अवधूतं द्विजं कञ्चिच्चरन्तमकुतोभयम् ।
कविं निरीक्ष्य तरुणं यदूः पप्रच्छ धर्मवित् ॥२५॥
कोणी एक अवधूतू । निजतेजें प्रकाशवंतू ।
ब्रह्मानंदें डुल्लतू । यदूनें येतू देखिला ॥५८॥
त्या अवधूताचें लक्षण । यदू निरीक्षी आपण ।
देखिलें ब्रह्मसूत्रधारण । होय ब्राह्मण ब्रह्मवेत्ता ॥५९॥
ऐसा तो अवधूतू । निर्भय निःशंक वर्ततू ।
यदू व्याहाळिये होता जातू । देखिला वनांतू सन्मुख ॥२६०॥
आंतूला प्राण तत्त्वतां । बाहेर रिघों नेदी सर्वथा ।
स्वभावें प्राणापानसमता । जाली न धरितां धारणा ॥६१॥
नवल तयाचें पाहणें । दृश्य दृश्यत्वें देखों नेणे ।
झाला सर्वांगें देखणें । देखणेंपणें पाहातसे ॥६२॥
मी एकु वनीं वसता । हेंही नाठवे त्याचिया चित्ता ।
झाली सर्वत्र सर्वगतता । समसाम्यता समत्वें ॥६३॥
कर्म कार्य कर्ता जाण । अवघा जाहला तो आपण ।
क्रियेनें वाहूनियां आण । निंबलोण जीवें केलें ॥६४॥
देहाचिया माथां । ठेविली होती अहंता ।
तें देहमिथ्यात्व पावतां । समूळ अहंता पळाली ॥६५॥
नित्यानित्य होमद्वारें । ब्रह्माग्नि प्रज्वळला एकसरें ।
जाळूनि आश्रमांची चारी घरें । केलें खरें निराश्रमी ॥६६॥
त्या आश्रमामाजीं होती । शास्त्रश्रवणविधिवादपोथी ।
ते जळाली जी निश्चितीं । भस्म हातीं न लगेचि ॥६७॥
विधिनिषेधपैजा । जळाली पंचायतनदेवपूजा ।
होता संचितक्रियमाणपुंजा । तोही वोजा जळाला ॥६८॥
यापरी तो अवधूतू । ब्रह्मानंदें जी डुल्लतू ।
निजसुखें वेल्हावतू । देखिला येतू यदूरायें ॥६९॥
संकल्पविकल्परहित । शुद्ध सर्वांगी विभूत ।
यालागीं बोलिजे अवधूत । येर्हवीं विख्यात ब्राह्मणू ॥२७०॥
सभोंवता समस्तू । प्रपंच निजबोधें असे धूतू ।
यालागीं बोलिजे अवधूतू । येर्हवीं विख्यातू ब्राह्मणू ॥७१॥
अहं धूईव तो अवधूतू । तोचि योगी तोचि पुनीतू ।
जो का अहंकारग्रस्तू । तोचि पतितू जन्मकर्मी ॥७२॥
वार्धक्य यावें देहासी । तंव देहपण नाहीं देहापासीं ।
रिगमु नव्हेच जरेसी । तारुण्यासी तें मूळ ॥७३॥
आणिकही त्याचीं लक्षणें । नीच नवा बोधू मैळों नेणें ।
भोगिजे नित्य नूतनपणें । परम तारुण्यें टवटवला ॥७४॥
निजबोधाचिया सत्ता । द्वैत जिंतिलें तत्त्वतां ।
ऐसा निःशंकु विचरतां । भय सर्वथा त्या नाहीं ॥७५॥
ऐशीं लक्षणें निर्धारितां । अवधूत निजबोधें पुरता ।
यदूसी उपजली विनीतता । श्रद्धा सर्वथा अनिवार ॥७६॥
करूनि साष्टांग दंडवत । अति नम्र श्रद्धायुक्त ।
हात जोडूनि पुसत । प्रसन्न चित्त रायाचें ॥७७॥