मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


योगचर्यामिमां योगी विचरन् मद्वयपाश्रयः ।

नान्तरायैर्विहन्येत निस्पृहः स्वसुखानुभूः ॥४४॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे

श्रीकृष्णोद्धवसंवादे अष्टाविंशोऽध्यायः ॥२८॥

अनन्यप्रीतीं मज शरण । सर्वभूतीं मद्भावन ।

अभेदबुद्धीं माझें भजन । त्यासी सर्वथा विघ्न बाधीना ॥७४॥

माझ्या भक्ताचे उपसर्ग । सकळ निर्दळीं मी श्रीरंग ।

ज्यासी अनन्य भजनयोग । त्यासी माझें निजांग वस्तीसी ॥७५॥

जेथ विघ्न धांवे भक्तांकडे । तेथ तत्काळ माझी उडी पडे ।

निवारीं निजभक्तांचें सांकडें । तीं लळिवाडें पैं माझीं ॥७६॥

तीं लळिवाडें म्हणशी कैसीं । त्यांचें सांकडें मी सदा सोशीं ।

राजा दंडितां प्रल्हादासी । म्यां सर्वथा त्यासी रक्षिलें ॥७७॥

संकट मांडिलें अंबरीषासी । तैं म्यां अपमानिलें दुर्वासासीं ।

दाही गर्भवास मी स्वयें सोशीं । उणें भक्तांसी येऊं नेदीं ॥७८॥

बाधा होतां गजेंद्रासी । म्यां हातीं वसवूनि सुदर्शनासी ।

उडी घालूनि त्यापाशीं । निमिषार्धेंसीं सोडविला ॥७९॥

द्रौपदीचिये अतिसांकडीं । सभेसी करितां ते उघडी ।

म्यां निजांगें घालूनि उडी । वस्त्रांच्या कोडी पुरविल्या ॥६८०॥

द्रौपदीचिया हातीं देतां घडी । नेसतां नेसतां दिसेल ते उघडी ।

यालागीं मी लवडसवडीं । नेसतीं लुगडीं स्वयें झालों ॥८१॥

दावाग्नीं पीडितां गोपाळ । निजमुखीं म्यां गिळिली ज्वाळ ।

एथवरी भक्तांची कळवळ। मज सर्वकाळ उद्धवा ॥८२॥

द्रौण्यस्त्राचे बाधेहातीं । म्यां गर्भीं रक्षिला परीक्षिती ।

गोकुळ पीडितां सुरपती । म्यां धरिला हातीं गोवर्धन ॥८३॥

वांचवावया अर्जुनासी । दिवसा लपविलें सूर्यासी ।

हारी पतकरुनि रणभूमीसी । सत्य भीष्मासी म्यां केलें ॥८४॥

ऐसा मी भक्तसहाकारी । नित्य असतां शिरावरी ।

भक्तांसी विघ्न कोण करी । मी श्रीहरि रक्षिता ॥८५॥

जे अनुसरले मद्भक्तीसी । मी विघ्न लागों नेदीं त्या भक्तांसी ।

निजांग अर्पोनियां त्यांसी । निजीं निजसुखेंसीं नांदवीं ॥८६॥

भावें करितां माझी भक्ती । साधकां स्वसुखाची प्राप्ती ।

तेथें इच्छेंसीं कामलोभ जाती । माझी सुखस्थिति मद्भक्तां ॥८७॥

म्हणसी भक्तांसी देहांतीं । होईल निजसुखाची प्राप्ती ।

तैशी नव्हे चौथी भक्ती । देहीं वर्तती स्थिति सुखरुप ॥८८॥

देह राहो अथवा जावो । परी सुखासी नाहीं अभावो ।

यापरी मद्भक्त पहा हो । सुखें सुखनिर्वाहो भोगिती ॥८९॥

भक्त वर्ततां दिसती दही । परी ते वर्तती माझ्या ठायीं ।

मी अवघाचि त्यांच्या हृदयीं । सर्वदा पाहीं नांदत ॥६९०॥

भक्त निजबोधें मजभीतरी । मी निजांगें त्यां आंतबाहेरी ।

एवं निजसुखाच्या माजघरीं । परस्परीं नांदत ॥९१॥

मी देव तो एक भक्त । हेही बाहेरसवडी मात ।

विचारितां आंतवुटा अर्थ । मी आणि भक्त एकचि ॥९२॥

तूप थिजलें विघुरलें देख । तेवीं मी आणि भक्त दोनी एक ।

मज भक्तासी वेगळिक । कल्पांतीं देख असेना ॥९३॥

मी तो एकचि एथें । हेंही म्हणावया नाहीं म्हणतें ।

यापरी मिळोनि मातें । भक्त निजसुखातें पावले ॥९४॥

तो हा ब्रह्मज्ञानाचा कळसु । अध्याय जाण अठ्ठाविसु ।

बाप विंदानी हृषीकेशु । तेणें देउळासी कळसु मेळविला ॥९५॥

