दमयंती स्वयंवर - पृष्ठ १०

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


चूर्णिका

सकळभुवनललायमाना ॥ मानाधिक-विभव-धनिक-सदन-शत-विराजमाना ॥

कलशजनित-मुनि-चकित-पंच-जलधि-शरणायित-विस्तार-परिखान्तरीपायमाना ।

असमाना जीचे सौध-विमाना, गगन धराया स्तंभच माना । लाविति जे जलदा निज माना ।

वासवचाप जयास कमाना । ऐसी कुंडिन नामधेय नगरी राजहंसे पाहिजेसी पाहिजेली ॥९१॥

वसंततिलका

कोण्ही वणिग्जन विकू तुळिता तराजे । कस्तूरि जे तिजसवे अलिनी विराजे ॥

दोन्ही समान निरखी विकणार देतो । घेणार तो न समजोनि उगाच घेतो ॥९२॥

तेणे तसे नगर ते धरिता निडारी । तेथे विलासवन येक दिसे पुढारी ॥

जेथे सुशीतल महीतल सांद्र साई । जाईजुई फळमयी बहु आंबराई ॥९३॥

पद

तया वनि खेळे राजसुता ॥धृ०॥

खेळविता बहु मेळविला सखिमेळ तया सहिता ॥१॥

राजस ते द्विजराजमुखी गजराजगती ललिता ।

ध्यात तसे नळनाथ मनी रघुनाथकवींद्रनुता ॥२॥९४॥

वसंततिलका

तो मंडळाकृति फिरे उतरावयाला । भैमीमुखेंदुपरिवेश म्हणो तयाला ॥

तेथे महीवरि तसा खग बैसताहे । ते सुंदरी निजकुतूहल जेवि पाहे ॥९५॥

जो बैसता चंपळ पक्षपुटी धरेला । हाणितसे फडफडध्वनि ही उदेला ॥

पाहे तया खगवरासि वरानना हे । मानी मनी नवलही मग बोलताहे ॥९६॥

शिखरिणी

"असा पक्षी लक्षी बहु विहगलक्षी न मिळता ।

सुवर्णी जो वर्णी वद कवण वर्णी कवइता ॥

अगाई! हा बाई! चपळ वरि जाईल पळुनी ।

धरू जाते हाते हळुहळु तयाते न कळुनी" ॥९७॥

वसंततिलका

ऐसे वदे, मग तयास धरावया हे । ते होय हंसगमना; पहिलीच आहे ॥

वाजेच ना वलय, नूपुरनाद नोहे । तो तद्गतीस निरखोनि कसा न मोहे ? ॥९८॥

हे मंदमंदपद सुंदर कुंददंती । चाले जैसा मदधुरंधर इंद्रदती ॥

हंसा धरू जवळि जाय कृशोदरी ते । निष्कंपकंकणकरासि पुढे करीते ॥९९॥

द्रुतविलंबित

गवसलाच तसा खग भासला । तरि तदीय सखीजन हांसला ॥

मग सवेंच पिटाळुनि टाळिला । उडविलाचि; पिटाळुनि टाळिला ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP