अर्जुन --
ऐशा तुझ्या सगुण मूर्तिस नित्ययुक्त
जे पूज्य मानुनि तुला भजतात भक्त ।
की जे जगी असति निर्गुणसौख्यभोगी
योग्यांत त्या उभय उत्तम कोण योगी ॥१॥
भगवान --
माझ्याच ठाई धरूनी मनाते
जे भक्तिभावे भजतात माते ।
श्रद्धा ज्यांची असते अनन्य
आहेत पार्था ! मज तेच मान्य ॥२॥
की जाणुनी अक्षर मी अचिंत्य
सर्वत्रगामी ध्रुव आणि सत्य ।
अव्यक्त कूटस्थ अनादि साजे
ऐशा मला भक्त उपासिती जे ॥३॥
जे इंद्रियांस सगळ्या अवरून घेती
सर्वत्र बुद्धि सम ठेवुनि राहताती ।
जे सर्वदा सकल भूतहितांत दंग
होती मिळूनि मज ते मम अंतरंग ॥४॥
जे निर्गुण चित्त धरू पाहती
त्यांच्या जिवाला बहु कष्ट होती ।
होणे दुरापास्त गती विदेही
तेणेच दुःखी पडतात देही ॥५॥
अर्पूनि कर्मे मज होति पार
माझ्यावरी टाकुनि सर्व भार ।
ध्यातातजे नित्य अनन्य भावे
सेवाहि माझी करिती स्वभावे ॥६॥
जे जीवभावे धरतात कास
मी शीघ्र उद्धारक होय त्यांस ।
हा मृत्युसंसार समुद्र घोर
त्यांतून त्यांना करि मीच पार ॥७॥
ह्याकारणे तू मन बुद्धि योजी
माझ्या स्वरूपांत बळेच आजी ।
होईल तेणे पुढतीही खास
माझ्या स्वरूपात तुझाहि वास ॥८॥
माझ्यांतही चित्त तुझे न राहे
सुस्थीर ऐसे क्षणही नरा हे ।
मत्प्राप्तिचा नित्य धरून हेतू
अभ्यास पार्था ! तरि चालवी तू ॥९॥
हेही जरी होत नसेल तूते
अर्पी स्वकर्मे तरि सर्व माते ।
मदर्थ कर्मे करि तू सुबुद्धी !
तेणेही बा शीघ्र मिळेल सिद्धि ॥१०॥
हेही जरी होत नसेल तूते
राहून माझ्या तरि आश्रयाते ।
नानापरी यत्न करूनि ठीक
त्यागावया कर्मफलांसि शीक ॥११॥
अभ्यासाहुनिही विशेष समजे की ज्ञान श्रेयस्कर
ज्ञानाहून खरोखरीच असते बा ध्यान अग्रेसर ।
ध्यानाहूनिहि जाण कर्मफल जे तत्त्यग मोठा असे
होता नीट सुसाध्य तो मग खरी चित्तांत शांती वसे ॥१२॥
दयामैत्री भूती सकल कधिहि द्वेष न करी
जया मी की माझे तिळभरि नसे गर्व न धरी ।
धरी दुःखे किंवा सकलहि सुखे जो सम मनी
क्षमा शांती चित्ती हृदयि धरितो जो नर जनी ॥१३॥
जो संयमी मद्व्रत एकनिष्ठ
योगांत ज्याचे मन नित्य तुष्ट ।
अर्पी मनोबुद्धि मलाच फक्त
आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१४॥
भीती न ज्याची जनही धरिती
ज्याला जनाची तिळही न भीती ।
जो क्रोधचिंतासुखदुःखमुक्त
आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१५॥
जो शुद्ध जो दक्ष सदा उदास
इच्छा नसे दुःख नसे जयास ।
आरंभ टाकूनि सदा विरक्त
आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१६॥
आनंद की द्वेष नसे जयास
इच्छा नसे शोक नसे मनास ।
शुभाशुभापासुनि होय मुक्त
आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१७॥
हो शत्रु की मित्र समान भावो
सन्मान किंवा अपमान होवो ।
शीतोष्ण मानी सुखदुःख उक्त
आसक्ति सोडूनि सदैव मुक्त ॥१८॥
कीं ज्यास निंदा स्तुतिही समान
दे प्राप्त होईल तयास मान ।
निःसंग मौनी स्थिरचित्तयुक्त
आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१९॥
पूर्वोक्त धर्मामृत ह्याच रीती
जे सर्वदा सेवन हे करीती ।
मी थोर ज्या जे बहु भक्तियुक्त
होती मला ते प्रिय फार भक्त ॥२०॥
बारावा अध्याय समाप्त .