मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक २ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


परस्वभावकर्माणि, यः प्रशंसति निन्दति ।

स आशु भ्रश्यते स्वार्थादसत्यभिनिवेशतः ॥२॥

मी एक सर्वज्ञाता पूर्ण । ऐसा धरोनि ज्ञानाभिमान ।

जगाचे देखे दोषगुण । निंदी ब्राह्मण मुख्यत्वें ॥५६॥

पराचें स्वाभाविक कर्म । स्वयें निंदणें हा अधर्म ।

हनुमंत ज्ञाता परम । त्यास वानरी कर्म सोडीना ॥५७॥

नारद ज्ञातेपणें मोठा । सत्य मानला श्रेष्ठश्रेष्ठां ।

तोही कळिलावा कळिकांटा । स्वभावचेष्टा अनिवार ॥५८॥

गरुड देवाचें वाहन । सदा तिष्ठे हात जोडून ।

तोही करी सर्पभक्षण । ऐसें कर्म जाण स्वाभाविक ॥५९॥

विचारतां जग त्रिगुण । गुणानुसारें कर्माचरण ।

तेथ पाहतां दोषगुण । दोषी जाण पाहे तो ॥६०॥

जगीं पहावी एकात्मता । हे ब्रह्मस्थिति गा सर्वथा ।

सांडूनि, गुणदोष पाहतां । तो निजात्मघाता प्रवर्ते ॥६१॥

स्वभावें भेटल्या सज्जन । शोधूनि पाहे दोषगुण ।

यापरी ज्ञानाभिमान । निंदास्तवन उपजवी ॥६२॥

अभिमानाची जाती कैशी । अधिक खवळे सज्ञानापाशीं ।

तो दाखवी गुणदोषांसी । निंदास्तवनासी उपजवी ॥६३॥

आपुले वृत्तीसी जो समान । त्याचें अळुमाळ करी स्तवन ।

न मने आपणासी ज्याचा गुण । त्यासी निंदी आपण यथेष्ट ॥६४॥

निंदास्तुति उपजे जेथ । मेद क्षोभला उठे तेथ ।

निःशेष निर्दाळी परमार्थ । महा अनर्थ अंगीं वाजे ॥६५॥

निंदेपाठीं अनर्थ । उधार लागों नेदी तेथ ।

रोकडा अंगीं आदळत । निजस्वार्थघातक ॥६६॥

भेद समूळ मिथ्या येथ । येचि अर्थींचा स्वप्नदृष्टांत ।

स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । दृढ परमार्थ साधावया ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP