१८७५
"आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही."
याच सुमारास सरस्वतीला दिवस राहिले. गीताबाईंना फार आनंद झाला. त्यांनी आपल्या सुनेचे अनेकपरीने कौतुक केले. नऊ महिने पूर्ण झाल्यावर सरस्वती बाळंत होऊन तिला मुलगा झाला. तो हुबेहुब श्रींसारखा दिसे. आपल्या नातवाचे थाटाने बारसे करावे असे गीताबाईंच्या मनात आले. परंतु श्रींनी मोठया खुबीने बारसेच करण्याचे टाळले. सरस्वतीला ही कल्पना होती. एका वर्षाच्या आतच तो मुलगा परलोकवासी झाला. नंतर सरस्वतीला थोडया दिवसांनी ताप येऊ लागला. कोणत्याही प्रसंगाला निर्भयपणे तयार राहण्याइतके उपासनेचे तेज तिच्यापाशी होते. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे वाटून तिने स्वतःला स्नान घालण्यास सांगितले, नंतर आपल्या सासू-सासर्यांच्या पाया पडली. श्रींच्या पायांचे तीर्थ घेतले. आणि सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडला. पुढे इंदूरला जीजीबाई फार आजारी आहे असे कळल्यावरून श्री इंदूरला गेले. काही दिवसांनी श्री मुंडन करून आले, लोकांना फार आश्र्चर्य वाटले, कारण विचारल्यावर श्री म्हणाले, "आज आमचे वडील वैकुंठवासी झाले." इकडे गोंदवल्यास रावजी वारल्यामुळे गीताबाईंना फार दुःख झाले, श्रीही तेथे नसल्याने दुःखात भर पडली. उत्तरक्रिया करण्यासाठी ज्येष्ठ पुत्रच पाहिजे असा शास्त्रार्थ भटजींनी काढल्यामुळे सर्वजण चिंतेत होते. अशा परिस्थितीत बरोबर दहाव्या दिवशी श्री गोंदवल्यास हजर झाले. त्यांनी वडिलांची उत्तरक्रिया यथासांग पार पाडली व आईचे दुःख हलके केले. पुढे चार महिने गेल्यानंतर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे श्रींना मुली सांगून येऊ लागल्या. कोणते तरी निमित्त सांगून श्रींनी लग्न करण्याचे टाळले. एक दिवस आई त्यांना म्हणाली, "अरे गणू, अजून तुझे लग्नाचे वय आहे, तू पुन्हा लग्न करावेस अशी माझी फार इच्छा आहे, नाही म्हणू नकोस " श्रींनी आईला उत्तर दिले, "मी तुझे ऐकेन पण ते एका अटीवर ! मुलगी मी स्तवः पसंत करीन." आईने लगेच कबुली दिली. गोंदवल्यापासून काही कोसांवर आटपाडी नावाचे गाव आहे, तेथील सखारामपंत देशपांडे या सुखवस्तू गृहस्थांना ५/६ मुलीच होत्या, त्यांपैकी एक जन्मापासून आंधळी होती. या मुलीच्या लग्नाबद्दल सखाराम पंतांना फार काळजी वाटे. श्रींनी पुन्हा लग्न करण्याचे आईजवळ कबूल केल्यानंतर श्री एक दिवस उठले आणि आटपाडीला सखारामपंतांच्या घरी गेले. श्री आलेले पाहून सखारामपंतांना आनंद झाला. त्यांचा आदर करून असे अचानक येण्याचे कारण विचारले. श्री म्हणाले, "तुमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत ना ? आमच्यापैकीच एकाला लग्न करायचे आहे, म्हणून मी मुलगी पहायला आलो आहे " लगेच आपल्या तीन-चार मुलींना आणून श्रींसमोर उभे केले. लगेच श्री म्हणाले "तुमची एक आंधळी मुलगी लग्नाची आहे असे मी ऐकतो, तिला बाहेर आणा." सखारामपंतांनी आपल्या आंधळ्या मुलीला बाहेर आणून बसविले. श्रींनी तिला पाहून ती आपल्याला पसंत आहे असे सांगितले. नंतर श्री म्हणाले, "सखारामपंत, मी स्वतःच लग्न करणार आहे, ही मुलगी मला पूर्ण पसंत आहे, पण मी असा गोसावी. तेव्हा तुम्ही नीट विचार करा आणि मग मला मुलगी द्यायची असेल तर द्या." सखारामपंताचा आनंद गगनात मावेना, त्यांनी ताबडतोब संमती दिली. पुढे घरी आल्यावर आपण लग्न ठखून आल्याचे आईला सांगितले. आईला खूप बरे वाटले, पुढे मुहूर्ताच्या तिथीवर श्री एकटेच आटपाडीला गेले व लग्न करून घरी परत आले. नवीन सुनेला आईला नमस्कार करण्यासाठी आईपुढे आणली व म्हणाले, आई नवीन सून तुझ्याकडे पाहिले. तर ती दोन्ही डोळ्यांनई आंधळी. आई म्हणाली, "तू केव्हा काय करशील याचा भरवसा नाही. बरे आता झाले ते झाले." मुलीचे नाव बदलून सरस्वती ठेवले.