दण्डी
'मूलि उपवर हे जाहली यियेला । पाहिजे की वर योग्य पाहिजेला' ॥
ऐसे ऐकोनी, वधूचिया बोला । सैंवराचा मग यत्न नृपे केला ॥१५१॥
नगर सारे श्रृंगारविले तैसे । भूमिभागी वैकुंठ दिसे जैसे ॥
लिखित पाठविले सकल नृपा कैसे । "तुम्ही यावे जी सैवरासि" ऐसे ॥१५२॥
निषधरायासी लिखित पाठवी तो । प्रतिद्वीपभूपत्सहि लिहीतो ॥
अशा यत्नी नृप लागला अहो तो । पुढे परिसा वृत्तांत कसा होतो ॥१५३॥
ऋषी नारद असता नभोविहारी । दिसे वैजयंत तया मनोहारी ॥
मणी रमणीय कनककलश भारी । सुरपतीचा जो सौध महा भारी ॥१५४॥
तया प्रासादी जाय ऋषी पाहे । सभा केली देवेंद्र बैसलाहे ॥
फार आदरिले तया देवराये । अर्घ्यपाद्यादिक करुनि विनतकाये ॥१५५॥
वसंततिलका
देवेंद्र देवऋषिला, मग बोलताहे । मंदार आजि फळला अथवा लता है ॥
माझ्या विलोचनसहस्त्रदळावलीला । देते विकास तव दर्शनसूर्यलीला ॥१५६॥
मालिनी
मखपरिणति माझी संपदा हे उदेली ।
तरि चुकुनि तुवा हे वांकडी वाट केली ॥
कलह तुज मिळेना सारिखा काय जाला ।
म्हणुनि सुरमुनींद्रा फावले यावयाला? ॥१५७॥
ऋषिवर मग बोले, "आजि पाताळलोकी ।
कलह करविला म्यां पाहता भाळलो की ॥
सकळ भुजग जेणे जुंझले येकयेकी ।
मजजवळि विचारू न्यायही येक ये की" ॥१५८॥
वसंततिलका
"माझे बहू किरणसंघ फणामणीचे" । ऐसे परस्परविवाद महाफणींचे ॥
मी जाहलो करविता निरखू तमासे । जेणे मदीय मन हे हरिखे विकासे ॥१५९॥
स्वागत
वेंघलो मग महीवर गा मी । हिंडलो कलहकौतुककामी ॥
नाढळे मज कलागति तेथे । पातलो तुज समीपहि येथे ॥१६०॥