गीतापद्यमुक्ताहार - अध्याय अठरावा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


अर्जुन --

आता सांगे यादवा ! एक बा हे

संन्यासाचे तत्त्व ते काय आहे ।

त्यागाची ही लक्षणे व्यक्त सारी

ऐकायला चित्त उद्युक्त भारी ॥१॥

भगवान --

संन्यास जो सर्व सकाम कर्मी

संन्यास तो बोलति वेदधर्मी ।

कर्मे करोनी फल मात्र टाकी

तो त्याग ऐसे म्हणतात लोकी ॥२॥

कर्मे समस्त जगतांतिल दोषयुक्त

ती त्यागणेच म्हणतात कित्येक उक्त ।

कर्मे तसेच दुसरे कितिएक सुज्ञ

टाकू नयेत म्हणती तप दान यज्ञ ॥३॥

त्यागांत माझे मत निश्चयाचे

आहे कसे ते तरि ऐक साचे ।

त्यागामधे भेदहि तीन सिद्ध

आहेत पार्था ! जगती प्रसिद्ध ॥४॥

यज्ञादि दान तप आचरूनि क्रियाहि

त्या टाकणे मम मते तरि योग्य नाही ।

की यज्ञ दान तप आचरूनि प्रबुद्ध

होती सदैव विजया ! जगतांत शुद्ध ॥५॥

कर्मे परी ती त्यजुनी फलाते

आसक्ति नाही कधी मनाते ।

ऐशी करावी मत निश्चयाचे

माझे तरी उत्तम हेच साचे ॥६॥

जे नेमलेले निजकर्म पाही

संन्यास त्याचा घडणेच नाही ।

मोहे जरी त्याग करी तयाचा

तो त्यागही तामस होय साचा ॥७॥

देहास फार पडतात म्हणून कष्ट

भीती धरून त्यजिले जरि कर्म इष्ट ।

तो त्याग राजस जगी तरि जाण होतो

कोणास त्यागफल तो न कधीच देतो ॥८॥

कर्तव्य माझे विजया ! म्हणून

जो कर्म सारे करि आदरून ।

अर्पूनि माते फल टाकी

तो बोलती सात्विक त्याग लोकी ॥९॥

ठेवी प्रवृत्ति बघुनी न कधीच नाव

किंवा निवृत्तिवरि फार धरी न हाव ।

त्यागी खरा म्हणति पंडित सत्वयुक्त

तो बुद्धिमंत जन संशय सर्व मुक्त ॥१०॥

झाडून कर्मे जगतांत सारी

टाकावया शक्य न देहधारी ।

ह्या कारणे कर्मफलास टाकी

त्यालाच त्यागी म्हणती लोकी ॥११॥

कर्मास तीन असतात फले स्वभावे

वाईट मिश्रे अति उत्तम त्यांस नावे ।

अत्यागियास मिळती मरणोत्तरी ती

संन्यासियास नच ती उपलब्ध होती ॥१२॥

सांख्यांचाही शास्त्रसिद्धांत हाच

सांगे सार्‍या कर्मसिद्धीस पाच ।

लोकांमाजी कारणे दृश्य होती

पार्था ! तूते सांगतो ऐक बा ! ती ॥१३॥

आधी अहंकार शरीर दोन

सर्वेंद्रिये त्यांत धरून तीन ।

व्यापार नाना घडते सदैव

की पांचवे त्यांतचि एक दैव ॥१४॥

कायेने की वाणिने वा मनाने

आरंभावे कर्म जे जे नराने ।

अन्यायी ते की असो न्याय्य साच

त्याला हेतू लागती हे पाच ॥१५॥

