मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । वालखिल्य प्रार्थित । सूर्या विधीनें जें कथिलें चरित । गणेशाचें तें ऐकण्या उत्कंठित । जाहलों आम्हीं तें सांगा ॥१॥
सूर्य तेव्हां त्यास म्हणत । पूर्वीं मी आत्मरुपीं संस्थित । सर्वलोकीं संचार करित । गणेशध्यानीं एकनिष्ठ ॥२॥
योगींद्राचा स्वतः गुरु असत । तेव्हां ब्रह्मदेव त्रैलोक्य रचित । सचराचर कश्यप होत । मुख्य प्रजापती सदृश ॥३॥
आकृष्ण इत्यादी मंत्रानें करित । तयन वर्षे अयुत । ध्याननिष्ठ तो वर देण्या जात । तदनंतर मी तया समीप ॥४॥
त्याच्या आश्रमांत मी जात । मज पाहून तो वंदन करित । भक्तिभावें पूजित । स्तुति करी कर जोडुनी ॥५॥
भक्तिनम्र मान वळवून । वरदात्या माझें करी स्तवन । जगदाधारा तुला नमन । वंदन तुला आत्मरुपा ॥६॥
परमात्म्यासी सूर्यासी । त्रिविधासी त्रिकाळज्ञासी । भेदाभेदविहीनासी । नानाभेद धारका नमन ॥७॥
अनाकार देवासी शाश्वतासी । अमेयशक्तियुक्तासी । कर्माधारासी भानूसी । सर्वकर्ममया त्रिरुपा नमन ॥८॥
अमृतासी ब्रह्मनिष्ठासी । अंतरात्म्यासी अर्धमयासी । रवीसी हरिदश्वासी । आदि मध्यांतहीना नमन ॥९॥
त्यांच्या परी आधारासी । अनंतविभवासी तेजोराशे तुजसी । दीननाथासी सर्वासी । दीनांच्या पतीस माझें नमन ॥१०॥
शत्रुहत्यांसी भक्तपालकासी । भुक्तिमुक्ति प्रदात्यासी । नानाखेळकरासी परेशासी । दिवस्पते पुरुषा नमन ॥११॥
एकासी अद्वितीयासी । मायाधारासी मायिकासी । सूर्या संज्ञापते तुजसी । नमितो रक्षी मज शरणागता ॥१२॥
तूं आत्माकारें सर्वत्र वसत । वेदही तव वर्णनीं मूक होत । तरी कैसी करुं मी स्तुति अज्ञात । केवळ नमितों भक्तिभावें ॥१३॥
परमेशा तुझ्या चरणांबुजावर । माझें मन होवो स्थिर । ऐसी दृढ भक्ति दे हो पुत्र । दिवाकरा तूं माझा ॥१४॥
द्विजांनों ऐसें ऐकून । सूर्य म्हणे मी प्रसन्न । मी तुझा पुत्र होईन । द्वादश आदित्य रुपयुक्ता ॥१५॥
माझी उग्र भकक्ति दृढ होईल । सर्वदा तुझ्या चित्तीं विमल । जें जें विप्रेंद्रा इच्छिशील । तें तें सफल होईल ॥१६॥
केवळ माझें करितां स्मरण । मी प्रकट होईन तत्क्षण । तुझ्या स्तोत्रें मी प्रसन्न । याच्या वाचनें भुक्ति मुक्ति ॥१७॥
ऐसें सांगून कश्यपासी वचन । तत्क्षणीं झालों अन्तर्धान । तोही परम आनंदित होऊन । आपुल्या आश्रमीं वालखिल्यांनो ॥१८॥
कश्यपाची पत्नी अदिती । माझें तप करी भावभक्ती । परम अद्‍भुत तपें माझ्याप्रती । याचना तीच तिनें केली ॥१९॥
म्हणून मी पुत्रभावें जन्मत । कश्यपापासून तिच्या उदरांत । शुभकाळीं ती होत प्रसूत । मला जन्म तिनें दिला ॥२०॥
जातकर्मादिक सारें करित । नंतर मुंजीबंधन योग्य काळांत । वेदाध्ययन दीक्षा देत । मुनिसत्तम मजलागी ॥२१॥
विश्वकर्मा तप आचरित । मुलीसाठी अत्यंत । पुढें संज्ञानामक होत । पुत्री त्याची कर्मरुपा ॥२२॥
ती मज विवाहीं अर्पित । ब्रह्मा करी मज अभिषिक्त । ज्योतिग्रहांच्या राज्यांत । तेणें संतुष्ट मीं झालों ॥२३॥
सदाधार हें त्रैलोक्य असत । सचराचर त्यास करित । यथाकाल वृष्टीनें संतृप्त । कर्मांचा मी फलदाता ॥२४॥
वेद म्हणती मी अंतरात्मा । सर्व जनांचा, जगदात्मा । ऐसा बहुत काळ जाता आत्मा । गर्वयुक्त मज झाला ॥२५॥
निराधार मी एकटा असत । माझ्या आधारें जग वर्तत । कश्यपाचा मी झालों सुत । गणेश आराधना न केली ॥२६॥
