भगवान --
गुह्यातले गुह्य असेच एक
सांगेन बापा ! तुज नीट ऐक ।
हे ज्ञान विज्ञानहि जाण हेतू
हो मुक्त सार्या अशुभांतुनी तू ॥१॥
ही राजविद्या अतिगुह्य मंत्र
प्रत्यक्ष लोकी फळते पवित्र ।
धर्मानुगामी सुखसाध्य लोकी
जे अक्षयी उत्तम हे विलोकी ॥२॥
श्रद्धा नसे ज्या पुरूषांस काही
ह्या श्रेष्ठ धर्मावरि अर्जुना ! ही ।
येतात ते की मज अंतरून
ह्या मृत्युसंसारपथी फिरून ॥३॥
अव्यक्तरूपे करूनी नरा हे
मी व्यापुनी सर्व जगास राहे ।
माझ्यांत हा भूतसमूह आहे
मी मात्र भूतात कधी न राहे ॥४॥
माझ्यात भूते नसतीहि सर्व
माझी कला हीच असे अपूर्व ।
पाळोनि भूता धरि त्यास पाही ।
माझाच आत्मा परि त्यात नाही ॥५॥
महद्वायु हा सर्वदा सर्वगामी
असे राहिला जेवि आकाशधामी ।
तशा रीतिने सर्व भूते पहा ती
स्वरूपामधे जाण माझ्या रहाती ॥६॥
कल्पांताच्या समयि मग ही अर्जुना ! सर्व भूते
मायेमाजी मिळुनि मिळुनी शीघ्र जाती लयाते ।
कल्पांच्या त्या फिरूनि दुसर्या जाण आरंभकाली
ज्यांना त्यांना पुनरपिअ जगी मीच जन्मास घाली ॥७॥
भूतांचा हा ग्राम सारा अनित्य
मायेला मी प्रेरूनी नित्य नित्य ।
वेळोवेळी निर्मितो आदरून
तोही मायाधीन होतो म्हणून ॥८॥
कर्मे परी ती करिती न बद्ध
पार्था ! मला मी असतोच शुद्ध ।
मी तो उदासीन असाच राही
कर्मात त्या लुब्ध कधीच नाही ॥९॥
अध्यक्ष मी जाण म्हणूनि माया
निर्मीतसे सर्व चराचरा या ।
तेणेच पार्था ! जग सर्व होते
पुन्हा पुन्हा ते विलयास जाते ॥१०॥
मानोनि मूढ मज मानवदेहधारी
माझा सदैव करिती अपमान भारी ।
भूतेश मी उचित ईश्वर थोर माना
सत्यस्वरूप मम हे न कळे तयांना ॥११॥
आशा कर्मे सर्वही सव्यसाची !
किंवा ज्ञाने व्यर्थ जे मूढ त्यांची ।
घेती जे का आसुरी दैत्यभाव
मोहामाजी पाडणारास्वभाव ॥१२॥
सेवोनि दैवीप्रकृतीस संत
भूतांस मी अव्यय आदि संत ।
जाणोनि मातेच अनन्यभावे
पार्था ! महात्मे भजती स्वभावे ॥१३॥
सदा माझिया कीर्तनामाजि दंग
प्रयत्नी व्रती निश्चयाचे अभंग ।
मला वंदिती सेविती भक्तियुक्त
सदा ठेवूनी चित्त आत्मानुरक्त ॥१४॥
ज्ञानाचेच करून यज्ञ हृदयी कोणी मला सेविती
एकत्वे भजती कितेक दुसरे भिन्नत्व रूपे किती ।
कोणी मानिति मीच सर्व भरलो माझीच सारी कला
ऐसे सर्व उपासिती जन पहा नाना प्रकारे मला ॥१५॥
आहे जगी ह्या क्रतु यज्ञ मीच
किंवा स्वधा औषध मंत्र मीच ।
की आज्य मी अग्निही मीच जाण
की होमही मीच असे प्रमाण ॥१६॥
माता पिता मी सकळा जगाचा
धाता विधाताहि तयांस साचा ।
ओंकार मे वेद्य पवित्र मीच
ऋग्वेद किंवा यजु साम मीच ॥१७॥
भूतांची गति निश्चये करुनि मी की त्या पालक
साक्षी अव्यय बीज मी सकलिका आहे जगच्चालक ।
होतो मी शरणागत वशही सर्वांस वासस्थल
उत्त्पत्ति स्थितीला निधान समया मी स्थानही निर्मल ॥१८॥
पार्था ! ह्या जगतात मीच तपतो की मीच वृष्टी करी
मी आवर्षण पाडितो कधी कधी पर्जन्यवृद्धे करी
आहे मोक्षहि मी जगी मरण मी ही खूण ठेवी मनी
जे जे सुंदर चांगले सकल मी वाईटही मी जनी ॥१९॥
वेदांचे तीन वेत्ते सतत करिति जे सोमपानास नित्य
प्रार्थूनी स्वर्ग माते दुरित निरसती सारुनी यज्ञकृत्य ।
देवेंद्राच्या सुखाच्या अनुपम जन ते पावुनि पुण्यलोकी
देवांचे दिव्यभोग प्रचुरतर असे भोगिती हे विलोकी ॥२०॥
भोगोनि ते सकल भोग सुरेंद्रलोकी
पुण्यपक्षे पडति येउनि मृत्युलोकी ।
कामी असे त्रिविध जे रत वेदधर्मी
ते सर्वदा भ्रमति ह्यापरि जन्मकर्मी ॥२१॥
चित्ते ठेवुनिया अनन्य मजला जे चिंतिती सर्वदा
किंवा मानुनिया तसेच हृदयी जे सेविती मत्पदा ।
माझ्या वाचुनि अन्य ज्यास पळही चित्ती नसे पाहणे
योगक्षेम सदैव भाग पडते त्यांचा वाहणे ॥२२॥
श्रद्धा मनात धरुनी किति भक्त लोकी
जे अन्य देव भजतात सदा विलोकी ।
ते पावते भजन सर्व मलाच बा ! रे
त्यांचे परी अविधिपूर्वक होय सारे ॥२३॥
यज्ञांचा ह्या सर्व भोक्ताहि मीच ।
किंवा त्यांचा जो प्रभू तोहि मीच ।
सत्त्यत्वाने जाणती जे न माते ।
सोडीना हा मृत्युसंसार त्यांते ॥२४॥
देवांचे जे भक्त ते देवलोकी
पित्रांचे ते पोचती पितृलोकी ।
भूतांचे ते भूतलोकास जाती
माते माझे भक्त ते पावताती ॥२५॥
जो भक्तिनेच मज देइल भक्त कोणी
हो पत्र पुष्प अथवा फल शुद्ध पाणी ।
ते पाहताच तदुपायन कंठ दाटे
खातो पितो सकल ते प्रिय फार वाटे ॥२६॥
ह्याकारणे सकल हे करितोस जे तू
खातोस यज्ञ करितोस धरूनि हेतू ।
देशील दान करिशी तप उग्ररुपी
पार्था ! सदा सकल ते मजलाच अर्पी ॥२७॥
होशी शुभाशुभ फलांतुनि तूहि मुक्त
की कर्मबंध तुटण्यासहि हेच उक्त ।
संन्यासयोग तुज साधुनि मुक्त होशी
तेणेच तू सहज पावशि मत्पदाशी ॥२८॥
सर्वात मी सम मला प्रियही न काही
की द्वेषही मम मनी लवलेश नाही ।
भक्ति प्रधान धरुनी भजतात माते
त्यांच्यात मी मजमधे वसती सदा ते ॥२९॥
अत्यंतही जरि दुराचरणी असेल
अद्वैत भक्ति धरूनी मजला भजेल ।
साधूच मान विजया ! तरि जाण तो की
त्याचा असे सुदृढ निश्चय दिव्य लोकी ॥३०॥
तो धर्मशील जन होउनि शीघ्र योगी
राहूनिया मम पदी चिरशांती भोगी ।
ध्यानात ठेव विजया विसरू न द्यावे
मद्भक्त होय जन तो नच नाश पावे ॥३१॥
मद्भक्त जे उपजले जरि पापवंशी
होवोत शूद्र युवती जन वैश्यवंशी ।
कोणी असोत मम भक्त महा समर्थ
होतील ते मम कृपे सगळे कृतार्थ ॥३२॥
राजर्षि की द्विज पवित्र असून भक्त
आश्चर्य काय मग होतिल तेहि मुक्त ।
हा लाभला क्षणिक दुःखद लोक तूते
ह्या कारणेच भज भक्ति धरून माते ॥३३॥
मद्रूप चित्त कर तू मम भक्त होई
पूजूनिया शरणही मजलाच येई ।
माझ्यामधे जरि तुझे मन ठेवशील
निश्चिंत तू मम पदाप्रति पावशील ॥३४॥
नववा अध्याय समाप्त .