ऐसे असोनी निरुपाधि आत्मा

कर्ता असे जो समजे दुरात्मा

बुद्धीस त्याच्या न विचार न गंध

तो शास्त्रदृष्ट्या मतिमंद अंध ॥१६॥

ज्या मीच कर्ता मनि भाव नाही

आसक्ति कोठे न कधीच राही ।

त्याने जनाला वधिले तथापी

होई न तो घातक वा न पापी ॥१७॥

ज्ञाता , ज्ञान , मिळूनि दोन तिसरे जे ज्ञेय लोकी असे

कर्माचे विधि तीन हे समजती सर्वत्र पार्था ! तसे ।

कर्त्ता , कर्म , धरून दोन करणे त्याच्यामधे तिसरे

होतो घेउन कर्मसंग्रह जगी ध्यानांत ठेवी भले ॥१८॥

तसे ज्ञान की कर्म कर्ताहि तीन

तयांचे गुणे भेदही तीन तीन ।

तुला सांगतो सांख्यशास्त्रानुसार

यथातथ्य ते आयके एकावार ॥१९॥

भूतांत भेद दिसती जरि रंक राव

आहे तयांत परि अभिन्नभाव ।

तो नित्य ज्यास समजे अविनाश जाण

ते ज्ञान सात्विक असे म्हणती प्रमाण ॥२०॥

एकेक भूत अपुल्यापरि भिन्न झाले

त्यांच्यामधे असति भावहि वेगळाळे ।

सर्वत्र जे सतत भिन्नपणा विलोकी

ते ज्ञान राजस असे म्हणतात लोकी ॥२१॥

व्यापोनिया सतत एकच देह पाही

आत्मा गमे सकल कोंडुनि त्यांत राही ।

कांहीच हेतु नसता नसता प्रमाण

ते ज्ञान तामस कनिष्ठ मनांत आण ॥२२॥

नेमे करी आस न लेश पोटी

न द्वेष की आवडही न मोठी ।

इच्छा फळाची तिळही न ज्यांत

जे कर्म ते सात्विक बोलतात ॥२३॥

कर्ता मनामाजि धरून गर्व

इच्छा धरूनी करि कर्म सर्व ।

होती करायास बहु प्रयास

संज्ञा असे राजसकर्म त्यास ॥२४॥

सामर्थ्य हिंसा परिणाम काय ?

हानी जनाची बघण्याशिवाय ।

आरंभ मोहे करणे उगेच

होते जगी तामसकर्म तेच ॥२५॥

आसक्ति नाही अभिमानहीन

उत्साह की धैर्य धरी नवीन ।

सिद्धी असिद्धीत विकारशून्य

कर्ता जगी सात्विक तोच मान्य ॥२६॥

झोंबे सदा कर्म्फळास नामी

हिंसा करी जो अपवित्र कामी ।

जो हर्ष की दुर्धरशोकयुक्त

कर्ता असे राजस तोच उक्त ॥२७॥

जो का अयुक्त कपटी बहु मूढ खोटा

गर्विष्ठ आणि शठ आळ्स ज्यास मोठा ।

कामांत चेंगट बहू रडका अपुर्ता

लोकांमधे म्हणति तामस तोच कर्त्ता ॥२८॥

बुद्धीधृतीचे गुणभेद तीन

ऐकोनि घेई तरि सावधान ।

आता तुला मी कथितोच सारे

ते वेगळाले विजया ! सख्यारे ॥२९॥

प्रवृत्तीस किंवा निवृत्तीस जाणे

अकार्यास कार्यासही त्याप्रमाणे ।

भया निर्भया बंध मोक्षा विलोकी

तिला बोलती सात्विकीबुद्धि लोकी ॥३०॥

सद्धर्म तो काय अधर्म काय ?

की कार्य ते काय अकार्य काय ।

जाणे न जी नीट यथाप्रमाण

ती अर्जुना ! राजसबुद्धि जाण ॥३१॥

अज्ञानयुक्ता करि नित्य हानी

जो धर्म तो सर्व अधर्म मानी ।

सर्वार्थ जी का करिते विरूद्ध

ती तामसी बुद्धि असेच सिद्ध ॥३२॥

प्राणेंद्रिये सकल की मन हे विलोकी

ह्यांच्या क्रिया सतत चालति नीट लोकी ।

एकाग्र निश्चित जिने मिळतो मनास

ती सात्विकी म्हणुनि तू धृति जाण खास ॥३३॥

धर्मार्थ काम सगळे विजया ! धरून

चाले जगी सतत जी धृति आदरून ।

इच्छी प्रसंग पडता परि जी फलास

ती राजसी म्हणुनिया धृति जाण खास ॥३४॥

जी स्वप्न की सतत शोक भयास जोडी

किंवा विषाद मद ह्यांस कधी न सोडी ।

दुर्बुद्धिते चुकुनिही नच दूर टाकी

ती तामसी धृति असे म्हणतात लोकी ॥३५॥

सुखामाजिही तीन होती प्रकार

तरी तेहि तू आयके एकवार ।

गमे त्यांत अभ्यासिता फार गोडी

करोनी त्वरे दुःखविन्मुक्त सोडी ॥३६॥

वाटे कटु प्रथम जे विषसे जिवाला

पीयूषसे मधुर जे परि शेवटाला

आत्मप्रसादमतिपासुनि जन्म पावे

ऐसे असेल सुख सात्विक ते म्हणावे ॥३७॥

पार्था ! तसेच विशःअयेंद्रियसंगमाने

पीयूषसे प्रथम जे पुरूषास माने ।

जे शेवटास परि होय विषासमान

ऐसे असेल सुख राजस तेच मान ॥३८॥

पृथ्वीतळावरि नसे नच दिव्यलोकी

किंवा नसे सुरवरांतहि त्या विलोकी ।

सोडील ह्या प्रकृतिजन्य तिन्ही गुणांस

ऐसा नसे त्रिभुवनांतहि जीव खास ॥४०॥

विप्रांची की अर्जुना ! क्षत्रियांची

वैश्यांची की शुद्र जे सर्व त्यांची ।

कर्मे जी जी भिन्न भिन्न स्वभावे

ती ती झाली ह्या गुणांच्या प्रभावे ॥४१॥

विज्ञान की सरलता तप शुद्धवृत्ती ।

की ज्ञान शांति शम की दम नित्य चित्ती ।

आस्तिक्य हे हि हृदयांत सदैव साचे

ऐसे स्वभावकृतकर्म सदा द्विजाचे ॥४२॥

सदा दक्षता तेज युद्धांत शौर्य

न दे पाठ शत्रुसि अंगांत धैर्य ।

करी दान की ध्यानहि ईश्वराचे

स्वभावीक हे कर्म की क्षत्रियांचे ॥४३॥

गुरे राखणे शेतकी देवघेव

स्वभावीक हे कर्म वैश्या सदैव ।

करावे सदासर्वदा दास्य भावे

असे नेमिले शूद्रकर्म स्वभावे ॥४४॥

जे जे स्वकर्मे करिती सुबुद्धि

तेणे मिळे त्या पुरूषांस सिद्धि ।

सिद्धी कशी ये करुनी स्वकर्म

ते सांगतो ऐकुनि घेइ मर्म ॥४५॥

अयापासुनी सर्व भूते निघाली

जयाचे बळे सृष्टि ही सर्व झाली ।

स्वकर्मे बरे पूजिता नित्य त्याते

मिळे सत्वरी सिद्धि ह्या मानवाते ॥४६॥

उणा आपुला धर्म तोही वरिष्ठ

पराचा जरी चांगला तो न इष्ट ।

स्वभावेच जो नेमिला वर्णधर्म

नव्हे त्यापरी चालता पापकर्म ॥४७॥

जे कर्म वर्णास असेल उक्त

टाकू नये ते जरि दोषयुक्त ।

दोषाविणे कर्म नसेच लोकी

धूम्रविणे अग्नि जसा विलोकी ॥४८॥

मना जिंकुनी बुद्धि कोठे न सक्त

स्पृहा टाकुनी शांत जो का विरक्त ।

करी सर्व संन्यासही शुद्धबुद्धी

तयाला मिळे दिव्य नैष्कर्म्यसिद्धि ॥४९॥

सिद्धीसजो प्राप्त करून गेतो

हे ब्रम्ह कैसे मिळवी पुढे तो ।

जे ज्ञाननिष्ठा भरते मानांत

ती सांगतो मी तुज थोडक्यांत ॥५०॥

जो बुद्धिला शुद्ध वरी करून

धैर्ये मनाला धरि आवरून ।

शब्दादि हे भोग समस्त टाकी

ठेवी न की हर्ष विषाद बाकी ॥५१॥

एकांतवासी लघु खाय भक्ष

वाक्काय की चित्तनिरोधदक्ष ।

जो ध्यानयोगी धरि नित्य निष्ठा

विअराग्य चित्तांत करी प्रतिष्ठा ॥५२॥

जो क्रोध की सकल हे बळ काम गर्व

सोडी अहंकृति परिग्रह जाण सर्व ।

सांडोनि होय ममता बहु शांत मुक्त ॥५३॥

ब्रम्हत्व येतां मन सुप्रसन्न

इच्छी न काही नच होय खिन्न ।

जो सर्व भूतांस समान पाहे

मद्भक्ति ही त्यासच दिव्य लाहे ॥५४॥

आहे खरोखर पहा जितका जसा मी

मद्भक्तिनेच कळतो तितुका तसा मी ।

हे जाणिल्यावरि असे मजलागि बा ! हे !

माझ्यांत तो मग मिळूनि सदैव राहे ॥५५॥

कर्मे जगी सकलही मम आश्रयाने

जो सर्वदा करितसे कृतनिश्चयाने ।

पार्था ! सदैव अविनाशक मत्प्रसाद

देईल त्यास पद शाश्वत निर्विवाद ॥५६॥

कर्मे मनापासुनि तू सदैव

अर्पूनि माझ्यावरि चित्त ठेव ।

ह्या बुद्धियोगास धरूनि पाही

मच्चित्त तू होउनि नित्य राही ॥५७॥

मच्चित्त झाल्यावरि दुःखरास

माझ्या प्रसादे तरशील खास ।

गर्वे जरी हे नच ऐकशील

निश्चिंत नाशाप्रति पावशील ॥५८॥

पोटी अहंकार धरूनि शुद्ध

तू बोलशी मी करितो न युद्ध ।

त सर्व मिथ्या प्रकृती तुझी ही

लावील युद्धास बळेच पाही ॥५९॥

स्वभावीक जे कर्म वाट्यास आले

तयाने तुला अर्जुना ! बद्ध केले ।

न भांडे म्हणे भ्रांति सारी तुझी ही

परी भांडसी यांत संदेह नाही ॥६०॥

ह्या सर्वभूती परमेश आहे

पार्था ! सदा तो हृदयात राहे ।

तो सर्व भूते फिरवी गरारा

घालूनि माया - चरकी भरारा ॥६१॥

आहे समस्त भरला जगतांत तोच

जाई तया शरण भाव धरूनि हाच ।

त्याच्या कृपेकरून शांति मिळेल खाशी

तू शीघ्र शाश्वत अशाच पदास जाशी ॥६२॥

हे ज्ञान बा ! परम गुह्य असून नामी

तू मत्सखा म्हणुनिया उपदेशिले मी ।

ह्याचा मनी धरूनि पूर्ण विचारहेतू

वाटेल ते मग पुढे करि अर्जुना ! तू ॥६३॥

गुह्यांतले परम गुह्य अझून एक

ते शेवटी कथितसे नीट ऐक ।

माझा सखा परम म्हणुनीच पाहे

ते सांगणे तव हितास्तव भाग आहे ॥६४॥

मद्भक्त हो चित्त धरी स्वरूपी

पूजा नमस्कार मलाच अर्पी ।

तू पावशी सत्य मलाच पाही

माझी प्रतिज्ञा परिसे सख्या ! ही ॥६५॥

हे अर्जुना ! सकल टाकुनि धर्म देई

तू भक्तिने शरण एक मलाच येई ।

पापांतुनी सकल ह्या तुजला विलोके

मी शीघ्र मुक्त करितो त्यज सर्व शोक ॥६६॥

सांगू नको हे तपहीन त्यास

किंवा अभक्तांस नकोनकोस ।

ऐकावयाची नच ज्यास आस

की दोष दे जो मजला तयास ॥६७॥

मद्भक्त जेथे असतील त्यांत

जो भक्ति माझी धरुनी मनांत ।

सांगेल हे गुह्य सदैव भावे

निःशंक तो जाण मलाच पावे ॥६८॥

कर्ता न मत्प्रिय असा मनुजांत कोणी

त्याच्याहुनी अधिक अन्य मनांत आणी ।

की त्याहुनी अधिक मत्प्रिय अन्य पाही

होणारही नाही पण पुढे जगतात नाही ॥६९॥

हा धर्म्य संवाद पठेल लोकी

माझा तुझा जो नियम विलोकी ।

तो ज्ञानयज्ञे करुनीच माते

पूजीतसे हे गमते मनाते ॥७०॥

श्रद्धा धरोनी परिसेल ह्याते

नावे न ठेवी कधिही तयाते ।

तो पावतो निर्मल लोक अंती

जो व्यापिला सर्वही पुण्यवंती ॥७१॥

हे ऐकिले ना ? विजया ! सख्यारे !

एकाग्रचित्ते तरि नीट सारे ।

संमोह अज्ञान निघूनि सांग

गेले तुझे की न अझूनि सांग ? ॥७२॥

अर्जुन --

स्मृती जाहली मोह नाशास गेला

प्रसादे तुझ्या अच्युता ! विश्वपाला ! ।

असंदेह मी जाहलो लोकताता !

तुझी भाषणे सर्व मानीन आता ॥७३॥

संजय --

संवाद नारायणार्जुनाचा

राजा ! महा अद्भुत होय साचा ।

ऐकोनिया प्रेम मनात दाटे

अद्याप येती शरीरास काटे ॥७४॥

कृपा असे मजवरी , श्री वासमुनींची

ह्या आशिर्वादे झाली , कृपा दिव्य दृष्टीची ।

परमयोग सांगे , श्री कृष्ण अर्जुनासी

कृपावंत , भाग्यवंत मी , म्हणे स्वतःशी ॥७५॥

संवाद असे हा कल्याणकारी

अद्भुत रहस्य , जाण भारी ।

वासुदेव वदता , अर्जुनासी

श्रवणी करता , हर्ष मनासी ॥७६॥

आठवता रूप , नित्य हरीचे

मनाशी सांगे नवल तयाचे ।

मनी होताची , आनंद उमाळी

हर्षे फुले मग , मनाची कळी ॥७७॥

असता जिथे श्री भगवान चक्रधारी

सखा म्हणती एक पार्थ गांडीवधारी ।

वसे तिथे यश विभूती नित्य जाण

मन दृढ होई मग कशासाठी प्रमाण ॥७८॥

अठरावा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP