श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - मानसपूजा
आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.
मानसपूजा
सकाळीं लवकर उठावें । भगवंताचें स्मरण करावें ॥
हातपाय स्वच्छ धुवावे । मानसपूजा करावी ॥
ह्रदयांत ठेवावें रामाचे ठाणें । षोडशोपचारें करावें पूजन ॥
गंधफूल करावें अर्पण । नैवेद्य करावा अर्पणा ।
मनाने प्रसाद घ्यावा जाण ॥
शेवटी करावी प्रार्थना एक । रामा तुला मी शरण देख ॥
जें जें म्हटलें मी माझें | तें तें सर्व रामा तुझें ॥
आतां न गुंतवा माझें मन । रामा मी आलो तुला शरण ॥
वासना न उठो दुजी कांहीं । नामामध्यें प्रेम भरपूर देई ॥
सदा राहावे समाधान । जें तुझे कृपेवांचून नाहीं जाण ॥
नीतिधर्माचें आचरण । तुझे कृपेने व्हावे जतन ॥
न मागणें आतां कांहीं । मी तुझ्यासाठीं जिवंत पाही ॥
आतां द्या नामाचे अखंड स्मरण । देह केला तुला अर्पण ॥
रामा जें जें कांहीं तूं करी । तुझा विसर न पडो अंतरीं ॥
तुझे नामाची आवडी । याहून दुजें मागणे नसावें उरी ॥
हेचि द्यावे मला दान । दीन आलों तुला शरण ॥
रामा मला एकच द्यावें । तुझें अनुसंधान टिकावें ॥
नको नको ब्रह्यज्ञान । काव्यशास्त्रव्युत्पत्तीचें ज्ञान ॥
कामक्रोधाचे विकार । जाळताति वारंवार ॥
आतां तारी अथवा मारी । तुझी कांस कधीं न सोडीं॥
रामा अन्यायाच्या कोटी । तूंच माय घाली पोटीं ॥
मातेलागीं आले शरण । त्याला नाही दिले मरण ॥
ऐसें ऐकिलें आजवर । कृपा करी तूं रघुवीर ॥
दाता राम हें जाणून चित्तीं । म्हणून आलों दाराप्रती ॥
आतां रामा नको पाहूं अंत । तुजवीण शून्य वाटे जगत ॥
ज्याचा ज्याचा केला मी स्वार्थ । तें तें झाले दुःखाला कारण ॥
आतां राम सुखदुःख दोन्ही । केले अर्पण तुझे चरणीं ॥
आतां मनास येई तसे ठेवी । यावीण दुजे न मागणे कांहीं ॥
ऐसे कोठें पहावें स्थान । जेथें होईल समाधान ॥
भिकारी आला दारीं । त्याला दाता दूर न सारी ॥
ही आजवर ऐकीली कीर्ति । धांवत आलो रघुपति ॥
आतां मनास येई तैसे करीं । मी पडलों तुझ्या दारीं ॥
आतां रामा तुझा झालों । कर्तेपणांतून मुक्त झालों ॥
माझें सर्व तें तुझे पाहीं । माझे मीपण हिरोन जाई ॥
रामा आतां एकच करी । वृत्ति सदा राहो तुझेवरी ॥
रामा मी कोठें जावें । तुजवांचून कोठें राहावें !॥
देहबुद्धीची नड फार । ती करावी रामा तुम्ही दूर ॥
आजवर विषय केला आपलासा । न ओळखितां पडलो त्याच्या फांसा ॥
रामा सर्व सत्ता तुझ्या हातीं । समाधान राहील अशी करावी वृत्ति ।
तुमचेजवळ मागणे दुजें नाहीं । ह्रदयांत तुझा वास अखंख राही ॥
आतां तुझ्यासाठीं माझे जीवन । तुला तनमन केलें अर्पण ॥
तुमचे चिंतनीं लागावे मन । तुला तनमन केलें अर्पण ॥
तुमचे चिंतनी लागावे मन । कृपा करा रघुनंदन ॥
ऐसे करावे रामाचे स्तवन । रक्षण करता एक भगवंत मनीं आणून ॥
ऐसे व्हावे अनन्य दीन । तात्काळ भेटेल रघुनंदन ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 05, 2011
TOP