|
स्त्री. एकसारखें न थांबता रडणें किंवा अशा रडण्याची क्रिया . ( क्रि० घेणें , लावणें , लागणें , चालणें , खळणें , राहणें , आटोपणें ). या मुलाला सकाळपासून रड लागली आहे . तक्रार ; पिंरपिर . ( क्रि० लावणें ; चालविणें ). [ रडणें ] सामाशब्द - ०कथा कहाणी - स्त्री . लांबलचक करुणास्पद कहाणी ; दुःखाची गोष्ट ; विपत्तीची कंटाळवाणी हकीकत ; ( क्रि० सांगणें ; गाणें ). ०गाणें न. करुणास्पद कहाणी , गोष्ट , तक्रार इ० ; रडकथा ; दुःखाची गोष्ट . ०गात्या वि. सदा आपल्या दुःखाच्या रडकथा , गार्हाणीं सांगणारा . [ रडणें आणि गाणें ] ०गार्हाणें न. रडकथा ; रडगाणें ; शोकमय कथा . ( क्रि० सांगणें ; गाणें ) ०गेला वि. रडकथा , रडगाणें सांगण्याची प्रवृत्ति असलेला . [ रडका ] ०तोंड्या वि. ज्याचा सर्वकाल रडण्याचा स्वभाव आहे असा ; मेषपात्र ; दुर्मुखलेला ; नेहमीं रडगाणें कुरकुर करणारा , सांगणारा . [ रडणें + तोंड ] ०पंचक न. नेहमींचें रडगाणें अगर रडकथा , ( प्रपंचांतील ओढाताण व दुःख यामुळें ) ( क्रि० गाणें , सांगणें , वाचणें , लावणें , मांडणें ). रडारड स्त्री . कोणी गेला , मेला इ० कारणानें मोठें दुःख झालें असतां कोणेकांनीं रडूं लागावें असा जो व्यापार चालतो ती ; ( सामा . ) रडणें ; शोक करणें ; अनेकांनीं एकदम रडणें . [ रडणें ] रडारोई , रडारोवी स्त्री . मोठा शोक व रडणें ; छाती , ऊर बडवून रडणें ; मोठा आक्रोश ; आरडा ओरड . काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी । - तुगा १५८२ . [ म . रडणें ; हिं . रोना = रडणें ] रडुरडु , रडूरडू नस्त्री . रडण्याची पिरपीर . - क्रिवि . नेहमीं रडत रडत ; मुळमुळीत संमतीनें ; दीनवाणीपणानें . ( क्रि० करणें , लावणें , मांडणें ). रडू , रडें न . रडण्याची क्रिया . रडण्याचा आवेश . ( क्रि० कोसळणें ). शोक , भय , दुःख , प्रेम , हर्ष इ० कारणांनीं अंतःकरण शिथिल होऊन डोळ्यांत अश्रू येणें , तोंड पसरणें कंठध्वनि निघणें इ० विकारविशेष उत्पन्न होणें ; रडणें ; रुदन . ( क्रि० येणें ). देखे मडें येई रडें . [ रडणें ] रड्या - वि . सर्वकाल रडण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा ; सर्वदा रडणारा ; उत्साहहीन ; मंदगतीनें चालणारा ; रडतराऊत ; रडतोंड्या ; दुर्मुखलेला . ( ल . ) चालण्यास , कामास मंद असा ( बैल इ० ). हरसबबी ( इसम ). [ रडणें ] रडका - वि . सदा रडत असणारें ( मूल ); रडण्याची अगर चिरचिरण्याची संवय असलेला ; नेहमीं तक्रार करणारा ; गार्हाणें सांगणारा . दुःखी ; कष्टी ; मंद ; निराश ; निरुत्साही ( चेहेर्याचा अगर बोलणारा ). ज्याचे हातून कोणतेंच काम चांगलें होत नाहीं , तडीस जात नाहीं असा . रडतांना होतो तसा ( आवाज , चर्या ). ज्याचा चेहेरा , भाषण , काम इ० टवटवीत , उत्साहयुक्त किंवा प्रसन्न नाहीं असा . कंटाळवाणें ( भाषण इ० ). [ रडणें ] रडकी गोष्ट - स्त्री . शोकमय किंवा शोकजनक गोष्ट ; वाईट गोष्ट . रडकी सूरत - वि . सदा दुर्मुखलेला ( इसम ); सदा रड्या ; नेहमीं रडकी मुद्रा असणारा ; रडकी मुद्रा धारण करणारा ; रड्या ; दुःखी चेहेरा , मुद्रा असलेला . [ रडका + अर . सूरत ] रडकुंडा , डी - वि . रडावयाच्या बेतास आलेला ; डोळे पाण्यानें भरुन आले आहेत असा ; निस्तेज . [ रडणें आणि तोंड ] रडकुंडीस येणें - कांहीं कामांत अति त्रासल्यामुळें किंवा दूःख सोसवेनासें झाल्यामुळें आतां रडूं लागावें अशा स्थितीस पोहोंचणें ; रडण्याच्या बेतांत येणें ; अति दगदगीमुळें रडण्याच्या स्थितीस येणें ; रडें कोसळण्याइतका त्रास होणें , याच अर्थानें जीव रडकुंडीस येणें - रडीस येणें असेंहि म्हणतात . ती आजोबाजवळ गेली आणि अगदीं रडकुंडीस येऊन म्हणते कीं , लोक आतां तोंड नाहीं काढूं देत बरं कां ? - पकोघे . रडकूळ - स्त्री . ( गो . ) रडकुंडी . रडणें - अक्रि . रुदन करणें ; अश्रू गाळणें . विषाद वाटणें ; शोक करणें . ( ल . ) अपयश येणें ; ठेचाळणें ; आपटणें ; नष्ट होणें ; बंद पडणें ; अनादरानें बाजूला ढकलला जाणें . चार दिवस पाटीलबोवांचा आश्रय होता तोहि रडला . आतां गोंदोबाला भीकच मागितली पाहिजे . बक्षिसी रडो पण पगार तर द्याल कीं नाहीं ? नुकसान होणें . तूं नोकरी सोडलीस तर त्यांत माझें काय रडतें ? ( वैतागानें , निंदेनें ) असणें ; होणें . दोन वर्षे मामलत रडत होती तेव्हां आमच्या मुलानें आम्हाला काय दिलें तें तुम्ही पाहिलेंतच , आतां मामलत गेली , आतां काय देणार फतर्या ? एखादी गोष्ट घडणें , करणें , सुरु करणें या अर्थी तुच्छतेनें योजतात . मी सावकारी करीन म्हटलें ती रडली . आतां दुसरें कांहीं रडावें . निंदणें ; निर्भर्त्सिणें . मी त्याला नाहीं दोष देत , मी आपल्या दैवाला रडतों . - सक्रि . ( निंदेनें ) चालविणें ; करणें . दोन वर्षे तूं दुकान रडलास तेवढें बस्स झालें . [ सं . रट ; प्रा . रड ] म्ह० रोज मरे त्याला कोण रडे . ( व . ) रडली तर रडली काय माणिक मोती झडतील ? ( ही म्हण रडणार्या मुलीला अनुसरुन आहे . म्हणजे रडण्याचा एवढा धाक कशाला - या अर्थी ). रडतखडत , रडतरडत , रडत पडत , रडत कसत - क्रिवि . मोठ्या कष्टानें ; इच्छेविरुद्ध कसेंबसें ; रेंगाळत ; आळसल्यासारखें ; नाइलाजानें ; बिगारीनें ; मंदपणानें . रडतगोत्र - न . रड्या वंश ; रडी मंडळी अथवा जथावळ ; सदोदित कुरकुरणारी अथवा रडतराऊ व्यक्ति ; नेभळट , नेभळा , बिनकर्तबगारीचा , उत्साहरहित मनुष्य . त्याचें रडतगोत्र आहे ( म्हणजे तो रडतराऊत आहे ). रडत घोडें , रडत राऊत , रडत राव - नपु . लोकांच्या सक्तीनें किंवा स्वतःची इच्छा नसतांना कांहीं काम करणारा ; रडवा मनुष्य ; उत्साह किंवा धमक नसलेला , नेहमीं वाईट अगर संकटाची सबब सांगणारा इसम . रडता राऊत घोड्यावर बसविणें - एखाद्या कामास आंबटतोंड्या अगर निरुत्साही मनुष्यास पाठविणें अगर त्यास काम सांगणें ; काम करण्याचें मनांत नसणार्यास बळजबरीनें कामास लावणें . रडत राऊत घोड्यावर बसविला तर मेल्याची खबर आणितो . रडत लक्षुमी , लक्ष्मी - स्त्री . रडतपार्वती ; क्षणोक्षणीं कांहीं थोडेसें निमित्त होतांच रडूं लागणारी स्त्री ; उत्साहरहित स्त्री . रडता - वि . रडणारा ; रडका ; रड्या ; रडतोंड्या . हासती बायको आणि रडता पुरुष कामाची नाहींत . [ रडणें ] रडतोंड - न . दुर्मुखलेला चेहरा अगर सुरत . रडवा - वि . रडका ; दुःखी ; खिन्न ; कष्टी ; नेहमीं रडण्याची संवय असलेला ; सदा तक्रारी करणारा ; कुरकुर्या किंवा तशा स्वभावाचा ; निराश ; दुर्मुखलेला . [ रडणें ] रडविणें - सक्रि . रडावयास लावणें , भाग पाडणें ; दुःख देऊन रडीस आणणें . दुःखकारक प्रसंगाच्या वर्णनानें किंवा देखाव्यानें कोणेकाला डोळ्यांतून अश्रु गाळावयास लावणें . ( ल . ) नाश करणें ; वाढ खुंटविणें ; उर्जितावस्थेस येऊं न देणें . त्रास देणें ; चिडविणें ; एखाद्याला रडावयास येईल इतकें छळणें , गांजणें , उपद्रव देणें . मला ह्या कामानें पांच वर्षे रडविलें . आनंदाचा प्रसंग , पाऊस , वारा , रोग , थंडी , ऊन्ह इ० नीं शेत , रचनाविशेष इ० च्या रंगाचा भंग करणें .
|