असा कांहीं काळ लोटत । तें दारुण विघ्न उत्पन्न होत । वालखिल्य मुनींनो ऐका अघटित । तेव्हां काय जाहलें तें ॥२७॥
माली आणि सुमालिक आचरित । उत्तम तप दैत्य नितान्त । दिव्यवर्ष सहस्त्रपर्यंत । तेणें शिव संतोषला ॥२८॥
त्यांसी तो वर देत । जो जो ते याचित । सूर्यतेजासम विमान मागत । दिव्य विमान त्यांसी लाभलें ॥२९॥
त्या विमानांत बसून । त्यांनीं जिंकिलें त्रिभुवन । त्रिलोकाचें राज्य लाभून । चराचरावरी सत्ता त्यांची ॥३०॥
ऐसा बहुत काळ जात । दैत्य ते सदैव स्पर्धायुक्त । विमानांतून संचार करित । माझ्यासम तेज त्यांचें ॥३१॥
विमानाचें तेज पसरत । संपूर्ण त्रैलोक्य मंडळांत । रात्रीचा लोप त्यानें होत । परम अद्‌भुत ती घटना ॥३२॥
जेव्हां होत मी अस्तंगत । त्या वेळीं दैत्य बाहेर पडत । त्यामुळें दिवसचि भासत । उदयकाळींही ते येती ॥३३॥
ऐसे ते दैत्यपुंगव करित । माझें तेज निरर्थक जगांत । मीं झालो अत्यंत क्षुभित । परी माझें कांहीं न चाले ॥३४॥
वरदानाचें बल अद्‌भुत । म्हणोनि दैत्य झाले उन्मत्त । ऐसें सात दिवस चालत । विस्मित झाले सर्व लोक ॥३५॥
कर्माचा लोप सर्वत्र होत । संभ्रम सर्वांच्या मनांत । तेजदग्ध पृथ्वी होत । तैसेचि तें समस्त जन ॥३६॥
तेव्हां मी अत्यंत क्रोधयुक्त । विमानावरी हल्ला करीत । माझ्या तेजें तें जाळित । दैत्य मूर्छित पडले भूवरी ॥३७॥
ते दोघे शिवासी स्मरत । तेव्हां तो तेथ प्रकटत । क्रोधानें माझे शिर उडवीत । त्रिशूल मारुनी मजवरी ॥३८॥
तत्क्षणीं मी काशींत पडलों । लुळा होऊन नंतर मेलों । जगीं कोणाहीए न दिसलों । नंतर संभ्रम जगीं सर्वत्र ॥३९॥
सर्व जग तेव्हां संभ्रमांत । लोक म्हणती आश्चर्य घडत । सूर्य सांप्रत  कां न उगवत? । ऐसे विचारिती परस्पराशीं ॥४०॥
तें पाहून आश्चर्ययुक्त । महर्षि झाले समस्त । देवही सारे उद्विग्न होत । ब्रह्मा विष्णु प्रमुख तेव्हां ॥४१॥
शंकरा समीप ते जात । नाना यत्नें सांत्वन करित । म्हणती शंकरा हें अघटित । काय केलेंत दैत्यांसाठीं ॥४२॥
सूर्यांचे मस्तक सोडून । जगाचा आधार नष्ट करुन । तमोगुणें अविचार करुन । अकालीं संहार कां करिता? दैत्यांसाठीं ॥४३॥
त्याचें वचन ऐकत । शंकर म्हणती शोकयुक्त । दैवानें हें घडलें विपरीत । निमित्त मात्र मजसी जाणा ॥४४॥
विघ्नराज हें दाखवित । दारुण विघ्न आपणांप्रत । पूर्वीं मी आराधिला भक्तियुक्त । वरदान त्यानें मज दिलें ॥४५॥
जेव्हां जेव्हां स्मरण कराल । तेव्हां तेव्हां पुढयांत पहाल । मजसी, तुमचें दुःख हरेल । माझ्या प्रभावें त्या वेळीं ॥४६॥
म्हणोनि मी आतां स्मरण । करितों गणेशाचें मनन । त्यांसी शरण जाऊन । सूर्यासी जिवंत करीन मीं ॥४७॥
ऐसें बोलून हृदयांत । गणेशाचें ध्यान करित । मानस पूजा करुन याचित । रवीचें पुनर्जीवन ॥४८॥
जगत्‍ जीवनदाता मारिला । पाळिलें माझ्या वचनाला । दैत्यांसाठी परी झाला । आकांत आतां त्रैलोक्यांत ॥४९॥
सूर्यास मी मारिलें असत । तयासी द्यावें जीवन त्वरित । अन्यथा मी देहत्याग करित । गणेशा मज प्रसन्न व्हावें ॥५०॥
ऐसी प्रार्थना ऐकत । तेव्हां गजानन प्रकटत । सूर्यास करी पुन्हा जिवंत । शंभू जाहला प्रसन्न ॥५१॥
कश्यपसुत जीवित । नभोमंडळी झाला उदित । देव ऋषि झाले हर्षित । जयगान गाती गजाननाचें ॥५२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते सूर्यसंजीवदानं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP