुवा की । तुझा ऐसा उपकार मी न झांकी ॥५९॥
तुझा करपंजर होय मला थारा । तुझा वचनौघ तोचि दुग्धचारा ॥
तुझे मानस बहु थोर गा उदरा । सत्यलोकेश तूचि गुणागारा ॥६०॥
किती रावे असतील तुझ्या धामी । किती कोकीळ सारिका तसा मी ॥
चित्त लागले हे तुझ्या लगामी । नृपस्वामी, मज योजि तुझ्या कामी ॥६१॥