प्रत्यक्षेणानुमानेन, निगमेनात्मसंविदा ।
आद्यन्तवदसज्ज्ञात्वा, निःसङगो विचरेदिह ॥९॥
जे जन्मोनि नाशवंत । ते सर्वही जाण असंत ।
आसक्ति सांडोनियां तेथ । उदास विरक्त वर्तावें ॥१३॥
सटवल्याचें बारसें । कोणी न करिती उल्हासें ।
नश्वर देह वाढतां तैसें । मूर्ख मानसें सुखावती ॥१४॥
उत्पत्तिविनाशलक्षण । त्याचें देव सांगतो प्रमाण ।
नित्य भूतांचें जन्ममरण । देखिजे आपण ’प्रत्यक्ष’ ॥१५॥
’अनुमान’ करितां साचार । जें जें देखिजे साकार ।
मेरुपृथ्व्यादि आकार । होती नश्वर प्रळयांतीं ॥१६॥
येचि अर्थी वेदोक्ती । नाशवंत अष्टधा प्रकृती ।
जीवभाव नासे गा प्रांतीं । गर्जती श्रती येणें अर्थें ॥१७॥
एथ आपुलाही अनुभव असे । जड विकारी तें तें नासे ।
हें कळत असे गा आपैसें । जग अनायासें नश्वर ॥१८॥
वडील निमाले देखती । पुत्रपौत्र स्वयें संस्कारिती ।
तरी स्वमृत्यूची चिंता न करिती । पडली भ्रांती देहलोभें ॥१९॥
पुत्र पितरां पिंडदान देती । उत्तम गति त्यांची चिंतिती ।
आपुली गति न विचारिती । नश्वर आसक्ती देहलोभें ॥१२०॥;
आत्मा केवल प्रकाशघन । प्रपंच जड मूढ अज्ञान ।
हें ऐकोनि उद्धवें आपण । देवासी प्रश्न पूसतु ॥२१॥