मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
एकसष्ठावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकसष्ठावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१९०६
शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात.
हर्द्यास या मुक्कामात हर्दा गावात प्लेगची साथ खूप फैलावू लागली. त्यामुळे हर्दा राममंदिराचे विश्वस्त काशीनाथ भैय्या यांच्या मळ्याशेजारच्या शेतात सर्वजण झोपड्या बांधून राहण्यास गेले. श्रीही बरोबरच्या मंडळींसह तेथे राहण्यास आले. बाहेरगावच्या मंडळींचीही दर्शनासाठी ये - जा सुरुच होती. प्रोफेसर भानू, चौंडेबुवा वगैरे मंडळी येथेच श्रींना भेटली. एकदा तेथे स्वयंपाक करणार्‍या बायका श्रींना भेटल्या व म्हणाल्या, " महाराज, आज नैवेद्याला भाजी नाही," श्री एकदम म्हणाले, "तुम्ही एवढ्या उशीरा का सांगता  ? श्रींनी लगेच माळ्याला बोलावून घेतले. त्याने सांगितले, "मळ्यात आता कोणतीही भाजी नाही, वांगी लावली आहेत पण फक्त फूल धरले आहे, अजून फळ लागले नाही." त्यावर श्री म्हणाले," असे कसे होईल, फुले आहेत तेथे फळ असलेच पाहिजे." असे बोलून ते मळ्याकडे निघाले व जयराम माळ्याला पोते घेऊन बोलावले. वांग्याच्या रोपाकडे पाहून श्री म्हणाले, " अरे, त्या पानाखालीपहा," जयरामने पान बाजूला केल्यावर मोठे वांगे दिसले. अशा तर्‍हेने प्रत्येक वांग्याच्या फुलापानाखाली श्रींनी पोते भरुन वांगी जमा केली. जयराम स्वत: माळीच असल्यामुळे हा प्रकार पाहून थक्कच झाला. त्या दिवशीचा भाजीचा प्रश्न श्रींनी त्वरित सोडवला. श्रींना भेटायला येणार्‍यांमध्ये दामुअण्णा नावाचा एक मोठा वेदांती होता. आपल्या सर्व शंका श्रींना विचारुन घ्याव्या असे वाटल्यावरुन श्री निरुपणाला बसले म्हणजे श्रींच्या जवळ तो बसत असे. श्री एखादी ओवी निरुपणासाठी घेत व आपणच शंका उत्पन्न करुन त्यांची उत्तरे देत. अशा रीतीने सर्व शंकांची उत्तरे मिळालावर श्रींचे आभार मानून तो निरोप घेण्यास आला व म्हणाला, "महाराज माझ्या सर्व शंकांची उत्तरे मिळाली. माझे समाधान झाले." श्री म्हणाले, " शंका फार चिवट असतात. त्या आचरणाने व अनुभवाने नाहीशी होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. हर्द्याहूनच श्री अयोध्य्ला गेले व तेथून पुढे नैमिषारण्यात गेले. नानासाहेब पेशवे यांना "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन" असे वचन दिले असल्याने श्री तेथे त्यांच्याकडे गेले. नानासाहेबांचे वय ८२ च्या आसपास होते, कफ खूप झाला होता, तापही येत होता, ताप काही उतरेना. तेव्हा ते डोळ्यात प्राण आणून श्रींची प्रतीक्षा करीत होते. श्री जेव्हा त्यांच्यापाशी आले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. श्री त्यांना म्हणाले, " आपण जिंकले आहे, आता सतत नामात रहा. भगवंत आपल्या उशाशी आहे." श्रींनी त्यांना मांडीवर घेतले. तोंडात गंगा घातली. नंतर डोळे उघडून त्यांनी सर्वांना नमस्कार केला व "हे राम, महाराज, रामा चल मी येतो." असे बोलून देह ठेवला. श्रींनी स्वत: त्यांना अग्नि दिला व त्यांच्या अस्थि प्रयागला स्वत: गंगेत टाकल्या. त्यांचा अंतकाल १ नोव्हेंबर झाला असावा. साधारणपणे ३ आठवड्यांनी श्री नैमिषारण्याहून हर्द्याला परत आले. श्रींच्या बरोबर एक सात्त्विक, देवावर प्रेम करणारा भटजी होता. श्री एकदा सहज म्हणाले, " जो मनुष्य ३॥ कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही." भटजीने हे ऐकून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप सतत सुरु केला. त्याला देवाची स्वप्ने पडत व श्री स्वत: स्वप्नात दिसत. जपसंख्या पूर्ण झाल्यावर तो श्रींना सारखा म्हणे," मला देव दाखवा." श्रींनी त्याला पुष्कळ सांगून पाहिले की,"देवाचे दर्शन होते म्हणजे काय होते, देवाच्या प्रेमाचा अनुभव कसा असतो" परंतु त्याच्या मेंदूवर ताण पडल्याने त्याला विचारशक्तीच उरली नाही. एक दिवस तो श्रींना म्हणाला, "मला देव दाखवा त्याशिवाय मी अन्न घेणार नाही, विहिरीत जीव देईन." श्री मग त्याच्याकडे गेले व पायातील खडावा त्याच्या कपाळावर, डोल्यावर हाणल्या, त्याबरोबर त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रींनी त्याला पोटाशी धरले व म्हटले," त्याच्या डोळ्यातून पाणी आले नसते तर हा वेडा झाला असता. भगवंत हा हट्टाने व कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. परमार्थ हा आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये."

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP