मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
कौटुंबिक स्थिती

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - कौटुंबिक स्थिती

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


"शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी"
श्री महाराजांचे आजोबा लिंगोपंत हे शुक्ल यजुर्वेदीय देशस्थ ब्राह्यण. यांचा जन्म गोंदवले येथे शके १७०० ( म्हणजे इ. स. १७७८ ) च्या  सुमारास झाला. कुळातील मूळपुरूष रुद्रोपंत. यांचे आडनाव घुगरदरे. हे मोठे भगवद्‍भक्त असून पंढरीची वारी अगदी नियमाने करीत. त्यांचा भागवत संप्रदाय होता. ( ’आमुचे कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ’ ) ते मुख्यतः शेती करीत. रुद्रोपंतांपासून चवथे पुरूष म्हणजे श्री महाराजांचे आजोबा, हे आपले गाव सोडून गोंदवल्यास येऊन राहिले. कुळकर्णीपणाची त्यांची वृत्ती होती. घरी कुळकर्णीपण असले तरी सांपत्तिक स्थिती बेताचीच होती. आपल्या आजोबांपासून चालत आलेली पंढरीची वारी ते नियमाने करीत. सात्त्विक स्वभावाबद्दल व मनाच्या उदारपणाबद्दल त्यांची ख्याती होती. शेतामध्ये स्वतः खपण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांना झालेली पहिली तीन-चार मुले अल्पायुषी ठरली, म्हणून त्यांच्या पत्नीने शंकराची आराधना सुरू केली. तीन-चार वर्षे गेल्यावर मुलगा झाला. त्याचे नाव लिंगोपंत असे ठेवले. हे श्रीमहाराजांचे आजोबा. वयाच्या विसाव्या वर्षी लिंगोपंत कुळकर्णीपदाचे काम पाहू लागले.
लिंगोपंतांचा प्रपंच आदर्श होता. ते अत्यंत प्रामाणिक व परोपकारी होते. प्रापंचिक घडामोडींबरोबर परमेश्वराची भक्तीही मनापासून केली जात होती. ’पांडुरंग आमचे कुलदैवत । पांडुरंग आमुचे हित, गोत, चित्त ’ अशी द्दढतर श्रद्धा असून आषाढी - कार्तिकीची वारी सुरु होती. गळ्यात तुळशीची माळ असून ते मुद्रा लावीत. ’पांडुरंग पांडुरंग ’ असे नामस्मरण करण्याची त्यांना सवय होती. पंतांच्या सर्व गुणांस व योग्यतेस शोभेल अशी अत्यंत धार्मिक, देवभोळी व पतिसेवेविषयी तत्पर अशी सहचारिणी त्यांना मिळाली होती. एके दिवशी पंतांचे स्वप्नात प्रत्यक्ष पांडुरंग आले. त्यांनी पंतांना त्यांच्या मळ्यात नेले. तेथे एक विशिष्ट जागा दाखवून सांगितले ’तुला पंढरीला येऊन मला भेटणे म्हातारपणामुळे कठीण झाले आहे ना, याचे तुला वाईट वाटते म्हणून मीच तुझ्या घरी रहायला येत आहे. येथे खणून पहा म्हणजे मी सापडेन, देव दिसेनासे झाले व पंत जागे झाले. आपल्या सर्व मंडळींना झाले व पंत जागे झाले. आपल्या सर्व मंडळींना बोलावून पंत त्या मळ्याकडे जाण्यास निघाले. स्वप्नात दाखविलेल्या जागी बरोबरच्या लोकांनी खणण्यास सुरूवात केली. ३-४ हात खोदल्यावर खण्ण असा आवाज आला, तेथील माती बाजूला केल्यावर विठोबा-रखुमाईच्या सुंदर मूर्ती जणू काही कोणी नीट ठेवाव्यात अशा ठेवलेल्या आढळल्या.
