श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - त्रेसष्टावे वर्ष
आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.
१९०८
नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥
श्रींचे गाईंवर अतिशय प्रेम होते. अनेक गाई त्यांनी कसायापासून वाचवल्या. गोंदवल्यास मोठी गोशाळा बांधली. गोशाळेत जाऊन ते झाडलोट करीत. अभ्यंकर नावाच्या गृहस्थाला त्यांनी गोशाळेची व्यवस्था पाहण्यास नेमले. श्री स्वत: पुष्कळ गोप्रदाने देत. गोसेवेसाठी पुष्कळ खर्च येई, पण श्रींना त्याची दिक्कत नसे. गाईंचेही श्रींवर फार प्रेम असे. एका महारोग्याला त्यांनी गोसेवा करायला लावली आणि त्याचा रोग पुष्कळ बरा झाला.गोरक्षणाचे कार्य पाहून श्री चौडेबुवा श्रींच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आले. श्रींनी त्यांना कफनी दिली व सांगितले, " गाईंचे रक्षण आणि सेवा भगवंतासाठी असावी व ही जाणीव राहण्यासाठी भगवंताचे नाम सतत घेत असावे, म्हणजे तो आपल्याला मदत करतो."
श्रींचे गाईंवर अलोट प्रेम असे. तसे त्यांचा आवडता बत्ताशा घोडा, एकादशी करणारे त्यांचे कुत्रे, त्यांच्यामागे चारापाणी सोडून राहणारा त्यांचा बैल, विशेष आवडणारी गंगी गाय या सर्व प्राण्यांचे त्यांच्यावर असणारे अलोट प्रेम पाहिले म्हणजे कौतुक वाटते. गोशाळेतील गाईंचे कळप व वासरांचा समुदाय पाहून श्रींना प्रेमाचे भरते येई व डोळ्यातून अश्रूधारा येत. मोठ्या दुष्काळात श्रींनी गरीब जनतेला जी अचाट मदत केली ते पाहूत औंधचा राजासुद्धा थक्क होऊन गेला. राजा व त्याची बायको गोंदवल्यास अधून मधून येत व श्रींचे दर्शन घेऊन जात. कालांतराने राजा मरण पावल्यावर संस्थानच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले. खटपटी लटपटी करुन खोटे कागद करणे, दागिने लांबविणे, वाईट सल्ला देणे वगैरे गोष्टी सुरु झाल्यावर मुंबई सरकारने जेकब नावाच्या कलेक्टरला तेथे प्रशासक म्हणून नेमले. पुढे राजघराण्यातील भांडणे पाहून त्याने पैसे खाण्यास सुरुवात केली. श्रींच्या आज्ञेप्रमाणे लोक वागतात हे त्याला सहन न होऊन त्याने श्रींना विष घालण्याचे कारस्थान रचले. ३/४ माणसे त्याने गोंदवल्यास त्याकरिता पाठविली पण ती श्रींना वश होऊन त्याचा अनुग्रह घेऊन गेली. चवथ्या माणसाने श्रींना घरी जेवावयास बोलावले.ताट वाढून, रामाला नैवेद्य पाठविला. श्रींनी तो नैवेद्य जमिनीत पुरायला सांगितले व त्याचे अंत:करण दुखावेल म्हणून एकटेच त्याच्याकडे जेवावयास गेले. सोमल विष घातलेला प्रसाद श्रींनी बिनदिक्क्त खाल्ला. तासाभराने त्यांच्या पोटात खूप आग होऊ लागली म्हणून श्रींनी ओंजळभर वेलदोडे खाल्ले. रात्री पोटातील आग कमी झाल्यावर श्री रामापुढे भजणास उभे राहिले. दोन तास उत्तम भजन निरुपण केले. एक स्वरचित अभंग म्हटला, "काय पाहता श्रेष्ट जन। काळ आला हो कठीण ॥१॥ नका भुलू भलत्या भ्रमी । नाम जपा अंतर्यामी ॥२॥ भूल पडली कलियुगी । असत्याला जन राजी ॥३॥ करा असत्याचा कंटाळा । नाम जपा वेळोवेळा ॥४॥ जेथे तेथे बुद्धिभेद । मिथ्या म्हणती शास्त्र वेद ॥५॥ नाम सांगता जनासी । विष देऊ येते त्यासी ॥६॥ दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥७॥ विषप्राशनानंतर श्रींना दमा सुरु झाला. तो शेवटपर्यंत राहिला. ते दिवस स्वदेशीचे होते. एकाने श्रींना लाहानसा साखरेचा कारखाना काढण्याचा सल्ला दिला व त्याप्रमाणे सर्व यंत्रे आणविली. श्रीनी स्वत: खर्च केला. यंत्र आल्यावर श्रींनी माहीतगार माणसाकडून ती बसवून घेतली. नंतर ऊस आणून साखर तयार केली. साखरेचे कौतुक झाले, पुढे तो व्याप मागे पडला तो कायमचाच. त्याचप्रमाणे नदीपासून मंदिरापर्यंत आणण्यासाठी नळही बसवून घेतले. पुढे मंदिरापर्यंत पाणी आले, श्रींनी त्याचे मोठे कौतुक केले. २/४ दिवस पाणी आले, पुढे काही ना काही कारणाने नळाचे पाणी बंद झाले. श्री म्हणाले, "जितकी सोय तितका परावलंबीपणा जास्त. शहरातल्या सर्वच सोयी खेड्यात आणण्याचा फार प्रयत्न करु नये." श्रींना नवीननवीन कल्पना आवडत होत्या व त्या प्रत्यक्षातही आणीत. खेड्यातल्या राहणीच्या द्दष्टीने त्यांचा कितपत फायदा होईल हे जाणून त्यांचा वापर मर्यादित ठेवत.
N/A
References : N/A
Last Updated : February 05, 2011
TOP