अर्जुन --
माझ्यावरी प्रथम तूच कृपा अरून
अध्यात्म जे परम गुह्य असे म्हणून ।
सांगूनि ते बहुत त्वां उपकार केला
त्या भाषणे सकल हा मम मोह गेला ॥१॥
जनन मरण जे का भूतमात्रास येते
सकल कमलनेत्रा ! त्वत्प्रभावेच होते ।
विशद परिशिला हा त्वन्मुखे गुप्त ठेवा
खचित तव असे हे दिव्य माहात्म्य देवा ॥२॥
त्वद्रूप हेच कथिले परमेश्वरा तू
ते पाहण्यास्तव धरी मन फार हेतू ।
ऐश्वर्ययुक्त तरि दाखव रूप माते
प्रत्यक्ष आज नयना पुरूषोत्तमा ! ते ॥३॥
ते पाहण्यास जरि मीहि असेन पात्र
दावावायास तुज कष्ट न लेशमात्र ।
योगेश्वरा ! तरि तुझे अविनाश रूप
दावी मनास परिसूनि चढे हुरूप ॥४॥
भगवान --
पहा अर्जुना ! शेकडो मत्स्वरूपे
हजारो किती भिन्न हे रंगरूपे ।
तयांमाजिही दीसती भेद नाना
किती भासते दिव्या कांती जनांना ॥५॥
येथे पहा हे वसु रुद्र सारे
हे देव हे अश्विनिपुत्र बा ! रे ।
पाहोनि घे हे विजया ! अपूर्व
आश्चर्यराशी मम रूप सर्व ॥६॥
ह्या एकठायी सगळ्या जगास
पार्था ! पहा आज चराचरास ।
वाटेल जे जे तुज अन्य काही
ते ते पहा ह्या मम आज देही ॥७॥
असोनी तुझे चरचक्षूहि वाया
न होतील ते शक्य माते पहाया ।
तुला देतसे दिव्य दृष्टी अहाहा !
कसा ईश्वरी योग माझा पहा हा ॥८॥
संजय --
ऐसे वदोनि नृपते ! त्रिजगन्निवास
योगेश्वर त्रिभुवनाधिप अर्जुनास ।
ऐश्वर्ययुक्त अपुले मग विश्वरूप
दावी जयास चढली सहजी हुरूप ॥९॥
काय हो तरि वर्णु मी किति फार अद्भुत रूप ते
कोटिलोचन कोटिही कर आनने किति भूपते ।
भूषणे किति दिव्य कांचन रत्नसंचय त्यामधे
सुप्रकाशित खड्ग तोमर सज्ज ही किति आयुधे ॥१०॥
पुष्पगुच्छहि दिव्य शोभति पीत अंबर ते कटी
गंध केशर चर्चुनी उटि लाविली बहु गोमटी ।
व्यापिले नभ सर्वही मुखपंक्तिला नच त्या मिती
अंतपार न पाहता प्रभु देव अद्भुत तो किती ॥११॥
एकदा जरि येउनी शतसंख्य सूर्यही अंबरी
तेज पाडुनि आपले जरि तापले बहुतापरी ।
श्रीहरी गगनांतरी निज तेज कोंदुनि ते भरी
तेज ते तरि दीप्ति ते करि लेश मात्र त्यापरी ॥१२॥
एक ठाइच सर्वही जग चालले क्षितिपाळका !
भिन्न भिन्नही भाग त्यांतचि ओविली जणु माळका ।
नित्य अव्यय जो सुरेश्वर त्याचिया शरिरांतरी
होय अर्जुन पाहता तव विश्व सर्वही ह्यापरी ॥१३॥
रूप अद्भुत पाहुनी अनिवार कौतुक वाटले
प्रेम येउनि कांपता तनु रोम अंगिहि ताठले ।
कंठ दाटुनि वंदिता नर वाकवी शिर तेधवा
हात जोडुनि नम्र होउनि बोलिला मग माधवा ॥१४॥
अर्जुन --
देही तुझ्या बघतसे अजि देवदेवा !
भूते चराचर तसा सुरसंध ठेवा ।
पद्मासनी विधि जगज्जननात दंग
हे दिव्य सर्व दिसती ऋषि की भुजंग ॥१५॥
बाहू मुखे लोचन कैक पोटे
त्वद्रूप सर्वत्र अनंत मोठे ।
आद्यंत की मध्य न तूज पाहे
विश्वेश्वरा ! विश्वशरीर तू हे ॥१६॥
हस्ती गदा पद्महि तू किरीटी
सर्वत्र तेजोमय दीप्ति मोठी ।
सर्वत्र देखे तव उग्र रूप
दावाग्निसूर्यद्युतिसे अमूप ॥१७॥
तू शुद्ध अक्षर असे सकला कळावे
विश्वास ह्या परम तू निधि ही स्वभावे ।
तू अक्षयी पुरूष शाश्वत धर्मपाळ
वाटे सनातन असे मज सर्वकाळ ॥१८॥
आद्यंतही न नच मध्य अनंतवीर्य
बाहू अनंत नयनी शशि आणि सूर्य ।
तोंडांत अग्नि दिसतो तुझिया प्रदीप्त
तेजे तुझ्या सकल हे जग होय तप्त ॥१९॥
महात्म्या ! तुवा भूमि आकाश पाही
दिशा व्यापिल्या एकट्यानेच दाही ।
तुझे पाहुनी रूप हे दिव्य उग्र
भये कापती लोक तीन्ही समग्र ॥२०॥
पहा येती तूते शरण जमुनी हे सुरवर
भयाने प्रार्थीती सविनय किती जोडुनि कर ।
महर्षि की सिद्ध प्रमुदित किती स्वस्ति म्हणती
तुझी स्तोत्रे गाती स्तवनपर त्यांना नच मिती ॥२१॥
मरुत पितर अश्वी विश्वदेव प्रसिद्ध
असुर वसु तसे हे यक्ष गंधर्व सिद्ध ।
जमुनि सकल साध्यादित्य हे रुद्रवृंद
बघति तुजसि सारे विस्मये मंद मंद ॥२२॥
त्वद्रूप मोठे बहु नेत्र तोंडे
भुजांघ्रि मांड्या उदरे उदंडे ।
विक्राळ दाढा बघुनीच पाही
भ्याले तिन्ही लोक तसाच मीही ॥२३॥
तेजःपुंज विचित्रवर्ण गगना जाउनिया ठेपशी
वासोनी जबडा विशाल नयनी आरक्त कांती कशी ।
पाहोनी तुजला बहू तळमळे घे अंतरात्मा भया
विष्णो ! शांति नसे मनास तिळही मद्धैर्य गेले लया ॥२४॥
विक्राळ दाढा अति उग्र तोंडे
पाहोनि कालाग्निसम प्रचंडे ।
झाली दिशाभूल सुचे न दासा
प्रसन्न होई त्रिजगन्निवासा ॥२५॥
हे सर्व बापा धृतराष्ट्रपुत्र
त्यांचे सहायी क्षितिपाळ मित्र ।
हे भीष्म की द्रोणहि कर्ण हाही
की आमुचे वीरहि मुख्य काही ॥२६॥
ज्वाळा आंतून ज्याच्या उठति भडभडा दांत भेसूर उग्र
ऐशा तोंडी तुझ्या हे भरभर शिरती धाव घेती समग्र ।
दातांमाजी किती हे अडकुनि पडले छिन्नविछिन्न काय
गेलेली ही फुटोनी दिसति किति शिरे चाविता हाय हाय ॥२७॥
लोंढे नद्यांतील धरूनि जोर
जाती जसे अंबुधिच्या समोर ।
ज्वालामुखी या तुझिया अधीर
तैसेच जाती नरलोकवीर ॥२८॥
की अग्निदीप्ती बघुनी सुरंग
घालूनि घेती ज्वलनी पतंग ।
तैसेच तोंडी तुझिया अनेक
वेगे मराया शिरतात लोक ॥२९॥
सारे लोक सभोवती असति त्या तोंडांमधे आपल्या
विष्णो ! ग्रासुनि टाकिशी गटगटा ज्वालामुळे तापल्या
चाटीशी जिभळ्या तई वरिवरी उग्रप्रभा फाकती
व्यापोनी सगळ्या जगास करिती संतप्त हा हा ! किती ॥३०॥
तू कोण सांग मजला तरि उग्र्काया
होई प्रसन्न नमितो तुज देवराया ।
मी रूप इच्छित असे तव आद्य चित्ती
माते तुझी नच कळे परि ही प्रवृत्ती ॥३१॥
भगवान --
मी काळ लोकक्षयकृत्प्रवृद्ध
झालो वधाया जन आज सिद्ध ।
जातील सैन्यांतील वीर खास
न मारिले तू तरिही लयास ॥३२॥
ह्या कारणे घे यश ऊठ वेगी
साम्राज्य हे जिंकुन शत्रु भोगी ।
मी शांति केली पहिलीच त्यांची
नावास हो तू धनि सव्यसाची ॥३३॥
द्रोणास भीष्मास जयद्रथास
कर्णास की अन्यही वीर त्यांस ।
म्या मारिले जिंक न होय कष्टी
झुंजे जयश्री तुझिया अदृष्टी ॥३४॥
संजय --
ऐकोनिया विजय ही भगवंतवाणी
कापे शरीर भरले नयनांत पाणी ।
जोडी नमूनि शिरसी शतधाहि हात