जेवीं अळंकारीं मुकुटमणी । तेवीं अठ्ठाविसावा ब्रह्मज्ञानीं ।

श्रीकृष्ण भक्तांची निजजननी । तो उद्धवालागोनी शृंगारी ॥९६॥

माता उत्तम अलंकारकोडीं । अपत्य शृंगारी अतिआवडीं ।

तेवीं उत्तमोत्तम ज्ञाननिरवडीं । उद्धव कडोविकडीं शृंगारिला ॥९७॥

मातेसी आवडे निपटणें । तेवीं उद्धव वृद्धपणींचें तानें ।

श्रीकृष्ण त्याकारणें । गुहज्ञानें शृंगारी ॥९८॥

माता बाळकातें शृंगारी । तें लेणें मागुतें उतरी ।

उद्धव शृंगारिला श्रीहरी । तें अंगाबाहेरी निघेना ॥९९॥

अंगीं लेणें जडलें अलोलिक । तेणें उद्धव झाला अमोलिक ।

पायां लागती तिनी लोक । ब्रह्मादिक पूजिती ॥७००॥

निजात्मअळंकारें श्रीपती । उद्धव शृंगारिला ब्रह्मस्थितीं ।

तेणें वंद्य झाला त्रिजगतीं । त्यातें पुराणीं पढती महाकवी ॥१॥

गोडीमाजीं श्रेष्ठ अमृत । तेंही फिकें करुनि एथ ।

उद्धवालागीं परमामृत । श्रीकृष्णें निश्चित पाजिलें ॥२॥

अमर अमृतपान करिती । तेही मरणार्णवीं बुडती ।

उद्धव अक्षयी केला श्रीपती । कथामृतीं निववूनि ॥३॥

तेणें तो सर्वांगीं निवाला । परमानंदीं तृप्त झाला ।

तेणें उद्धवत्वा विसरला । डोलों लागला स्वानंदें ॥४॥

तेव्हां स्वानंदउन्मत्तता । दुजें निर्दळी देखतां ।

संसार हाणोनि लाता । चढे माथा देवांच्या ॥५॥

चढोनि देवांचिया माथां । शेखीं गिळी देवभक्तता ।

मम सच्चिदानंदस्वानंदता । निजात्मता स्वयें झाला ॥६॥

तेथ सत्‌-चित्‌-आनंद । हाही नाहीं त्रिविध भेद ।

सदोदित परमानंद । स्वानंद शुद्ध कोंदला ॥७॥

नश्वर त्यागाचिये स्थिती । अनश्वरातें ’संत’ म्हणती ।

जडाचि करितां निवृत्ति । ’चिद्रूप’ म्हणती वस्तूतें ॥८॥

जेथ दुःखाचा नाहीं बाधु । त्यातें म्हणती ’आनंदु’ ।

एवं सच्चिदानंद शब्दु । ज्ञानसंबंधु मायिक ॥९॥

वस्तु संत ना असंत । चित्‌ नव्हे अचित्‌ ।

ते सुखदुःखातीत । जाण निश्चित सन्मात्र ॥७१०॥

हा अठ्ठाविशींचा निजबोध । उद्धवासी तुष्टोनि गोविंद ।

देता झाला स्वानंदकंद । भाग्यें अगाध तो एक ॥११॥

सांडोनि निजधामा जाणें । स्वयें श्रीकृष्ण ज्याकारणें ।

देता झाला निजगुह्य ठेवणें । त्याचें भाग्य वानणें तें किती ॥१२॥

जें नेदीच पित्या वसुदेवासी । जें नेदीच बंधु बळभद्रासी ।

जें नेदीच पुत्रा प्रद्युम्नासी । तें उद्धवासी दीधलें ॥१३॥

जें नेदीच देवकीमातेसी । जें नेदीच कुंती आतेसी ।

शेखीं नेदीच यशोदेसी । तें उद्धवासी दीधलें ॥१४॥

म्हणाल सांगितलें अर्जुनासी । तोही अत्यंत पढियंता त्यासी ।

त्याहातीं उतरावया धराभारासी । युद्धीं त्वरेंसीं उपदेशिला ॥१५॥

तैसें नव्हे उद्धवाकडे । सावकाश निजनिवाडें ।

गुप्त ठेवणें फाडोवाडें । अवघें त्यापुढें अर्पिलें ॥१६॥

पित्याचिया निजधनासी । स्वामित्व लाभे निजपुत्रासी ।

तेवीं श्रीकृष्णाचिया गुह्यज्ञानासी । झाला मिराशी उद्धव ॥१७॥

पांडवांमाजीं धन्य अर्जुन । यादवांमाजीं उद्धव धन्य ।

या दोघांच्या भाग्यासमान । न दिसे आन त्रिजगतीं ॥१८॥

सकळ साराचा निजसारांश । तो हा एकादशीं अठ्ठावीस ।

जेवीं यतींमाजीं परमहंस । तेवीं अष्टाविंश भागवतीं ॥१९॥

जेवीं क्षीराब्धीमाजीं शेषशयन । त्यावरी जैसा नारायण ।

तेवीं भागवतामाजीं जाण । ब्रह्मपरिपूर्ण अष्टाविंश ॥७२०॥

जेवीं वैकुंठ परम पावन । त्यावरी विराजे श्रीभगवना ।

तेवीं भागवतामाजीं जाण । विराजमान अष्टाविंश ॥२१॥

एवढया महत्त्वाचें वैभव । कृष्णकृपेनें पावला उद्धव ।

बाप निजभाग्याची धांव । ब्रह्म स्वयमेव स्वयें झाला ॥२२॥

उद्धव झाला ब्रह्मपूर्ण । त्यासी कृष्णकृपा प्रमाण ।

तें मी वाखाणीं अज्ञान । देशभाषेनें प्राकृत ॥२३॥

अंधासी सूर्य प्रसन्न । झालिया देखे तो निधान ।

तेवीं प्रकटोनि जनार्दन । हें गुह्यज्ञान बोलवी ॥२४॥

जनार्दन प्रकटला आतां । हें बोलणें माझी मूर्खता ।

तो स्वतःसिद्ध सदा असतां । हेंही झालों मी जाणता त्याचिया कृपा ॥२५॥

त्याचिया कृपें ऐसें केलें । माझें मीपण निःशेष नेलें ।

नेलेंपण देखों नाहीं दीधलें । जेवीं सूर्यें केलें अंधारा ॥२६॥

मज कृपा करील जनार्दन । हेंही नेणें मी अज्ञान ।

तेणें दयाळुवें कृपा करुन । हें गुह्यज्ञान बोलविलें ॥२७॥

निकट असतां जनार्दन । मी नेणें त्याचें महिमान ।

तेणें आपला महिमा आपण । मज मुखें जाण बोलविला ॥२८॥

मी जें म्हणे माझें मुख । तेंही जनार्दन झाला देख ।

तेणें मुखें निजात्मसुख । बोलवी निष्टंक निजात्मसत्ता ॥२९॥

एवं माझेनि नांवें कविता । परी जनार्दनचि झाला वक्ता ।

तेणें वक्तेपणें तत्त्वतां । रसाळ कथा चालविली ॥७३०॥

ब्रह्मरसें रसाळ कथा । निरुपिलें श्रीभागवता ।

त्यामाजीं ब्रह्मतल्लीनता । जाण तत्त्वतां अष्टाविंश ॥३१॥

अठ्ठाविसाव्याचें निरुपण । तें तत्त्वतां ब्रह्म परिपूर्ण ।

श्रद्धेनें करितां श्रवण । उद्धव संपूर्ण निवाला ॥३२॥

उद्धव निवोनियां आपण । स्वयें विचारिता झाला जाण ।

म्हणे हें शुद्ध आत्मज्ञान । परी प्राप्ति कठिण अबळांसी ॥३३॥

या चित्स्वरुपाची प्राप्ती । सुगम होय साधकांप्रती ।

पुढील अध्यायीं येचि अर्थीं । उद्धव विनंती करील ॥३४॥

कडा फोडोनि मार्ग कीजे । कां उंचीं फरस बांधिजे ।

तेवीं सुगमें निर्गुण पाविजे । तो उपाव पुसिजे उद्धवें ॥३५॥

ब्रह्मप्राप्तीचा सुगम उपावो । स्वयें सांगेल देवाधिदेवो ।

तो सुरस पुढील अध्यावो । साधकां पहा हो परमार्थसिद्धि ॥३६॥

पव्हणियापरिस पायउतारा । अबळीं उतरिजे भवसागरा ।

तैसा साधकांलागीं सोपारा । उपाव पुढारा हरि सांगे ॥३७॥

सीतेचेनि कृपा पडिभारें । सेतु बांधिजे रामचंद्रें ।

तेथ समुद्र तरतीं वानरें । जीं वनचरें अतिमंदें ॥३८॥

तेवीं उद्धवप्रश्नप्रीतीसीं । भवाब्धिसेतु हृषीकेशीं ।

बांधिला निजभक्तिउपायेंसीं । तेथ तरती आपैसीं भाविकें अबळें ॥३९॥

कृष्णभक्तिसेतुद्वारें । तरलीं जड मूढ पामरें ।

ते भक्ती सांगिजेल यादवेंद्रें । श्रोतां सादरें परिसावी ॥७४०॥

एका जनार्दना शरण । तेणें श्रोते सुप्रसन्न ।

पुढील अध्यायाचें कथन । तेणें साधक जन तरतील ॥४१॥

सांडूनियां एकपण । एका जनार्दना शरण ।

सुगम साधे आत्मज्ञान । तें भक्तिसाधन हरि सांगे ॥७४२॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसंवादे

परमहंससंहितायां एकाकारटीकायां ’परमार्थनिर्णयो’ नाम अष्टाविंशतितमोऽध्यायः ॥२८॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

ॐ तत्सत्-श्रीकृष्णार्पणमस्तु

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP