१८८५
"भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला."
श्री गोंदवल्यास असल्यावर अनेक गमती जमती चालत. एकदा अशीच मंडळी बसली असता श्री बर्याच वर्षांपूर्वी हल्याळ नावाच्या गावी गेले असता तेथे घडलेल्या हकिकतीस सुरुवात झाली. श्री एके दिवशी हल्याळात भिक्षा मागण्यासाठी निघाले व एका घरासमोर ’जयजय रघुवीर समर्थ ’ करून उभे राहिले. घरातील बाई भिक्षा घालण्यासाठी बाहेर आली त्यावेळी ती अत्यंत दुःखी दिसली. श्रींनी तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले. ती म्हणाली, "१५ दिवसांपासून माझ्या मुलाला ताप येत आहे, व तो उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत." असे म्हणून ती रडू लागली. श्रींनी तिला धीर दिला व स्वतः त्या मुलाजवळ गेले, मुलगा निपचित पडून राहिला होता. आईने त्याला हाक मारली तेव्हा त्याने डोळे उघडले आणि दीनपणे श्रींकडे पाहिले. श्रींनी लगेच त्याच्या हातात पाणी दिले व ’मी माझा ताप तुम्हाला दिला ’ असे म्हणून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले. मुलाने तसे केल्यावर "बरे वाटेल, काळजी करू नये " असे आईला बोलून श्री निघून गेले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या परिचयाचे वासुदेव भट यांची गाठ पडली "दुपारी कोठे गेला होता ?" असे त्यांनी विचारल्यावर श्रींनी त्या मुलाची सर्व हकिकत सांगितली व "आता तो ताप मला भोगला पाहिजे, तापामध्ये तुम्ही माझी चौकशी करीत जा " असे त्यांना सांगितले. हे बोलणे होऊन काही दिवस गेल्यावर वासुदेव भट श्रींना म्हणाले, "गोसवीबुवा, त्या मुलाचा घेतलेला ताप तुम्ही केव्हा भोगणार ?" "अरे खरेच की, तो मुलगा जगला हे छान झाले. मी काय गोसावी, आता एक खोली मला रिकामी करून द्या." वासुदेव भटजींनी आपल्या घरातील एक खोली त्यांना दिली. श्री त्या खोलीत अकरा दिवसपर्यंत निजून होते. दार बंद करून घेतले होते तरी त्यांचे कण्हणे मधूनमधून ऐकू येई. बाराव्या दिवशी श्रींचा ताप उतरला. ते खोलीचे दार उघडून बाहेर आले. "भोग भोगून संपवला आहे, आता मऊ भात करून घाला. मी लवकर स्नान करून येतो." असे म्हणून श्री निघाले व लगेच विहिरीमध्ये उडी घेतली. वासुदेव भटजी विहिरीच्या काठावर बसले. अर्धा तास झाला तरी श्री वर येईनात, तेव्ह श्री खास बुडाले असे समजून भटजी रडू लागले. गावच्या पाटलाला ही माहिती सांगून त्यांना घेऊनच भटजी विहिरीपाशी आले; तो श्री काठावर बसलेले त्यांना आढळले. श्री कोणी सिद्धपुरुष आहेत अशी त्यांची खात्री झाली व लोकांची ये-जा सुरू झाली. श्री एके दिवशी कोणाला न कळवता हल्लयाळहून नाहीसे झाले. इतकी हकिकत सांगून होते, तोच कुरवळीचे दामोदरबुवा वासुदेव भटजींना घेऊनच श्रींच्या समोर हजर झाले. त्यांना पाहून श्री म्हणाले, "अरे अरे, वासुदेव भट, तुम्ही इकडे कुणीकडे ? तुम्ही किती थकला, आपल्याला भेटून फार वर्षे झाली, मी ज्याचा ताप घेतला तो मुलगा बरा आहे ना ?" हे शब्द ऐकल्याबरोबर भटजींन एकदम खूण पटली. त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. त्याचे असे झाले, दामोदरबुवा कुरवळीकर हल्लयाळला कीर्तनाच्या निमित्ताने गेले होते. कीर्तनात त्यांनी श्रींचे चरित्र वर्णन केले, हे ऐकून वासुदेव भटजींच्या मनात श्रींचे दर्शन घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा असे आले, म्हणून ते बुवांच्या बरोबर गोंदवल्यास येण्यास निघाले. आपल्या घरी राहिलेले ते हेच, ही कल्पना त्यांना नव्हती. आपल्या घरी राहिलेले सिद्धपुरुष ते हेच अशी ओखख पटल्यावर वासुदेव भटजींनी त्यांना एकदम साष्टांग नमस्कार घातला.