दमयंती स्वयंवर - पृष्ठ ७

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वसंततिलका

हे पाखिरू मजहि येइल काय कामा । ऐसे, नृपा न वद पूरितलोककामा ॥

मोके उणे व्यजनही धरिता पुढारी । छाया करू तपनदीप्तिस ते निवारी ॥६२॥

द्रुतविलंबित

विरहिसा दिसतोसि महा नळा । तरि हरीन तुझ्या विरहानळा ॥

चतुर जे तरुणी ह्रदयंगमा । करवितो तिजसी तुज संगमा ॥६३॥

मालिनी

वरनृपति विराजे भीम हे नाम ज्याला ।

वर दमनऋषीने दीधला की तयाला ॥

वर सुत दमनामा, दांत नाम द्वितीया ।

वरतनु दमयंती नंदिनी ते तृतीया ॥६४॥

वसंततिलका

तेजोनिधीस तनया यमुना जसी ते । सीतेपरीच जनका जनका तसी ते ॥

जे आवडे सुतहि ते न तसे तयाला । ते नोवरी करवितो तुज मी दयाळा ॥६५॥

राया ! तिचे मुख सुधाकर या द्वयाला । नाहीच वेगळिक हे गमते मनाला ॥

संपूर्ण नित्य असता, नसता कलंकी । हा चंद्र हे मुख असे मग कोण शंकी? ॥६६॥

चांपेकळीपरिसही सरलत्व नाकी । तीचा धरी अधर विद्रुमभावना की ॥

भासे मनात मज बिंबफलभ्रमाने । हे सत्य चंचुपट वोढविले शुकाने ॥६७॥

जो जो घनस्तन भरू अवकाश देतो । तो तो तिचा उर भरीव दिसोनि ये तो ॥

जो जो दिसे उर भरीव तयासि तो तो । राया, उरोजमय रूप असे पहातो ॥६८॥

विस्तीर्ण वर्तुळ उदग्र कठोर भारी । वर्धिष्णु हे स्तन जिचे कनकानुकारी ॥

ज्याचे उरी उमटतील ठसे ययांचे । वानू किती सुकृतसंघ सख्या तयाचे ॥६९॥

नोहेच नाभि तरि काय सुरुंग आहे । रोमावळी गमतसे मज श्रृंखळा हे ॥

राया तिचे स्तन असे गड घ्यावया तो । राजा मनोभव उपाय जणो करितो ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP