भगवान --
हा देह हे शेत धरूनि भाव
पार्था ! असे क्षेत्रहि त्यास नाव ।
जो जाणता क्षेत्र महा अभिज्ञ
क्षेत्रज्ञ त्याला म्हणतात तज्ञ ॥१॥
क्षेत्रात सार्या वसतो सदैव
क्षेत्रज्ञ तो मीच अनंत ठेव ।
जे जाणणे दोहिस अन्य अन्य
ते ज्ञान पार्था ! मज फार मान्य ॥२॥
हे क्षेत्र कैसे किति तत्प्रकार
उत्पत्ति कैशी किति तद्विकार ।
क्षेत्रज्ञ कैसा किति तत्प्रभाव
थोड्यांत ते ऐक धरूनि भाव ॥३॥
एदांत तद्वर्णन गाति सारे
छंदे ऋषीही विविध प्रकारे ।
की ब्रम्हसूत्रांत पदांत जाण
त्याची असे फोडही सप्रमाण ॥४॥
अहंकार अव्यक्त भूते सहा ही
मनोबुद्धि की इंद्रियेही दहाही ।
तसे भोग हे पाच शब्दादिकत्वे
मिळूनी अशी सर्व चोवीस तत्त्वे ॥५॥
की द्वेष इच्छा सुख दुःख बा रे !
चैतन्य की धैर्य मिळूनि सारे ।
छत्तीस बा ! क्षेत्रज हे विकार
सांगीतले त्यांतिलमुख्य सार ॥६॥
दंभाचा लेश नाही क्षणभरि न खपे ज्यास आत्मप्रशंसा
चित्ताला स्थैर्य मोठे शरिर थरथरे काढिता नाव हिंसा ।
प्राणांती शांति ज्याची तिळभरि न ढळे शुद्धतेचाही ठेवा
चित्ताचा निग्रही जो , अति सरळ , करी सद्गुरूचीही सेवा ॥७॥
वैराग्य सार्या विष्यांत राहे
चित्ती अहंकार न लेश वाहे ।
व्याधी जरा मृत्यु विपत्ति लाहे
हे सर्व जन्मांतिल दोष पाहे ॥८॥
कोणी न माझी गृहपुत्रदरा
जो मानितो व्यर्थचि हा पसारा ।
काही जगी इष्ट अनिष्ट होवो
चित्ती जया नित्य समान भावो ॥९॥
माझ्या स्वरूपी धरि एक सक्ती
अद्वैतयोगे परिपूर्ण भक्ती ।
एकांतवासात सदैव राजी
कंटाळतो जो वसता समाजी ॥१०॥
अध्यात्मबोधे करि नित्य शोध
घेतो जडापासुनि तत्त्वबोध ।
जे ज्ञान हे , म्हणती ; विरुद्ध
ते सर्व अज्ञान असेच सिद्ध ॥११॥
सर्वोत्तम ब्रम्ह अनादि पाही
आहे न किंवा म्हणवे न नाही ।
जे ज्ञेय ऐसे कथितो तयास
ते जाणिल्या मोक्ष मिळेल खास ॥१२॥
त्या हात पाय जिकडेतिकडेही भारी
सर्वत्र लोचन शिरे वदने उभारी ।
सर्वत्र कर्ण तसे भरले नरा हे !
व्यापूनिया त्रिभुवनास पुरून राहे ॥१३॥
सर्वेंद्रियात गमतो गुणसंघभास
आहे परी सकल - इंद्रियहीनखास ।
कोठेच सक्त नसुनी सकलांस टेका
भोगी असून गुणहीन गुणांस जे का ॥१४॥
व्यापूनिया अचर की चर सर्व भूते
बाहेर आत सगळे भरुनी रहाते ।
ते सूक्ष्म फार म्हणुनी न कळे कदापी
जे दूरही जवळही असते तथापी ॥१५॥
भूती असूनी अविभक्त पाहे
जे का विभक्ता परि नित्य आहे ।
ते ज्ञेय भूता सकळांस पाळी
दे जन्म जे नेउनि अंतकाळी ॥१६॥
तेजस्व्यांना ज्योतिचा देत पूर
नामे गाजे हे तमाहूनि दूर ।
ज्ञाना ज्ञेया जाणणे ज्ञानयोगे
सर्वांच्या जे अंतरांमाजि वागे ॥१७॥
हे क्षेत्र हे ज्ञानहि थोडक्यांत
की ज्ञेयहि मी कथिले तयांत ।
मद्भक्त हे जाणुनि सर्व भावे
माझ्या स्वरूपाप्रति शीघ्र पावे ॥१८॥
आता तशी प्रकृति एक मनांत आण
किंवा दुजा पुरूष हीहि अनादि जाण ।
जे जे पहा गुणविकार मनांत येती
ते जाण ह्य प्रकृतिपासुनी सर्व होती ॥१९॥
देहेंद्रिये प्रकृति ही करण्यास हेतू
ऐसे जगी म्हणति आण मनांत हे तू ।
दुःखे सुखे घडति जी विजया ! विलोक
ती भोगितो पुरूष हा म्हणतात लोक ॥२०॥
राहोनिया प्रकृतिच्या चिर अंतरंगी
पार्था ! तिच्या पुरूष सर्व गुणांस भोगी ।
जी उच्च नीच मिळते मग त्यास योनी
हेतू तयास गुणसंगति हेच मानी ॥२१॥
वसे ह्या देही जो पुरूष ‘ पर ’ ऐसे म्हणुनिया
जगी देती पार्था ! कितितरिहि नामे जन तया ।
महादेव , द्रष्टा , परम , अनुमंता , समजती ,
जया भर्ता , भोक्ता म्हणुनि परमात्माहि भजती ॥२२॥
जो कोणी ऐशा पुरूषाप्रती या
जाणे गुणांच्या समवेत माया ।
राहे जरी तो भवसागरांत
त्याला नसे जन्म पुन्हा जगांत ॥२३॥
ध्यानांत आत्मा बघतात कोणी
कोणी मनानेच मनांत आणी ।
हा सांख्ययोगे बघती कितेक
की कर्मयोगेहि अनेक लोक ॥२४॥
की ज्यांस आत्मा न कळे कसा ते
ऐकोनि तेही भजती तयाते ।
ज्यांना अशी ऐकिव भक्ति फार
होतात मृत्यूंतुनि तेहि पार ॥२५॥
हो स्थूल की सूक्ष्म अशा जिवांचा
किंवा असो जन्म चराचरांचा ।
क्षेत्रज्ञ की क्षेत्र मिळूनि जाण
होतो जगी हे विजया ! प्रमाण ॥२६॥
भूतांत सर्व परमेश्वर ह्या शिरून
जो राहतो समसमान सदा भरून ।
सर्वांस नाश घडतो न परी तयास
जाणेल तोच नर डोळस जाण खास ॥२७॥
पाहे समान सकलांत करून वास
जाणे अशा सतत जो परमेश्वरास ।
तो आपला न करि आपण नाश हाते
जातो पुढे त्वरित तो जन सत्पदाते ॥२८॥
येतात कर्में सगळी घडून
ती जाणतो जो प्रकृतीकडून ।
आत्मा अकर्ता करि हा विवेक
लोकी खरा डोळस तोच एक ॥२९॥
भूते अशी ही जरि वेगाळली
एकाच आत्म्यांतुनि ती निघाली ।
त्याचाच विस्तार समस्त आहे
पाहे तदा ब्रम्ह तयास लाहे ॥३०॥
असे निर्गुणी तो अनादि स्वभावे
म्हणोनी न आत्मा कदा नाश पावे ।
वसोनीहि देही करी तो न काही
कशालाहि पार्था ! क्धी लिप्त नाही ॥३१॥
सर्वत्र आकाश भरून पाही
सूक्ष्मत्वयोगे परि लिप्त नाही ।
राहूनि आत्माहि तसाच गुप्त
देहांत सार्या नच होय लिप्त ॥३२॥
की एक भानू असुनी नभांत
पार्था ! प्रकाशे सगळ्या जगांत ।
क्षेत्रज्ञ तैसा जरि एक आहे
क्षेत्री प्रकाशून समस्त राहे ॥३३॥
क्षेत्रज्ञा की क्षेत्रज भेदभाव
जे ज्ञाननेत्रे बघती सदैव ।
भूतस्वभावातुनि मुक्त व्हाया
जातात हे जाणुनि दिव्य ठाया ॥३४॥
तेरावा अध्याय समाप्त .