मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
चौदावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चौदावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१८५९
"पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो."
श्री हैद्राबादमध्ये एका नदीच्या काठी एकांत स्थळी बसून विचार करीत होते. त्यांच्या मनात आले की, आपण गुरुशोधार्थ इतके हिंडलो मोठमोठे महात्मे पाहिले, सर्वांनी आशीर्वाद दिले; पण आपले काम करणारा निराळा आहे असे सांगितले, आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा." हे विचार चालू असता एकदम श्रीसमर्थ संप्रदायातले मोठे सत्पुरुष श्रीरामकृष्ण तेथे प्रकट झाले आणि बोलले, "बाळ, येहळेगावच्या तुकारामचैतन्यांकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान होईल." हे शब्द बोलून ते पाहता पाहता नाहींसे झाले. श्री तेथून पैठण, जालना, नांदेडवरून येहळेगावला पोहोचले. श्री येण्याच्या अगोदर तीन दिवस तुकामाई सारखे ओरडत असत, "अरे चोर येणार येणार आणि सगळे लुटून नेणार. सांभाळा रे सांभाळा " श्री येहळेगावी आल्यावर तुकामाईंना सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोधले परंतु त्यांचा काही पत्ता लागेना. तुकामाईंच्या घराच्या बाजूला श्री भिंतीला टेकून बसले होते. १५/२० मिनिटांनी तुकामाई आले. कमरेला लंगोटी, डोक्याला टोपडे, एका हातात चिलीम आणि दुसर्‍या हातात ऊसाचे दांडके घेतलेले. अशी मूर्ती पाहिल्याबरोबर श्री उभे राहिले. दोघांची द्दष्टाद्दष्ट होण्याचा अवकाश की, "तुझा खून करतो " असे ओरडून तुकामाईने उसाचे दांडके उगारले । आणि "मी पण माझा जीव देतो " असे बोलून श्रींनी त्यांच्या चरणांवर साष्टांग नमस्कार घातला. तुकामाईंना आनंदाचे भरते आले. श्रींना उचलून त्यांनी पोटाशी धरले व हात धरून घरी नेले. तुकामाईंना पाहताच श्रींच्या मनाला अत्यंत समाधान वाटले. आणि आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्याजवळ खात्रीने मिळेल असा विश्र्वास उत्पत्र झाला. श्रींनी तुकामाईंची नऊ महिने अत्यंत चिकाटीने व मनापासून सेवा केली. श्रींची चित्तवॄत्ती त्यांच्याठायी पूर्णपणे चिकटली. एवढया लहान वयात गुरूंशी कसे वागावे हे त्यांना कसे कळले याचे राहून राहून आश्चर्य वाटते. जागृतीमध्ये व स्वप्नामध्ये एका तुकामाईवाचून अन्य कशाचेही चिंतन श्रींनी केले नाही. देहाभिमान शून्य झाल्याची तुकामाईंना खात्री झाल्यावर नऊ महिन्यांनंतर श्रींना रामनवमीच्या दिवशी विहिरीबर स्नान करून अशोक वृक्षाच्या खाली हात धरून आपल्यासमोर बसवले व म्हणाले, "मी तुला आजवर फार कष्ट दिले, पण पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी तुला या क्षणी देतो " असे सांगून श्रींच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. श्रींना तक्ताळ समाधी लागली. समाधी उतरल्यावर त्यांचे "ब्रह्यचैतन्य " असे नाव ठेवले, आणि अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले. "श्रीराम जयराम जयजय राम " हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावी, असे सांगून तुकामाईंनी श्रींना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. " प्रापंचिक लोकांना, विशेषतः मध्यम स्थितीतल्या लोकांना प्रपंचामध्ये परमार्थ कसा करावा हे शिकव. राममंदिरांची स्थापन करून रामनामाचा प्रसार कर. माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्रीसमर्थांचे महत्त्व वाढव. जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम बाढेल असा उपाय कर " इतक्या गोष्टी तुकामाईंनी श्रींना करण्यास सांगितल्या. या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर आला होता. अनुग्रह झाल्यावर तुकामाई श्रींना म्हणाले, "आत्मज्ञान झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे, त्यासाठी एकांतात राहून खोल आत्मचिंतन करायला पाहिजे. म्हणून तू आता हिमालयाकडे जा. तेथे थोडा काळ एकांतात घालवून मोठया तीर्थांचे दर्शन घे व मग आईबापांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा."

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP