मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
त्रेचाळीसावे व चव्वेचाळिसावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - त्रेचाळीसावे व चव्वेचाळिसावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१८८८-८९
"आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल."
श्रींनी मंदिर बांधण्यास आरंभ केला खरा, पण मूर्तींच्या विषयी काहीच खटपट दिसेना, म्हणून लोक त्यांना मूर्तिंच्याबद्दल विचारीत, तेव्हा श्री उत्तर देत, "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपण होऊनच येईल." याप्रमाणे गोंदवल्याचे मंदिर बांधण्याचे काम चालू असता, तडवळे या गावी निराळाच प्रकार घडला. त्या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत असून भाविक होते. त्यांच्या मनात रामाचे मंदिर बांधावे असे येऊन त्यांनी त्यासाठी पुष्कळ पैसा साठवला होता. तसेच त्यांनी राम, लक्ष्मण व सीता अशा तीन मूर्ती करवून आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या. बराच पैसा जमल्यावर कुलकर्ण्यांनी मोठा व सुरेख वाडा बांधला. परंतु दुर्दैवाने एके दिवशी त्याला आग लागून सगळा वाडा भस्मसात झाला. आगीमध्ये मूर्तींना पण थोडीशी झळ लागली. काही दिवस गेल्यावर त्या कुलकर्ण्यांना लागोपाठ तीन दिवस स्वप्नामध्ये त्यांनी करवून आणलेली रामची मूर्ति येई आणि त्यांना सांगे "मला तू इथे किती दिवस कोंडून ठेवणार ? मला गोंदवल्यास ब्रह्यचैतन्यांकडे नेऊन दे." याच सुमारास त्यांना कळले की गोंदवल्यास श्रीमहाराजमंदिर बांधीत आहेत म्हणून त्यांनी आपण होऊन तिन्ही मूर्ति श्रींना गोंदवल्यास आणून दिल्या. ज्या दिवशी मूर्ति आल्या त्या दिवशी रविवार होता. सकाळी उठल्याबरोबर श्री म्हणाले, "आजकोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार असे मला वाटते, म्हणून आजाआपण सगळेजण उपवास करून भजन आणि नामस्मरण करू." त्यांच्या सांगण्यावरून सर्वांनी स्नाने आटोपून घेतली. फराळासाठी दाण्याची उसळ व उकडलेल्या रताळ्याच्या फोडी केल्या होत्या. श्रींनी स्वतः आपल्या हाताने मजुरांसकट सर्व लोकांना फराळाचे दिले. आपण मात्र नैवेद्याचे वाटीभर दूध तेवढे घेतले. दुपारी एक वाजता श्री भजनाला उभे राहिले. दोन तास सुंदर भजन झाल्यावर श्रींनी दोन माणसांना रस्त्यावर जाऊन बसण्यास सांगितले व कोणी येताना दिसल्यास लगेच वर्दी देण्याचे सूचित केले. संध्याकाळी चार वाजता दोन गाडया येताना दिसल्या, त्यांची विचारपूस करता ते तडवळचे कुलकर्णी असून श्रींना देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहेत असे कळले. ही बातमी श्रींना पोचल्यावर लगेच "जयजय श्रीराम " घोष करीत ते सर्व मंडळींसह श्रीरामरायाला सामोरे गेले. श्रींनी स्वतः मूर्तीवरून भाकरी ओवाळून टाकली, आणि मोठया प्रेमाने भजन करीत सर्व मंडळी घरी आली. दुसर्‍या दिवशी त्यांनी उपवासाचे पारणे केले आणि कुलकर्ण्यांना निरोप दिला. पुढे श्रींनी एका चांगल्या कारागिराकडून तिन्ही मूर्तींना उजाळा दिला व त्यांचे जळकेपण पुष्कळ कमी करून घेतले. पुढे श्रींनी म्हासुरर्णेकर शास्त्रीबुवांच्या संमतीने मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरविला. बापूसाहेब माने यांना सिंहासन तयार करण्यास सांगितले. अशा रीतीने श्रीरामरायांच्या मूर्ती स्थापनेची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली.

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP