श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पहिले वर्ष
आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.
१८४५-४६
तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ?
गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्रीसमर्थांच्यावर होती. गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचीत आणि रामनामाचा जप करीत. डोहाळे सुरू झाल्यावर त्यांनी अखंड रामनामाचा सपाटा सुरू केला. पुष्कळ वेळा त्यांना बसल्या ठिकाणीच तंद्री लागे आणि कानात कोणीतरी रामनाम घेत आहे असे स्पष्ट ऐकू येई. पुढे त्या मारूतीरायांचे ध्यान करू लागल्या. सौ. गीताबाईंचे दिवस भरले आणि शके १७६६ ( इ. सन १८४५ ) माघ महिन्यातील शुद्ध एकादशीचे रात्रीचे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाचे सुमारास गोंदवले येथे श्रीमहाराजांचा जन्म झाला. आपल्याला नातू झाला म्हणून पंतांना परमानंद झाला व प्रेमाने त्यांनी पांडुरंगावर फुले उधळली. पंतांनी बाळाचे बारसे एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटात केले. खूप अत्रदान केले. सर्वांच्या संमतीने बाळाचे नाव ’गणपती ’ असे ठेवले. तान्हेपणी श्री स्थूलदेही व गौरकाय होते व चार महिन्यांच्या मुलाएवढे मोठे वाटत. सुरेख नाक, तेजस्वी चकाकणारे डोळे, भव्य कपाळ व पुष्कळ काळे केस असलेले हे तान्हे बाळ आई-बापाचेच काय पण शेजारपाजारच्या सर्व लोकांचे जीव की प्राण होऊन बसले. रावजी एवढे संसारातून विरक्त असले तरी मधून बाळ काय करतो हे पाहून जात आणि म्हणत, "याला पाहिले की कसे मनाला समाधान वाटते." पाच महिन्यांचा झाल्यावर श्रीमहाराज रांगू लागले. अतिचपळ असल्याने त्यांना खाली ठेवण्याची सोयच नव्हती. त्यांना मोकळे ठेवले की ते भरभर देवांच्याकडे जाऊन त्या सर्वांना आपल्या आसनावरून खाली काढीत, नाहीतर सरळ गायींच्याकडे जात. पुष्कळ वेळा शेजारच्या बायका त्यांना आपल्या घरी घेऊन जात व आपल्या घरी त्यांच्याशी खेळत बसत. खोडयांच्या भीतिने आईला त्यांना सारखे कडेवर घेऊन फिरवावे लागे. श्रीमहाराजांना भजनाची फार आवड होती. घरात रात्रीचे भजन सुरू झाले की तिकढे घेऊन जाण्यासाठी ते रडत असत. आजा-आजीला नातवाचा फार लळा लागल. एकदा सकाळी रावजी स्नान करून आले होते, त्यांच्या संध्येची -पूजेची तयारी करून द्यायची होती. श्रीमहाराजांना कडेवर घेऊन चटचट काम उरकता येईना म्हणून त्या म्हणाल्या, "तुला सारखे कडेवर घेऊन मी काम कशी रे करू ? जरा बस खाली " असे बोलून त्यांनी श्रींना खाली ठेवले व आपण कामाला लागल्या. श्रींनी लगेच जो आ पसरला तो काही केल्या बंद करेनात, तेव्हा पंत आत आले, बाळाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण बाळाचे रडणे थांबेना, तेव्हा पंत मंदिरात गेले, तेथील अंगारा घेतला, पांडूरंगाची प्रार्थना करून तो अंगारा श्रींच्या कपाळाला लावला व म्हणाले, "तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ?" तेव्हा श्रींनी रडणे थांबवले व एकदम हसले.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2011
TOP