अर्जुन --
अध्यात्म की ब्रम्ह तसेच कर्म
हे यादवा ! ह्यांतिल काय वर्म ।
कोणा म्हणावे अधिभूत देवा ?
की शब्द कोणा अधिदैव द्यावा ॥१॥
देवाधिदेवा ! अधियज्ञ जो तो
देहात या कोण कसा रहातो ।
ज्ञात्यास ज्या समवृत्ति झाली
कैशी घडे त्वत्स्मृति अंतःकाली ॥२॥
भगवान --
जे ब्रम्ह ते अक्षर शुद्ध जाण
स्वभाव अध्यात्म मनात आण ।
उत्पत्ति करि भूतभाव
त्याला पहा कर्म असेच नाव ॥३॥
हा देह नश्वर जगी अधिभूत जाण
आत्मा जिवांत अधिदैव असे प्रमाण ।
पाळीतसे वसुनि जो शरिरी जिवास
तो मीच सर्व शरिरी अधियज्ञ खास ॥४॥
अशा जो मला अंतकाळी विलोकी
स्मरोनी जगी आपुला देह टाकी ।
मिळे तो मला मत्स्वरूपात राही
नसे लेशही ह्यांत संदेह काही ॥५॥
ज्या ज्या वस्तुवरी सदैव मन हे गुंतून राहे जनी
अभ्यासे स्मरतात जाण सगळ्या त्या अंतकाळी मनी ।
अंती ही तनु टाकिता स्मरण हे ज्या वस्तुचे ज्या घडे
पार्था ! सत्वर जातसे जन तरी तो त्याच वस्तूकडे ॥६॥
तरी तू स्मरे नित्य माते मनांत
परी दाखवी शत्रुला दोन हात ।
मनोबुद्धि माते जरी अर्पिशील
तरी तू मला निश्चये पावशील ॥७॥
अभ्यासयोगे करुनीच पाही
अन्यत्र कोठे मन जात नाही ।
पार्था ! मला चिंतिति जे मनात
ते पावती त्या पुरूषोत्तमात ॥८॥
सर्वज्ञ शास्ता असुनी पुराणा
सूक्ष्माहुनी सूक्ष्म अचिंत्य जाणा ।
गावी न ज्याच्या तम हे ठरेल
जो सूर्यवर्णी पुरूष स्मरेल ॥९॥
प्राणप्रयाणसमयी मन आवरून
सद्भक्तिते धरुनि योगबळेकरून ।
प्राणास जो भ्रुकुटिमाजि धरून भावे
तो श्रेष्ठ दिव्य पुरूषा तरि त्याच पावे ॥१०॥
वेदज्ञ ज्या अक्षर बोलतात
ज्ञानी विरागी रिघती जयांत ।
हे ब्रहचर्यव्रत त्याचसाठी
मी सांगतो ते पदही किरिटी ॥११॥
कोंडोनि दारे सगळी मनास
लावी कराया हृदयात वास ।
जो मस्तकी प्राण धरूनी धीट ॥
ह्या योगयज्ञी स्थिर होय नीट ॥१२॥
एकाक्षरी प्रणव हा हृदयी धरून
जो ब्रम्हवाचक जपे मजला स्मरून ।
लागे जयास तनु टाकुनि शीघ्र जावे
तो सद्गतीस जन जाउनि जाण पावे ॥१३॥
चित्तामध्ये मीच अनन्य ज्याते
जे सर्व काळी स्मरतात माते ।
पार्था ! असे मीहि तयांस सोपा
योगी सदा मग्न अशांस बापा ॥१४॥
महात्मे किती पावती सिद्ध माते
सदा तेहि जातात की सत्पदाते ।
नसे शाश्वती ज्यास जो दुःखरास
पुनर्जन्म ऐसा नसे त्यांस खास ॥१५॥
फिरूनि फिरूनि सर्वां जन्म आहेत लोकी
नच चरक टळे हा ब्रम्हलोकी विलोकी ।
परि सुजन असा जो भक्त पावेल माते
पुनरपि नच पार्था ! जन्म हा जाण त्याते ॥१६॥
होती युगे एक सहस्त्र जेव्हा
होतो विधीचा दिन एक तेव्हा ।
तद्रात्र तैशीच महा विशाळ
हा काळवेत्ते गणतात काळ ॥१७॥
ब्रह्म्याचा जैं दिवस उगवे तेधवा भूतजाती
अव्यक्ताला त्यजुनि सगळी व्यक्तरूपास येती ।
जेव्हा त्याच दिवस सरुनी होतसे पूर्वरात्र
अव्यक्ती तैं मिळुनि सगळे लोपते व्यक्तिमात्र ॥१८॥
ऐसा भूतग्राम निर्माण होतो
होतो होतो होउनि लुप्त होतो ।
प्रातःकाली अर्जुना ! सर्व होते
रात्र्यारंभी तेच नाशास जाते ॥१९॥
अव्यक्त सत्त परि एक आहे
जी सर्वभूतात भरून राहे ।
जी भिन्न भूता प्रकृती परीस
ही विश्व जाता नच नाश तीस ॥२०॥
अव्यक्त अक्षर असे म्हणतात ज्याला
की बोलती परमसद्गतिही तयाला ।
येती न जेथूनी पुन्हा मिळता विराम
माझे असे परम सुंदर तेच धाम ॥२१॥
ज्याच्या मधे सकल ही असतात भूते
जो व्यापितो सतत ह्या सकला जगाते ।
अद्वैत परिपूर्ण जयास साधे
त्यालाच तो पुरूष उत्तम नित्य लाधे ॥२२॥
ज्या ज्या काळी योगिया जन्म नोहे
की ज्या काळी तो पुन्हा प्राप्त आहे ।
पार्था ! ऐसा काल मी एक एक
तूरते आता सांगतो नीट ऐक ॥२३॥
अग्नी ज्योत बरी असूनि दिवसा की शुक्लपक्षांतरी
षण्मासांतिल उत्तरायण तसे आहे जया भीतरी ।
ऐसा काल असून देह त्यजिती बा ! ब्रम्हवेती जरी
पार्था ! ब्रम्हपदास ते अढळशा निश्चिंत जाती तरी ॥२४॥
धूम रात्र कृष्ण पक्ष राहतो अशा दिनी ।
योगिया प्रयाण प्रयाण होय मास दक्षिणायनी ॥
जेम तेम जात जात चंद्रकांति पावुनी
येतसे जगावरी फिरूनि जन्म घेउनी ॥२५॥
शुक्ल कृष्ण ह्या गती जगास मान्य नित्यही
एक एक मागुत्या फिरूनि येति प्रत्यही ।
एकिने नरास जन्म येतसे पुन्हा पुन्हा
अन्य ती फिरूनिया जनास जन्म देइना ॥२६॥
मनी आणुनी नीट ही मार्ग दोन्ही
कधी योगिही मग्न होती न मोही ।
म्हणोनी तुला अर्जुना ! हेच उक्त
सहा सर्वदा होय तू योगयुक्त ॥२७॥
वेदांत की यज्ञतपामधेही
दानांत जे पुण्य फळेल काही ।
जाणोनि माते धरि न्यून त्याला
योगी चढे आद्य महत्पदाला ॥२८॥
आठवा अध्याय समाप्त .