भगवान --
सर्वत्र निर्भयपणा तप सत्व शुद्धि
की ज्ञानभोग करण्यात सदैव बुद्धि ।
स्वाध्याय की सरलत दम इंद्रियांचा
की यज्ञ दान करणे विधि याज्ञिकांचा ॥१॥
अक्रोध निंदी न कदा विभूती
निष्काम निर्लोभ दयार्द्र भूती ।
लज्जा मनी मार्दव वीर पुसा !
सत्यत्व शांति स्थिरता अहिंसा ॥२॥
आंगी तेज पवित्रता विलसणे , धैर्य , क्षमासागर
कोणाचा अभिमान लेश नसणे , हेवा , न की मत्सर ।
दैवी संपदिचा असे पुरूष जो त्याच्या तनूभीतरी
हे सारे गुण राहतात विजया ! हे जाण तू अंतरी ॥३॥
नैष्टुर्य ताठा अभिमान कोप
अज्ञान दंभप्रद त्यांत रोप ।
जो जन्म घे आसुरि संपदेत
येती तया ही फलभोग देत ॥४॥
दैवी संपत्तियोगे अढळपद मिळे मोक्ष नामे प्रसिद्ध
संपत्ती आसुरीने सतत नर पहा निश्चये होय बद्ध ।
दैवी संपत्तिने तू नरवर पुरूषा ! अर्जुना ! जन्मलाशी
ह्यासाठी शोक सोडी अचल मन करी सर्वदा शौर्यराशी ॥५॥
जगी आसुरी आणि दैवी प्रसिद्ध
असे भेद भूतांमधे दोन सिद्ध ।
कथी स्पष्ट दैवी खुलासा करून
पुढे आयके आसुरी आदरून ॥६॥
नेणे कार्य करावया उचित की वाईट ते कोणते
नेणे लेश पवित्रता तिळभरी आचार ते कोणते ।
नाही ठाउक सत्य काय असते जन्मात ज्याच्या कदा
ऐसे लोक जिच्यामधे निपजती ती आसुरी संपदा ॥७॥
वेदांचे बंड खोटे म्हणति सकल ते सृष्टि आम्हीच केली
कर्त्ता तीते कशाला नरयुवतिमुळे मैथुनानेच झाली ।
भोळ्या लोकार्थ सारी बडबडति भटे धर्म थोतांड नीच
आहे तो ईश कोठे फुकट भिवविती ईश नाही मुळीच ॥८॥
ऐशी ज्यांची मते त्या सतत दिसतसे सर्व काही विरूद्ध
होवोनि भ्रष्टचित्त भ्रमति सकल ते नेणते अप्रबुद्ध ।
पाषाणाचे तयांचे हृदय गमतसे कृरकर्मी प्रघात
विश्वाचा जे कराया निवळ उपजती दुष्ट सर्वस्व घात ॥९॥
तृप्ती नाही कधी ज्या सतत धरिति तो काम जे आश्रयाला
जे का आसक्त होती सतत पुरूष बा ! दंभ की मान त्याला
होवोनी बद्ध मोहे अनुसरूनि सदा नास्तिकांच्या मताते
लोकांमाजी सदा जे अतिमिलन अशा आचरीती व्रताते ॥१०॥
कामाचे भोग सारे बहुत पसरले श्रेष्ठता त्यांत गावी
खावे प्यावे खुलावे अनुकुल पडली चैन मारून घ्यावी
लोकी कर्तव्य ते हे म्हणुनि समजती दृश्य जे तेच सत्य
चिंताग्नीने पहा ते तडफड करिती जन्मपर्यंत नित्य ॥११॥
काम क्रोधे ज्यास की दास केले
आशापाशे शेकडो बद्ध झाले ।
चैनीसाठी मेळवूनी घराशी
अन्यायाने आणिती द्रव्यराशी ॥१२॥
हे आज म्या मिळवले इतक्या धनास
की मेळवीन इतके उदईक खास ।
मद्द्रव्य आजे इतके शिलकीत आहे
होईल खास इतके उदईक पाहे ॥१३॥
म्या आज मारिले हे रिपुगण इतके शेष जे ते उद्याला
सर्वांचा ईश तो मी सुखदविषय जे मीच भोगीन त्याला ।
सत्ता सामर्थ्य माझे बघुनि चकित हे लोक होतात खास
सौख्याची खाण ती मी मजसम दुसरा कोण भोगी विलास ॥१४॥
मोठा श्रीमंत तो मी कुलहि मम पहा बोलती फार मोठे
ऐश्वर्याने सुखाने बहुल तर जन्मला कोण कोठे ।
आता आनंद सारा करिन खरचुनी यज्ञदानात वित्त
ऐसे मोहांध लोकी बडबड करिती अज्ञ जे भ्रष्टचित्त ॥१५॥
जे कामभोगी करिती खुशाली
गुंतूनि जे का नर मोहजाली ।
चित्तास त्यांच्या भ्रम होय थोर
जातात तेणे नरकात घोर ॥१६॥
गर्वे धनाच्या अभिमानयुक्त
आत्मस्तुतीचे परिपूर्ण भक्त ।
नावास दंभे ऋतुही करीती
नाही विधी त्या उलटीच रीती ॥१७॥
कामक्रोध अहंकृती धरुनिया की गर्व ताठा बळ
ह्यांच्या आधिन होउनी करिति जे निंदा जनांची खळ ।
राहे ईश्वर मीच सर्व अपुल्या किंवा दुजा अंतरी
द्वेष्टे ह्यास्तव जाण ते सकलही माझेच सर्वोपरी ॥१८॥
द्वेष्टे असे क्रूर जगांत लोक
होतात जे का विजया ! विलोक ।
जी राक्षसी दुःसह दुःख - रास
योनीत मी टाकितसे तयांस ॥१९॥
योनी ऐशी राक्षसी घेउनी ते
जन्मोजन्मी मूढ खातात गोते ।
तेथेही मी प्राप्त झालो न त्यांते
जाती पार्था ! ते तरी दुर्गतीते ॥२०॥
हा काम हा क्रोधहि लोभ बा रे ।
ही तीन मोठी नरकास दारे ।
जी आत्मघातास सदा तयार
सोडोनि ते ह्यास्तव होय पार ॥२१॥
ही पापकारक तमोमय तीन दारे
सोडोनि जो पुरूष होइल मुक्त बा रे ।
ज्याची मती निजहिताचरणी वळेल
त्यालाच उत्तम गती पुढती मिळेल ॥२२॥
मोडोनिया शास्त्रविधीस नामी
जे वागती शास्त्रविरूद्ध कामी ।
सिद्धी न त्यांना सुखही न काही
किंवा तयां दिव्यगतीही नाही ॥२३॥
ह्याकारणे सर्व अकार्यकार्या
शास्त्र प्रमाणे धरि शूरवर्या ।
जाणूनि तू सर्व विधिस बा ! रे
शास्त्राप्रमाणे करि कर्म सरि ॥२४॥
सोळावा अध्याय समाप्त .