एकद्वित्रिचतूस्पादो बहुपादस्तथापदः ।
बह्व्यः सन्ति पुरः सृष्टास्तासां मे पौरुषी प्रिया ॥२२॥
केलीं एकचरणी शरीरें । दोंपायांची अपारें ।
तींपायांचीं मनोहरें । अतिसुंदरें चतूष्पदें ॥४३॥
सर्पादि योनींच्या ठायीं । म्यां चरणचि केले नाहीं ।
एकें चालती बहुपायीं । केलीं पाहीं शरीरें ॥४४॥
ऐशीं शरीरें नेणो किती । म्यां निर्माण केलीं ये क्षितीं ।
मज कर्त्यातें नेणती । मूढमति यालागीं ॥४५॥
मज कर्त्याची प्राप्ती । होआवयालागीं निश्चितीं ।
स्वांशें प्रकाशोनि ज्ञानशक्ती । पौरुषी प्रकृति म्यां केली ॥४६॥
जेणें देहें मज पावती । त्या देहाची मज अतिप्रीति ।
यालागीं श्रुति नरदेह वर्णिती । देव वांछिती नरदेहा ॥४७॥
ऐशी नरदेहाची प्रीती । कृष्ण सांगे उद्धवाप्रती ।
येणें शरीरें मज पावती । नाना युक्तिविचारें ॥४८॥