बोले हरीस बहु सद्गद भीत भीत ॥३५॥
अर्जुन --
प्रभाव हरि ! हा तुझा मधुर गावया कीर्तनी
जगास अवघ्या सुखी करुनि घालतो मोहनी ।
तरी असुर हे भये दशदिशांकडे धावती
परी तुज नमावया सकल सिद्ध झेपावती ॥३६॥
कर्ता हि तूच विधिहुनि वरिष्ठ खास
देवेश अक्षर अनंत जगन्निवास ।
सूक्ष्मा जडाहुनिहि तू परता समर्थ
तूते प्रभो ! मग न ते नमिती किमर्थ ॥३७॥
तू तो जुना पुरूष देवहि आद्य तूच
विश्वास ह्या सकल अंत्य निधान तूच ।
ज्ञाताहि तू परम वेद्यहि चित्स्वरूप
ब्रम्हांड हे करिशि तूच अनंतरूप ॥३८॥
सोमाग्नि तू वरूण तू यमवायु तूच
धाताहि तूच विधिचा जनिताहि तूच ।
मी वंदितो तुजशि आज सहस्त्रवार
वंदी पुन्हा फिरूनिया तुजला अपार ॥३९॥
मागे नमस्कार तुला पुढेही
सर्वत्र वंदी तुज सर्व देही ।
त्वद्वीर्य कर्तृत्व महा अपूर्व
तू व्यापिशी सर्व म्हणूनि सर्व ॥४०॥
तुला देवाधीशा ! अजवरि सखा मी समजलो
अरे ! कृष्णा ! मित्रा ! बहु सलगिचे शब्द वदलो ।
प्रभावाची देवा ! अनुपम तुझ्या भ्रांति पडली
प्रमादे की प्रेमे नकळुनि तरी चूक घडली ॥४१॥
विनोद तुमचा करी निवळ हांसवाया जना
विहार करिता तसे मिळुनि बैसता भोजना ।
परोक्ष अपरोक्ष की शयनि बोलता चालता
उणे अधिक बोललो परि करा क्षमा अच्युता ॥४२॥
तूह्या पिता सकलभूतचराचराचा
तू पूज्य तू परम तू गुरूवर्य साचा ।
कोणी तुझ्या सम न थोर कशास नाव
गाजे तुझा त्रिभुवनी अतुलप्रभाव ॥४३॥
जशी क्षमा करितसे जनिता मुलास
मित्रास मित्र अथवा प्रियही प्रियास ।
तैशी क्षमा मजवरी करि देवराया
वंदी तुम्हा म्हणुनिया पसरून काया ॥४४॥
अपूर्व हे पाहुनि तुष्ट झालो
चित्तांत देवा परि फार भ्यालो ।
त्वद्देह दावी पहिलाच खासा
प्रसन्न होवोनि जगन्निवासा ॥४५॥
हे विश्वमूर्ते ! शतसंख्यबाहो !
प्रेमे चतुर्हस्त पुन्हा धरा हो ।
व्हावे गदाचक्रकिरीटधारी
त्या दर्शनाची मज हौस भारी ॥४६॥
भगवान --
पार्था ! तुला मीच कॄपानुरागे
हे दाविले रूप निजात्मयोगे ।
अनंततेजोमयविश्वखाणी
पाहे न याला तुजवीण कोणी ॥४७॥
किती केले यज्ञे सुकृत अथवा वेदपठण
व्रते दाने केली कितिहि विजया ! फार कठिण ।
तपश्चर्या मोठी करुनि झिजवीली तनु जरी
नृलोकी कोणा हे तुजविण नव्हे दर्शन तरी ॥४८॥
हे उग्र घोर मम रूप बघूनि चित्ती
भांतीमधे पडु नको त्यज सर्व भीती ।
पाहे फिरूनि पहिले मम रूप गोड
संतुष्ट होय सखया ! भय सर्व सोड ॥४९॥
संजय --
ऐशी वदोनि विजया भगवंत वाणी
दावी स्वरूप पहिले मग चक्रपाणी ।
भ्याला मनी प्रथम पाहुनि जो प्रताप
देई तया अभय घेउनि सौम्य रूप ॥५०॥
अर्जुन --
तुझे ह्यापरी मानवी रूप बा रे !
बरे सौम्य हे पाहुनीया मुरारे !
पुन्हा हे मला पातले देहभान
यथापूर्व मी जाहलो सावधान ॥५१॥
भगवान --
जे पाहिले त्वा मम रूप बा ! हे
ते पाहणे दुर्लभ फार आहे ।
त्याला पहायास्तव सर्व देव
इच्छा धरूनी बसती सदैव ॥५२॥
माझे जसे तुजसि दर्शन होय नाही
कोणास तेवि घडणे कधि शक्य नाही ।
दाने न वेदपठणे नच पूजनाने
कोणास ते नच मिळे कधिही कशाने ॥५३॥
तरी अर्जुना ! भक्ति ज्याला अनन्य
मला जाणतो तत्वता तोच धन्य ।
पहाया तया मीहि की शत्रुतापा
स्वरूपी मिळायासहि फार सोपा ॥५४॥
निःसंग ज्यास मम भक्ति घडे सदैव
कर्मे मदर्थ करि मानुनि मीच जीव ।
निर्वैर जो सकलभूतगणी स्वभावे
निःशंक तोच विजया मजलागि पावे ॥५५॥
अकरावा अध्याय समाप्त .