अर्जुन --
सोडोनिया शास्त्रविधी कितेक
श्रद्धा धरोनी यजतात लोक ।
निष्ठा तयांची वद कोण लोकी ?
ती सात्विकी राजस तामसी की ॥१॥
भगवान --
श्रद्धा जिवांना घडती स्वभावे
भदे तया तीन परंतु नावे ।
त्या सात्विकी राजसि तामसी या
ऐकोनि घे तू तरि मित्रराया ॥२॥
श्रद्धा जिवांस जगतात विलोकी
सत्वानुरूप घडतात समस्त लोकी ।
श्रद्धास्वरूप नर हा असतोच साच
श्रद्धा जशी पुरूषही बनतो तसाच ॥३॥
भक्तियुक्त पूजितात देव सर्व सात्विक
राजसांस पूज्य फार यक्षराक्षसादिक ।
प्रेतभूत आवडी सदैव तामसी जना
ते तदीय चालवून राहती उपासना ॥४॥
नसे संमती लेश शास्त्रांत ज्याते
अशा घोर जे आचरीती तपाते ।
अहंकार की दंभ ही ज्यांस पोटी
बळे लोभ की आस ठेवोनि मोठी ॥५॥
दंडोनि देहास पहा सदैव
जे पीडिती त्यांतिल मूढ जीव ।
देहस्थ माझा छळ तोहि साचा
तो राक्षशी निश्चय जाण त्यांचा ॥६॥
सर्वांस आहारहि तीन जाण
होतात लोकी प्रिय हे प्रमाण ।
तैसेच त्यांचे तप आणि दान
तद्भेद ऐके तरि सावधान ॥७॥
आयुष्य सत्व बल होय जयांत वृद्धि
आरोग्यदायक महा करि सर्व सिद्धि ।
जे स्निग्ध पौष्टिक रसाळ करी प्रसन्न
ते सात्विकास असते प्रिय फार अन्न ॥८॥
अत्युष्ण आम्ल कटु , खारट तोंड जाळी
जे रुक्ष की तिखट झोंबुनि अश्रु गाळी ।
जे दुःख शोक बहु रोग सदैव देते
ते अन्न राजसजना प्रिय फार होते ॥९॥
जी वाळुनिया विटले उदंड
उष्टे शिळे की अपवित्र थंड ।
ना मीठ मिर्ची पुरता मसाला
ते आवडे भोजन तामसाला ॥१०॥
आशा फळाची तिळमात्र नाही
शास्त्रोक्त होती विधि सर्व काही ।
कर्तव्य भावे करितात ज्यांत
यज्ञास त्या सात्विक बोलतात ॥११॥
चित्ती फलाचे परिपूर्ण हाव
व्हाया जगी लौकिक थोर नाव ।
दंभार्थ पार्था ! करितात लोकी
जो यज्ञ तो राजस हे विलोकी ॥१२॥
ज्याच्यामधे मंत्र न अन्नदान
की दक्षणाही न विधी न मान ।
श्रद्धा म्हणोनी तिळमात्र नाही
तो अर्जुना ! तामस यज्ञ पाही ॥१३॥
भूदेव देव गुरू सन्मति थोर यांची
पूजा , पवित्रपण आर्जव सव्यसाची ।
की ब्रम्हचर्य धरणे करणे अहिंसा
ह्याला सह्रीरतप बोलति वीरपुसा ॥१४॥
लागे न अन्य हृदया बहु जे हिताचे
की बोलणे मृदु असे प्रिय सत्य वाचे ।
अभ्यास वेदपठणांत सदैव सिद्ध
आहे जगांत तप वाङ्मय हे प्रसिद्ध ॥१५॥
मौन प्रसन्न मन सौम्यपणा हे विशेष
की आत्मनिग्रह खरा करणे अशेष ।
संशुद्ध भाव धरणे निज अंतरांत
ह्याला जगांत तप मानस बोलतात ॥१६॥
जे एकनिष्ठ जन सोडुनिया फलास
ऐशा रिती त्रिविध ह्या करिती तपास ।
श्रद्धा धरूनि परिपूर्ण मनांत
त्याला जगांत तप सात्विक बोलतात ॥१७॥
सत्कार मान पसरो मम कीर्ति पाठी
दंभेकरूनि करिती तप ह्याचसाठी ।
हे बोलतात तप राजस लोक जाण
ते सर्व चंचल अशाश्वत हे प्रमाण ॥१८॥
मूढत्व सेवुनि धरोनि दुराग्रहाते
पीडोनि आत्मशरिरा करणे तपाते ।
जी व्हावयास्तव पुअरा निजशत्रुघात
लोकांत ह्यास तप तामस बोलतात ॥१९॥
केला नसे कधिंचही उपकार जेणे
देणे तया उचित दान म्हणून देणे ।
दे देश काल उचित पात्र बघोनि त्यांत
त्यालाच सात्विक जगी तप बोलतात ॥२०॥
देणे करील उपकार म्हणून खास
की इच्छुनी पुनरपी दृढ तत्फलास ।
देता मनांत करणे बहु दुःखशोक
ते दान राजस अस्र म्हणतात लोक ॥२१॥
हीनस्थळी बघुनि कुश्चित कालमान
पात्री अयोग्य करणे बहुसाल दान ।
ताठा धरूनि अवमान लोकी
ते दान तामस असे म्हणतात विलोकी ॥२२॥
ओंतत्सत् ह्या तीन शब्दांत पाहे
ब्रम्हाचाही एक उच्चार आहे ।
विप्रांनाही वेदयज्ञा म्हणून
केले पूर्वी ह्याच शब्दे करून ॥२३॥
ह्या कारणे जे जन वेदवादी
यज्ञक्रिया दान महातपादि ।
ओंकार उच्चार करून सारे
आरंभिती ते विधियुक्त बा रे ॥२४॥
तच्छ्ब्द उच्चारूनिया मुमुक्ष
ज्यांचा फलार्थे उघडे न चक्षु ।
ते यज्ञ दाने तप एक एक
ऐशा क्रियाही करिती अनेक ॥२५॥
सत्यत्व साधुत्व अशाच अर्था
सच्छब्द हा योजिति जाण पार्था ।
जे कर्म आहे जगती प्रशस्त
सत्कर्म त्याला म्हणति समस्त ॥२६॥
जे यज्ञदानी रत की तपांत
त्यांना जगी सज्जन बोलतात ।
जे कर्म त्यांच्यास्तव होय लोकी
सत्कर्म हे नाव तया विलोकी ॥२७॥
श्रद्धा नसोनी तप होम दान
जे होय मोठे अथवा लहान ।
पार्था ! असत् बोलति त्यास नामी
मेल्या जित्यांनाहि सदा निकामी ॥२८॥
सतरावा अध्याय समाप्त .