मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ज्ञानं विवेको निगमस्तपश्च, प्रत्यक्षमैतिह्यमथानुमानम् ।

आद्यन्तयोरस्य यदेव केवलं, कालश्च हेतुश्च तदेव मध्ये ॥१८॥

नित्यानित्यविवेक । या नांव ’ज्ञान’ चोख ।

देहद्वयाचा प्रकाशक । आत्मा सम्यक जाणती ज्ञाते ॥२१॥

सेवावया स्वादरस-नव्हाळी । प्रथम उंसाचीं पानें साळी ।

मग ऊंस तोही बळें पिळी । तोही रस आळी तैं शर्करा लाभे॥२२॥

तेही शर्करा परिपाकबळें । तैं साखरचि केवळें ।

केळें आणि नारेळें । करिती नाना फळें मूळींच्या गोडया ॥२३॥

तेवीं स्थूळाचें निराकरण । लिंगदेहाचें उपमर्दन ।

अहंकाराचें निर्दळण । करुनि पूर्ण ब्रह्म पावती ज्ञाते ॥२४॥

तें ब्रह्म निर्गुण निराकार । तद्रूपें देखती चराचर ।

यापरी विवेकचतुर । वस्तूचा निर्धार जाणती ॥२५॥

यापरी गा विचक्षण । जाणती वस्तूचें लक्षण ।

या नांव पैं ’विवेकज्ञान’ । उद्धवा जाण निश्चित ॥२६॥

वस्तु निःशब्द निर्गुण । तेथ जें श्रुतीचें स्फुरण ।

इत्थंभूत शब्दज्ञान । वेद तो जाण निगम माझा ॥२७॥

तो मी वेदरुप नारायण । यालागीं वेदवचन प्रमाण ।

श्रुत्यर्थ शब्दज्ञान । करी पावन पाठकां ॥२८॥;

जाणावया निजात्मस्वरुप । देहादि विषयांचा अनुताप ।

जेणें साधक होती निष्पाप । या नांव ’तप’ उद्धवा ॥२९॥

अनुतापें दमितां मन । होय पापाचें क्षालन ।

तेव्हां श्रुत्यर्थें आपण । कल्पी ’अनुमान’ वस्तूचें ॥२३०॥

देह जड मूढ अचेतन । तेथ चेतनात्मक नारायण ।

देहाचें मानूनि मिथ्यापण । अद्वैंतीं मन मुसावे ॥३१॥

तें अद्वैतप्राप्तीचें लक्षण । अनन्यभावें आपण ।

सद्गुरुसी रिघावें शरण । निरभिमान भावार्थें ॥३२॥

सद्भावें अनन्यशरण । तो गुरुकृपा पावे आपण ।

पाहोनि अधिकारलक्षण । गुरु गुह्यज्ञान उपदेशी ॥३३॥

’सर्वहि निष्टंक परब्रह्म’ । हें श्रुतिगुह्य उत्तमोत्तम ।

एथ भाग्यें जो सभाग्य परम । त्यासचि सुगम ठसावे ॥३४॥

गुरुवचन पडतां कानीं । वृत्ति निजात्मसमाधानीं ।

विनटोनि ठेली चिद्धनीं । सुखसामाधानीं स्वानंदें ॥३५॥

तयासी पुढतीं साधन । अथवा कर्माचें कर्माचरण ।

तेथ बोलों शके कोण । वेदीं मौन घेतलें ॥३६॥

जेथ द्वंद्वाची निमाली स्फूर्ती । सकळ दुःखांची समाप्ती ।

देहीं विदेहवस्तुप्राप्ती । ’प्रत्यक्ष’ म्हणती या नांव ॥३७॥

पुसूनियां विसराचा ठावो । आठवेंवीण नित्य आठवो ।

अखंड स्वरुपानुभवो । ’प्रत्यक्ष’ पहा हो या नांव ॥३८॥

मी आत्मा स्वानंदकंद । ऐसा अखंडत्वें परमानंद ।

’प्रत्यक्ष’ पदाचा हा निजबोध । स्वयें गोविंद बोलिला ॥३९॥

हाचि बोध सभाग्याकडे । श्रवणमात्रें त्या आतुडे ।

एका मननें जोडे । एका सांपडे निदिध्यासें ॥२४०॥

एकासी तो प्रत्यगावृत्तीं । हा बोध ठसावे चित्तीं ।

एका माझिया अद्वैतभक्तीं । मी सगळा श्रीपति आतुडें ॥४१॥

निजबोध साधावया पूर्ण । उद्धवा हें तों मुख्य साधन ।;

एवं साधलिया निजज्ञान । फळ कोण तें ऐक ॥४२॥

जो मी सृष्टिआदि अनंतु । नित्यमुक्तत्वें अहेतु ।

तो मी भवमूळा मूळ हेतु । सृष्टिसृजिता अच्युतु स्वलीला ॥४३॥

तेथ रजोगुणाचिये स्थिती । स्त्रष्टृरुपें मीचि पुढतीं ।

अद्वैतीं दावीं अनेक व्यक्ती । सृष्टीउत्पत्तिकर्ता तो मी ॥४४॥

जैसें मूळेंविण सफळ झाड । वाढविलें निजांगीं गोड ।

तेवीं सृष्टिसंरक्षणीं कोड । मज निचाडा चाड प्रतिपालनीं ॥४५॥

बुद्धिबळें एका काष्ठाचे पोटीं । तेथ राजा प्रधान पशु प्यादा उठी ।

त्यांसी पूर्वकर्म नाहीं गांठीं । तेवीं निष्कर्में सृष्टीप्रकाशिता तो मी ॥४६॥

निष्कर्में जग समस्त । सृजिता मीमांसकमत ।

ठकोनि ठेलें निश्चित । जग सदोदित निष्कर्मब्रह्म ॥४७॥

जेवीं बुद्धिबळांचा खेळ । अचेतनीं युद्ध प्रबळ ।

तेवीं लोकरक्षणीं कळवळ । सृष्टिप्रतिपाळ मी कर्ता ॥४८॥

प्रकृतीच्या जडमूढ सारी । पुरुषाचेनि सचेतन निर्धारीं ।

काळफांसे घेऊनि करीं । खेळविता चराचरीं मी एक विष्णु ॥४९॥

तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।

एका जैत एक हारी । उभयपक्षांतरीं खेळविता मी ॥२५०॥

सोंगटीं निमालियापाठीं । कवण पुण्यात्मा चढे वैकुंठीं ।

कोण पडे नरकसंकटीं । तैसा जाण सृष्टीं बंधमोक्ष ॥५१॥

तेवीं न मोडतां एकलेपण । त्या खेळाच्या ऐसें जाण ।

जगाचें करीं मी पालन । दुजेंपण नातळतां ॥५२॥

दोराचा सर्पाकार । सबळ बळें मारी वीर ।

तैसा सृष्टीसी संहार । मी प्रळयरुद्र पैं कर्ता ॥५३॥

स्वप्नीं भासलें जग संपूर्ण । तेथूनि जागा होतां आपण ।

स्वप्न निर्दळितां कष्ट कोण । तैसा मी जाण प्रळयकर्ता ॥५४॥

सृष्टीसी उत्पत्ति स्थिति निदान । आत्मा आत्मत्वें अखंड पूर्ण ।

तेंचि स्वरुप सज्ञान । स्वानुभावें आपण होऊनि ठेलें ॥५५॥

तें निजरुप झालों म्हणणें । हेंही बोलणें लाजिरवाणें ।

तें स्वयंभ असतां ब्रह्मपणें । होणें न होणें भ्रममात्र ॥५६॥

मिथ्या दोराचा सर्पाकार । भासतां तो असे दोर ।

निवर्तल्या सर्पभरभार । दोर तो दोर दोररुपें ॥५७॥

तेवीं सृष्टीसी उत्पत्ति होतां । आत्मा जन्मेना तत्त्वतां ।

सृष्टीचा प्रतिपाळकर्ता । आत्मा सर्वथा वाढेना ॥५८॥

सृष्टीसी महाप्रळय होतां । आत्मा नायके प्रळवार्ता ।

उत्पत्तिस्थितिनिदानता । आत्मा तत्त्वतां अविकारी ॥५९॥

एवं साधनीं साधूनि ज्ञान । साधक झाले सज्ञान ।

तें अबाधित ब्रह्म पूर्ण । स्वयें आपण होऊनि ठेले ॥२६०॥

अज अव्यय स्वानंदघन । साधक झाले ब्रह्म पूर्ण ।

हें ज्ञानाचें फळ संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥६१॥

हें ज्ञानफळ आलिया हाता । उत्पत्ति स्थिति प्रळय होतां ।

अखंड परिपूर्ण निजात्मता । ते सदृष्टांता हरि सांगे ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP