गीतापद्यमुक्ताहार - अध्याय पहिला

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


धृतराष्ट्र संजयास ह्मणतो --

धर्माने अभियुक्त शुद्ध जगती ऐसे कुरुक्षेत्र जे

त्यामाजी बहु हौनी निजमनी युद्धार्थ उद्युक्त जे ।

आले मत्सुत सर्व पांडव जई इच्छूनि मोठ्या जया

तेव्हा सर्व मिळोनि काय करिते झाले ? सख्या संजया  ॥१॥

संजय --

आली सन्मुख जै व्यवस्थित चमू ती पांडवांची रणी

योद्धे सर्वही शूर वीर नयनी दुर्योधने पाहुनी ।

आचार्याजवळी त्वरे करुनिया जो संभ्रमे पातला

राजा शीघ्र तयाप्रती वचनही हे बोलता जाहला ॥२॥

हे आचार्य ! पाहा पाहा ! झडकरी ही पांडवांची चमू

मोठ्या अब्धिसमान साच गमते नेणो कसे आक्रमू ।

केली ही रचना स्वये द्रुपदजे कौशल्य त्याचे फळे

मोठा तो तुमचाच शिष्य गुरुजी ! बुद्धिप्रभावे बळे ॥३॥

येथे वीर महापराक्रमपटू जे पार्थभीमासम

तोषावे स्वमनात शूरपुरूषे पाहूनि युद्धक्रम ।

हा राजा युयुधान हा द्रुपद हा युद्धात मोठा पटू

तैसा थोर विराट वीर नृपती शत्रूस वाटे कटू ॥४॥

आहे हा नृप चेकितान गुरूजी हा धृष्टकेतू पहा

तैसा हा नृप काशिराज बरवा जो शौर्यशाली महा ।

शूरत्वे पुरुजित् खराच गमतो जो सिंह ऐसा दळी

हा तैसा नृप कुंतिभोज समजा हा शैब्य मोठा बळी ॥५॥

हा विक्रांत महाबळी नरपती तैसा युधामन्यु हा

दावी शौर्यहि उत्तमौज समरी की शत्रुते जो महा ।

हा सौभद्र पराक्रमी नच दिसे की तोड ज्याच्या गुणा

तैसे द्रौपदिचे सुपुत्र गुरूजी ! कोणीच नाही उणा ॥६॥

हे आचार्य ! तुह्मास वीर कथिले हे पांडवांचे पहा

आतां वीर अह्मांकडील कथितो जे थोर योद्धे महा ।

माझे वीरहि हे असंख्य असती केल्यास सारे जमा

जाणायास्तव मुख्य मुख्य कथितो त्यातील विप्रोत्तमा  ॥७॥

आधी आपण , भीष्म कर्ण कृपही युद्धी यशस्वी सदा

हे योद्धे अवघे अणी उतरिती शौर्ये पराच्या मदा ।

अश्वत्थामविकर्ण शूरहि तसा हा सोमदत्ती पहा

हे सारे समरी विशारद भले युद्धांत योद्धे महा ॥८॥

मोठे वीर अनेक साच दुसरे बाजूस राखावया

तैसे कैक मदर्थ सिद्ध असती प्राणास टाकावया ।

कोणी शोभति शस्त्र अस्त्र सगळ्या विद्यागुणी मंडित

नाना व्यूह रचावया निपुण जे युद्धी महापंडित ॥९॥

भीष्माने मम सैन्यरक्षण पहा केले असे तत्वता

सांगे होइल तेच पूर्ण विजयी माझी मनोदेवता ।

भीमे रक्षित सैन्य विस्तृत परी सामर्थ्य त्याचे किती ।

आहे ठाऊक भीम मंद जड तो कोणास त्याची क्षिती ॥१०॥

ते ते त्या त्या ठिकाणी सशर नृप उभे राहिले फार थाट

सैन्याची सर्व झाली खळबळ अवघी लाविला रम्य घाट ।

आता आचार्य ! तुह्मी सकळ मिळुनिया हेच कर्तव्य पाहे

रक्षावा भीष्म आधी सकल मिळुनिया सांगणे हेच आहे ॥११॥

आनंदे कुरुवृद्ध भीष्म मग तो अतुच्च शब्दे करी

मोठा गर्जुनि सिंहनाद समरी वाटे दुजा केसरी ।

हाती सुंदर शंख शूर पुरूषे घेवोनि मोठा भला

ज्याचा शब्द महाभयप्रद असा मोठ्या बळे फुंकिला ॥१२॥

वाद्ये वाजविती अनेक जनही त्यानंतरे गोमुख

कोणी घे पणवानकास अथवा भेरीसही सन्मुख ।

भंभंभं कितिएक शंखहि तसे उच्चस्वरे फुंकिती

गेला नाद घुमोनि सर्व गगनी व्यापून गेली क्षिती ॥१३॥

मोठा स्पंदन भव्य दिव्य असूनी श्वेताश्व ज्या जोडिले

त्यामाजी भगवंत पांडव असे पहा शोभले ।

घेती शंख करांत ते उभयता दिव्यप्रभासंयुत

हर्षे वाजविती रणी मग तदा जो शब्द अत्यद्भुत ॥१४॥

दिव्य शंख पांचजन्य पद्मनाभ घे करी

शोभिवंत देवदत्त पार्थ आदरे वरी ।

श्रेष्ठ पौंड्र शंख भीम घेत यत्कृती

हे त्रिवर्ग सर्व उच्चशब्द शंख फुंकिती ॥१५॥

तैसा अनंतविजयाख्य महा विचित्र

घे शंख धर्म नृप सत्वर कुंतिपुत्र ।

बाकी सुघोष मणिपुशःपक जे रहाती

घेती त्वरे नकुल ते सहदेव हाती ॥१६॥

तैसा काश्य महाधनुर्धर रणी किंवा शिखंडी बळी

योद्धा थोर महारथी कितितरी ऐकाल नामावळी ।

धृष्टद्युम्न विराट दक्ष समरी तैसाच हो सात्यकी

सारे हे असते अजिंक्य अरिला युद्धामध्ये सत्य की ॥१७॥

द्रुपदनृपति राया ! द्रौपदीचेही पुत्र

दृढभुज अभिमन्यू शूर सत्कीर्तिपात्र ।

सकल जमुनि ऐसे वीर एकत्र रीती

झडकारि अपुलाले शंख तै वाजविती ॥१८॥

ध्वनी जेधवा दाटली त्या रवाची

उरे फाटली तेधवा कौरवांची  ।

कडाडे नभामाजि कापे धराहि

दणाणे असा शब्द अत्यंत पाही ॥१९॥

झाले कौरव सिद्ध सैन्यरचना लावूनि सारे रणी

ज्याच्या वानर हो रथध्वजशिरी तो पार्थ त्या पाहुनी ।

शस्त्रे घेउनि तीक्ष्ण वीर समरी झुंजावया चेतले

त्यांते पाहुन अर्जुने निजकरी गांडीवही घेतले ॥२०॥

नृपा ! तेधवा पार्थ तो कृष्णजीला

अती आदरे बोलता काय झाला ।

अर्जुन --

सख्या ! अच्युता ! सांगतो तूजलागी

रथा माझिया ने चमूमध्यभागी ॥२१॥

रणामाजि या पातले कोण कोण ?

धरुनी मनी युद्धकामार्थ जाण ।

कुणाशी असे युद्ध कर्तव्य आता ?

मला पाहुंदे एकदा कृष्णनाथा ॥२२॥

महा दुर्मती सर्व जे धार्तराष्ट्र

तयांचे रणी इच्छिणारे अभीष्ट ।

मिळाले रणी युद्धकामा धरून

तया पाहु दे आजि डोळे भरून ॥२३॥

संजय --

समरसमयी ऐशा जेधवा हे नृपाळा !

विजय वचन ऐसे बोलिला विश्वपाळा ।

हरि करुनि उभा तो हाकुनी फार वेगी

रथ उभय दळांच्या तेधवा मध्यभागी ॥२४॥

‘ महीपाळ सारे मिळाले रणांत

पुढे दीसती भीष्म की द्रोण त्यांत ।

कुरु सर्वही येथ एकत्र झाले

पहारे पहा । ’ अर्जुनालागि बोले ॥२५॥

तो पार्थ पाहे मग सैन्यसिंधू

आचार्य , मामा , सुत , मित्र , बंधू ।

नातूहि सारे चुलतेहि त्यांत

आजे दुजे की अपुलेच गोत ॥२६॥

दळामाजि दोनीही तो पार्थ पाहे

सखे सोयरे आपुले गोत आहे ।

उभे राहिले बंधु सारे विचित्र

तया पाहुनी पंडुचा शूर पुत्र ॥२७॥

अर्जुन --

लढाया रणी सिद्ध झाले मुरारे !

अजी पाहूनी आपुले लोक सारे ॥२८॥

सख्या देही माझ्या शिथिलपण हे फार जडले ।

मूखांतूनी देवा जल सरुनिया शुष्क पडले ।

शरीरी माझ्या हा थरथर कंप सुटला !

तसा ! बा हे ! पाहे स्वतनुवरि रोमांच उठला ॥२९॥

गळॆ हस्तांतूनी अहह ! मम गांडीव धनुही

त्वचा माझी देवा बहु जळतसे अग्निपरि ही ।

नुरे नाझ्या अंगी समरपटु सामर्थ्य किमपी

भ्रमे माझे आता मन सकल बोले ध्वजकपी ॥३०॥

निमित्ते मला भासती ही विरुद्ध

नसे त्यांमध्ये एकही नीट शुद्ध ।

जना आपुल्या मारणे हा उपाय

गमेना बरा , ह्यांत कल्याण काय  ॥३१॥

इच्छी न कृष्णा विजयास चित्ती

नको नको राज्यसुखे मला ती ।

बा ! ते कशाला मज राज्यभोग ?

नको नको जीवित हो वियोग ॥३२॥

ज्यांच्यासाठी इच्छितो राज्यभोग

किंवा वाटे प्राप्त हो सौख्ययोग ।

ते सोडोनी सिद्ध झाले रणास

संपत्तीची जीविताचीहि आस ॥३३॥

आचार्य पुत्र चुलते मम वासुदेवा

आले पितामह रणी स्वमनात ठेवा ।

मामादि हे श्वशुर पौत्र पहा कितीक

संबंधयुक्त जन शालक मित्र कैक ॥३४॥

ह्या कारणे मी नच आज त्यांते

मारीन ; मारोत खुशाल माते ।

त्रैलोक्यराज्यार्थहि मी न धाड

घाली ; क्षितीचा मग काय पाड  ॥३५॥

अहा ! शार्तराष्ट्रांसि मारूनि वाया

जगी कोणता लाभ तो देवराया  ।

अह्मा आततायी जरी देति ताप

तरी मारिता त्यास लागेल पाप ॥३६॥

अशाकारणे बांधवालागि पाही

न मारावया पात्र आह्मी कदाही ।

सुखी आपुल्या मारुनीया जनाते

कसे हौं ते माधवा ! सांग माते ॥३७॥

लोभ तयांची मति होय नष्ट

तया दिसेना जरि काय इष्ट ।

आहे महा पातक मित्रघात

कुलक्षये दोषहि लागतात ॥३८॥

न जाणो कसे यातुने मुक्त होऊ ?

कसे पातकापासुनी दूर जाऊ  ।

कुलच्छेद होतसे विश्वपाला !

महा दोष हा भासतो मन्मनाला ॥३९॥

कुलक्षयाने बुडतात सारे ,

परंपरेचे कुलधर्म बा रे ।

स्वधर्मनाशे कुल सर्व बा ते ,

अधर्ममार्गात सदा रहाते ॥४०॥

कृष्णा अधर्म घडतो सुकुलात जेव्हा

जाती कुलीन युवती बिघडून तेव्हा ।

ऐशा स्त्रिया बिघडल्यावरि वृष्णिनाथा !

तै वर्णसंकर तिथे लिहिलाच माथा ॥४१॥

होता संकर जो कुलक्षय करी त्याच्या कुलातील तो

घेवोनी पितरा पडोनि नरकी दुःखामध्ये डुंबतो ।

नाही पिंड न त्यास तर्पण कधी नाही क्रिया कोणती

तेणे पातकवृद्धि होउनि सदा ते संकट लोळती ॥४२॥

वर्णसंकरादि दोष हे असे महा महा

सर्वथा कुलघ्न तो करी ह्मणोनिया पहा ।

जे कुलात जातीधर्म चालतात शाश्वत

जाउनी लयास ते अधर्म वृद्धि पावत ॥४३॥

जनार्दना ! हे सखया ! मुरारे !

ज्या मानवांचे कुलधर्म सारे ।

लयास जातील तयांस खास

मी ऐकतो की नरकात वास ॥४४॥

अहाहा ! किती पाप अत्यंत मोठे

अह्मी मांडिले कर्म हे फार खोटे ।

पहा राज्यसौख्यार्थ युद्धस आलो !

जना आपुल्या मारण्या सिद्ध झालो  ॥४५॥

असो ; आयुधे टाकितो आज सारी

मला मारिती सर्वही शस्त्रधारी ।

रणी धार्तराष्ट्र प्रयत्नाविना हे

तरी त्यामध्ये क्षेमकल्याण आहे ॥४६॥

असे बोलूनी सोडूनी सर्व धीर

रथाखालती पातला पार्थ वीर ।

धनुर्बाणही टाकि तो कृष्णभक्त

बहू मानसीहौनी शोकयुक्त ॥४७॥

पहिला अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP