मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीभगवानुवाच -

यावद्देहेन्द्रियप्राणैरात्मनः सन्निकर्षणम् ।

संसारः फलवांस्तावदपार्थोऽप्यविवेकिनः ॥१२॥

जो वर्णाश्रमांहीपरता । जो बंधमोक्षां अलिप्तता ।

जो देहद्वंद्वा नातळता । तो उद्धवहितार्था हरि बोले ॥४९॥

मी कृश स्थूळ गौर श्याम । हे देहाचे ’देहधर्म’ ।

मी काणा मुका बहिरा परम । हे ’इंद्रियधर्म’ इंद्रियांचे ॥१५०॥

क्षुधातृषादि अनुक्रम । हा प्राणांचा ’प्राणधर्म’ ।

कामक्रोधलोभादि संभ्रम । हा ’मनोधर्म’ मनाचा ॥५१॥

सत्त्वगुणाची ’जागृती’ । रजोगुणें ’स्वप्नस्फूर्ती’ ।

तमोगुणें जाडय ’सुषुप्ती’ । जाण निश्चितीं देहयोगें ॥५२॥

देहासी येतां मरण । ’मी मेलों’ म्हणे तो आपण ।

देहासी जन्म होतां जाण । जन्मलेंपण स्वयें मानीं ॥५३॥

इंद्रियें विषयो सेविती । ते म्यां सेविले मानी निश्चितीं ।

स्वर्गनरकभोगप्राप्ती । सत्य मानिती देहात्मता ॥५४॥

अन्न आकांक्षी प्राण । त्यातें भक्षी हुताशन ।

तत्साक्षी चिदात्मा आपण । म्हणे म्यां अन्न भक्षिलें ॥५५॥

हे अवघे माझे धर्म । ऐसा आत्म्यासी जंव दृढ भ्रम ।

तंव मिथ्याचि अतिदुर्गम । संसार विषम भ्रमें भोगी ॥५६॥

त्या भोगाचें फळ गहन । अविश्रम जन्ममरण ।

स्वर्गनरक पापपुण्य । भ्रमें आपण सत्य मानी ॥५७॥

संसार मूळीं निमूळ । तोही भ्रमफळें सदाफळ ।

जो कां अविवेक्यां अतिप्रबळ । सर्वकाळ फळलासे ॥५८॥

जेथ सत्य अर्थ नाहीं । तो ’अनर्थ’ म्हणिजे पाहीं ।

त्याचा फळभोग तोही । बाळबागुलन्यायीं भोगावा ॥५९॥

॥आशंका॥ ’गगनकमळांची माळा । जैं वंध्यापुत्र घाली गळां ।

तैं संसारभोगाचा सोहळा । आत्म्याच्या जवळां देखिजे ॥१६०॥

ऐसें न घडतें केवीं घडे’ । तेचि अर्थींचें वाडेंकोडें ।

श्रीकृष्ण उद्धवापुढें । निजनिवाडें सांगत ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP