भगवान्
टाकोनिया सर्व आशा फलाची
कर्में सारी जो करी सव्यसाची ।
संन्यासी तो तोच योगी खरा रे !
अग्नी कर्में टाकणे व्यर्थ सारे ॥१॥
संन्यास ज्यास म्हणती जगतात लोक
तो कर्मयोगच असे तरि जाण एक ।
संकल्प दूर न करी नच आस दापी
योगी नव्हेचि जन तो विजया ! कदापी ॥२॥
सुज्ञास योग करणे जरि साध्य लोकी
त्यालाहि कर्म तरि कारण हे विलोकी ।
तो योगही मुनिवरे जरि साध्य केला
शांती असे तरिहि कारण पूर्णतेला ॥३॥
ज्याचे पहा मन कधी विषयी रमेना
कर्मामध्येहि सुख ज्यास कधी गमेना ।
संकल्प जो सकलहि दवडी लयाला
त्यालाचि योग म्हणति तरि साध्य झाला ॥४॥
स्वचित हे आपण उद्धरावे
संसारडोहात बुडू न द्यावे ।
बंधूहि आहे निज चित्त जाण
की तेच शत्रूहि मनात आण ॥५॥
जिंकी विवेके जन जो मनाते
मित्रापरी ते सुखवी तयाते ।
जिंकी न जो हे मन अप्रबुद्ध
तेही तया शत्रुच होय शुद्ध ॥६॥
जो शांत किंवा जितचित्त आहे
तो थोर चित्ते स्थिर नित्य आहे ।
शीतोष्ण किंवा अपमान मान
दुःखे सुखे सर्व जया समान ॥७॥
चित्त ज्ञाने अनुभव घडे त्यामुळे तृप्त फार
राहे जो का वश करुनिया इंद्रिये निर्विकार ।
भेंडा धोंडा कनक समजे सारखे जो विरक्त
झाला ऐसे म्हणति सगळे तोच की योगयुक्त ॥८॥
हो मित्र की शत्रु असो उदास
मध्यस्थ की बंधु समान ज्यास ।
पापी असो की जन साधुसंत
ज्या सारखे तोच महा महंत ॥९॥
एकांत पाहोनि सदैव सेवी
रोधोनि काया स्थिर चित्त ठेवी ।
आशा न पोटी विषया न भोगी
ध्यानाकडे योजित चित्त योगी ॥१०॥
पाहोनिया स्थळ सुरेख पवित्र ऐसे
जो आसन स्थिर करूनि सुखांत बैसे ।
जे फार उंचहि नसे नच फार खाली
दर्भावरी अजिन त्यावरि वस्त्र घाली ॥११॥
एकाग्र तेथे करुनी मनाचा
साधूनि सारा जय इंद्रियांचा ।
तो चित्तशुद्ध्यर्थ महा समाधी
त्या आसनी लावुनि योग साधी ॥१२॥
ग्रीवा शिरोभाग शरीर पाठ
ही सारखी ठेवुनि नीट ताठ ।
नासाग्रदृष्टि धरुनी रहातो
दाही दिशांनाही न जो पहातो ॥१३॥
जो शांतचित्ती भय सर्व टाळी
की ब्रम्हचर्यव्रत नित्य पाळी ।
माझ्या स्वरुपी धरि चित्त बा ! हे
होवोनि जो मत्पर नित्य राहे ॥१४॥
जो आवरोनी मन नित्य बा ! रे !
माझ्याच ठाई धरि चित्त सारे ।
त्याला पहा सत्वर मोक्षदाती
माझीच शांती मिळते सदा ती ॥१५॥
बहू भक्षिता योग तो आकळेना
मुळी भक्षही टाकुनी तो मिळेना ।
निजेने बहू प्राप्त नाहीच तो की
सदा जागुनीही मिळेना विलोकी ॥१६॥
नेमस्त आहार विहार सारा
कर्मात नेमस्तचि वागणारा ।
जागे निजे ठेवुनि नेम भारी
साधे तया योगहि दुःखहारी ॥१७॥
आत्मस्वरूपांतचि नित्य चूर
केल्यासही चित्त नव्हेचि दूर ।
इच्छाहि सार्या गमती निषिद्ध
तेव्हाच त्याला म्हणतात सिद्ध ॥१८॥
जो आत्मयोगांत सदैव योगी
लावूनि चित्ता सुखसौख्य भोगी ।
शोभेल दृष्टांत तयास ऐसा
निर्वात जागी स्थिर दीप जैसा ॥१९॥
निरोधोनि योगाकडे चित्त सर्व
जिथे वाटते नित्य आनंदपर्व ।
जिथे सर्वदा चित्त आत्म्यास पाहे
सदा त्यांत आनंद मानून राहे॥२०॥
अनंत सुख तेथिचे लुटुनि मात्र घेते मती
अतींद्रिय म्हणोनि ते खुटवि इंद्रियाची गती ।
अशा स्थितीस जाणतो सतत ठेवितो ती मनी
कधी नच ढळेल तो सुखद मत्स्वरूपांतुनी ॥२१॥
अहा सुख कसे किती म्हणत तो तया पाहुनी
जगावरि म्हणे नसे अधिक लाभ ह्याच्याहुनी ।
अशा स्थितीत सांपडे सुख अलभ्य त्या आगळे
किती प्रखर दुःख हो तरि न त्यांतुनी तो ढळे ॥२२॥
जेथे नसे अल्पहि दुःखभोग
त्यालाच पार्था ! म्हणतात योग ।
तो योग यत्ने विबुधे करावा
चित्ती पुरा निश्चयही धरावा ॥२३॥
कितिक उठति इच्छा नित्य संकल्पयोगे
त्यजुनि सकल व्हावे त्यांतुनी मुक्त वेगे ।
अमित पसरला हा इंद्रियांचा पसारा
दृढ दमुनि मनाच्या निग्रहे तोहि सारा ॥२४॥
बुद्धीस यत्ने बहु धैर्य द्यावे
हळू हळू सुस्थिर शांत व्हावे ।
आत्म्यामधे चित्त धरूनि पाही
चिंतू नये मुळीच काही ॥२५॥
कधी राहे पाहे स्थिर न मन हे चंचळ खुळे
सदा जेथे तेथे पळत सुटते तेथुनि बळे ।
प्रयत्ने काढोनी वश करुनिया नीट सरळ
तयाला ठेवावे दृढ धरुनि आत्म्यांस अढळ ॥२६॥
ठेवावयास मन शांत जयास साधे
योग्यास त्या सुखहि उत्तम फार लाधे ।
निष्पाप जे रजतमादिक ने लयाला
ब्रम्हस्वरूपहि असे मिळते तयाला ॥२७॥
ठेवी असे जो मन योगयुक्त
पापांतुनी होउनि नित्य मुक्त ।
तो ब्रम्हस्वरूपी सहजेच योगी
अत्यंत ऐसे सुखसौख्य भोगी ॥२८॥
भूतांत आत्मा सगळ्या रहातो
आत्म्यात भूते सगळी पहातो ।
यच्चित योगांत सदैव राहे
सर्वत्र तद्दृष्टि समान पाहे ॥२९॥
सर्वांमध्ये जो मला नित्य पाहे
माझ्या मध्ये जाणतो सर्व राहे ।
माझा तो की मीही त्याचाचि पाही
त्याला मी की सोडिना तो मलाहि ॥३०॥
सर्वां भूती मीच हे ज्यास ठावे
ऐशा माते जो भजे ऐक्यभावे ।
संसारी ह्या तो जरी नित्य राहे
माझ्या मध्ये जाण तो सत्य आहे ॥३१॥
जैशी स्वदेहा सुखदुःखाहुनी
सर्वत्र भूतांस तशीच मानी ।
तो थोर योगी जन तो सुजाण
पार्था ! मला संमत फार जाण ॥३२॥
अर्जुन --
आत्म्यावरून सखया । जग पारखावे
तू योग हा मज असा कथिला स्वभावे ।
कृष्णा ! परंतु मन चंचल फार फार
होईल ते स्थिर मला न दिसे विचार ॥३३॥
यदुपते ! मन चंचल वाकडे
सतत ओढितसे विषयाकडे ।
कठिण तज्जय निग्रह साधणे
मज गमे जणु वायुस बांधणे ॥३४॥
भगवान् --
मारी भरारी मन नित्य नित्य
दुःसाध्य तन्निग्रह हेहि सत्य ।
वैराग्य अभ्यास परी करील
तो सत्य पार्था ! मन आवरील ॥३५॥
हाती जयाच्या मन सापडेना
माझ्या मते योगहि त्या घडेना ।
स्वाधीन ठेवून मनास राहे
यत्ने तया योगहि साध्य आहे ॥३६॥
अर्जुन --
श्रद्धा परी चित्त न हे वळे
योगांतुनी ह्या तरि ते चळेल ।
तो योगसिद्धीविण की रहातो
कृष्णा ! पुढे कोण गतीस जातो ? ॥३७॥
अपूर्ण योगे नच होय सिद्धी
पोचे न की ब्रम्हपथांत बुद्धी ।
फ़ोहीस का व्यर्थ मुकोनी जाय ?
अभ्रापरी तो वितळेल काय ? ॥३८॥
माझा असा संशय फेड सारा
कृष्णा ! तुझ्या वाचुनि कोण थारा ? ।
ह्या संशयाचे करणार शून्य
ऐसा दिसेना तुजवीण अन्य ॥३९॥
भगवान् --
पार्था ! न त्या नाश कधी विलोकी
स्वर्गात किंवा नच मृत्युलोकी ।
कल्याणकारी करि जो कृतीला
जाई न बापा ! कधि दुर्गतीला ॥४०॥
जावोनीया शीघ्र तो पुण्यलोकी
वर्षोवर्षे राहुनीया विलोकी ।
श्रीमंताच्या सज्जनांच्याच गेही
जन्मे योगभ्रष्ट तो दिव्यदेही ॥४१॥
किंवा सन्मति बुद्धिमंत सरही कोणास ज्याची न ये
योग्याच्याच अशा कुलांत बरव्या तो जन्म घवोनि ये ।
योग्याच्या सुकुलांत जन्म मिळणे लोकांत ऐशापरी
हीही दुर्लभ गोष्ट फार समजे ह्या मृत्युलोकावरी ॥४२॥
तत्पूर्वदेहातील त्यास बुद्धि
होवोनि तेथे करि योगसिद्धि ।
अभ्यास पार्था ! पुढ्ती करून
सिद्ध्यर्थ तोही झटतो फिरून ॥४३॥
तत्पूर्वअभ्यास बळेच त्यास
लावीतसे योग करावयास ।
जाणावया इच्छिल योग भावे
तोही श्रुतीच्या पुढतीच धावे ॥४४॥
प्रयत्ने असा केलिया साध्य योग
झडोनी पडे सर्वही पापरोग ।
असे सिद्धिने गेलिया जन्म काही
पुढे होतसे सत्वरी मुक्तताही ॥४५॥
ज्ञान्यापेक्षा तापसांच्याहि पेक्षा
ध्याने माने कर्मयोग्याहि पेक्षा ।
योगी मोठा सौख्य तो फार भोगी
ह्यासाठी तू अर्जुना ! होय योगी ॥४६॥
योग्यांतही त्या तरि सर्व जाण
माझ्यात ठेवी मन जो गहाण ।
जो का भजे भक्ति धरूनि माते
सर्वांत मी श्रेष्ठ म्हणे तयाते ॥४७॥
सहावा अध्याय समाप्त .