" सदा माझे डोळा, जडो, जडो तुझी मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया " अशी स्तुती करुन पंतांनी आनंदाश्रू ढाळ्ले. नामस्मरणाच्या गजरात मोठया थाटाने त्या मूर्ती घरी आणून शुभमुहूर्तावर त्यांची स्थापना केली. सात दिवस भजन, कीर्तन, अत्रदान करून सर्व मंडळींना तृप्त केले. मूर्ती ज्या जागी सापडल्या तेथे आणखी खणल्यावर छान पाणी लागले, तिलाच ’विठोबाची विहीर ’ व त्या मळ्याला विठोबाचा मळा असे सर्व म्हणू लागले. पंतांच्या पत्नीचे नाव राधाबाई. हिचा सगळ्या घराला मोठा आधार असे. तिचा उदार व भोळा स्वभाव पाहून लोक तिला रूक्मिणी म्हणत. ती अत्यंत समाधानी व शांत स्वभावाची बाई होती. तिच्या पोटी श्रीमहाराजांचे वडील रावजी जन्मास आले. सहाव्या वर्षी लिंगोपंतांनी रावजीची थाटाने मुंज केली व बाराव्या वर्षी कलेढोणचे नारायणराव वाघमारे - इनामदार यांच्या मुलीशी लग्न लावून तिचे सासरचे नाव गीताबाई असे ठेवले. लिंगोपंतांनी रावजींना कुळकर्णीपणाचा सर्व व्यवहार शिकविला. तथापि त्यांचे चित्त प्रपंचात लागेना. ते नेहमी उदास असत. रावजींना एकान्तात बसून देवाची पूजाअर्चा, नामस्मरण व ध्यानधारणा करण्याची हौस असे. आपल्या नित्यनियमाच्या कांहीही आड आले तर ते रावजींना मुळीच खपत नसे. पहिल्यापासून रावजी गंभीर, अबोल व एकान्तप्रिय असल्याने लहानपणचे खेळ ते फारसे खेळले नाहींत. पुढे वयात आल्यावरही  पंतांसारखे कर्तबगार वडील डोक्यावर असल्याने आपल्या प्रपंचाकडे किंवा कुळकर्णीपणाच्या व्यवसायाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. स्नानसंध्या, गायत्रीजप आणि नामस्मरण यामध्ये रावजींनी आपला काळ घालविला. अंतर्यामी ते अतिविरल व नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे. ते आजन्म कधी खोटे बोलले नाहीत, त्यांनी कधी कुणाला फसवले नाही आणि परद्रव्याला चुकून सुद्धा कधी हात लावला नाही. रावजी प्रपंचामध्ये फारसे लक्ष घालीत नसल्याने देण्याघेण्याचे पुष्कळसे व्यवहार गीताबाईंनाच पाहावे लागत. त्यामुळे प्रपंचाची बहुतेक सर्व जबाबदारी सूनबाईंच्या अंगावर पडली. घरात नेहमी पाहुणेमंडळी, नोकर-चाकर व गुरे-ढोरे या सर्वांच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाला काय हवे, काय नको हे गीताबाई मनापासून पहात. वागण्यामध्ये आर्जव असल्यामुळे कुणाशीही कधी कुरबुर झाली नाही. पतीला जे आवडेल तेच आपले प्रिय मानीत. स्वतःच्या घरचा व्याप सांभाळून गीताबाई गरीब कूटूंबांची बाळंतपणे करीत. त्यांना औषधपाणी, दूध-दही व कपडा पुरवीत. "तुम्हाला काही द्यावेसे वाटते" असे कोणी म्हटले म्हणजे, "अहो, मला काय कमी आहे ? तुम्ही रामनामाचा रोज एक हजार जप करायचा नियम करा, त्यात सर्व काही मला मिळाले." असे उत्तर देत. काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस राहिले. गीताबाईंच्या वृत्तीमध्ये फरक पडू लागला.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP