खंड ३ - अध्याय २४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । नरनारायण कथा पुढें सांगत । पुरुकुत्साचें दायाद असत । महाबळी अंबरीष एक ख्यात । दुसरा मुचुकुंद नावाचा ॥१॥
अंबरीष राज्य करुन । अंती पुत्रासी राज्य देऊन । सुविपुल तप आचरुन । गणेशसायुज्य लाभला ॥२॥
मुचुकुंद राजर्षि राज्य करित । धर्मयुक्त महातेजयुक्त । शक्रतुल्य पराक्रमें असत । देवांसही आधार त्याचा ॥३॥
एकदा देवदैत्यांचे युद्ध होत । दैत्य देवांसी जिंकत । मुचुकुंदासी तेव्हां शरण जात । देव सर्वही परमादरें ॥४॥
त्यांची प्रार्थना ऐकून । मुचुकुंद गेला धावून । शस्त्रबळें करी हनन । महादैत्यांचें त्या वेळीं ॥५॥
युद्धप्रसंगीं काल बहुत । जाता युगातिक्रमण होत । युगभेद पाहून देवांस म्हणत । आद्य ज्ञान द्या मजप्रतीं ॥६॥
नंतर ते देव परमभावित । मुचुकुंदासी सांगत । आता पर्वतद्रोणींत । निद्रा घ्यावी आपण ॥७॥
नृपा तुज जो उठवील । त्याचें मरण ओढवेल । तेथ तुजला होईल । वासुदेवाचे दर्शन ॥८॥
तो महायोगी नृपात्तमा देईल । ज्ञान श्रेष्ठ तुज विमल । ते ऐकून वाक्य अमल । गंधमादनावरी गेला ॥९॥
तेथ एका द्रोणींत । निजला मुचुकुंद आनंदांत । बहु काळ ऐसा लोटत । विष्णु तें जाहला वसुदेवसुत ॥१०॥
विष्णु साक्षात महायोगी अवतरला । तपानें त्यास आराधिला । महावीर कंसासी मारुन राहिला । मथुरेंत वासुदेव॥११॥
कंसाचा श्वशुर अत्यंत । तेव्हां झाला झाल क्रोधयुक्त । जरासंध नामा तेथ येत । सैन्यासहित युद्धार्थ ॥१२॥
शाल्वकादी नृपांसहित । तेवीस अक्षौहिणी सेनेसहित । आला चालून मथुरेप्रत । कृष्णें त्याचें मर्दन केलें ॥१३॥
संकर्षणासमवेत । श्रीकृष्ण महातेजयुक्त । जेव्हां त्याचा नाश करित । तेव्हां जरासंध माघार घेई ॥१४॥
पळून गेला स्वस्थानांत । सैन्यासह झाला पराजित । सतरा वेळा पुन्हा येत । लढण्या परी यश न मिळालें ॥१५॥
तेव्हां त्यानें यवनाधिपती । दुष्ट कालयवनाची प्रीति । सहाय मागून लढण्या पुढती । आला चालून मथुरेवरीं ॥१६॥
गर्गशापें यादव विनाश ओढवला । यवनराज त्यापरी आला । तें जाणून त्या समयाला । समुद्रात निर्मिली द्वारका ॥१७॥
आपुल्या मायेनें निर्मिली । ऐसी ती नगरी भली । यादवांची तेथ केली । पाठवणी श्रीकृष्णानें ॥१८॥
नंतर यवनराजासमीप येत येत । आपुलें रुप तया दाखवित । वासुदेव पलायन करित । तेव्हां मथुरा नगरींतून ॥१९॥
नारदानें कृष्णाची चिन्हें सांगितली । यवनेंद्रे संधि साधली । कृष्णाची पाठ धरिली । निर्भत्सना करुं लागे ॥२०॥
अरे कृष्णा महात्मा धावसी । यदुवंशाला लांछन लाविसी । तूं जरी काळासम अससी । तरी कां भ्यालास मजलागीं ॥२१॥
तेव्हां कृष्ण पुढे धावत । मागून कालयवन त्वेषयुक्त । मुचुकुंद जेथ झोपला निश्चिंत । त्या गुहेंत कृष्ण प्रवेशला ॥२२॥
तेथ कृष्ण राहिला शांत । परी यवनेंद्र मुचुकुंदा लाथ मारित । म्हणे निर्लज्जा येथ का निद्रित । करी युद्ध माझ्यासवें ॥२३॥
मुचुकुंदाची निद्रा भंगत । यवनाच्या वचनें जाग येत । तो प्रतापवंत नृप उघडित । नयन आपुले क्रोधानें ॥२४॥
त्याच्या नेत्रांतून उद्भवत । अग्नी तो यवनासी जाळित । काळयवन मेला तें पाहत । जनार्दन आनंदानें ॥२५॥
तदनंतर त्या नृपासमीप जात । हर्षनिर्भर त्याचें चित्त । त्यास पाहून प्रणाम करित । मुचुकुंद भक्तिभावें ॥२६॥
योगीश्वरासी कृष्णासी म्हणत । जैसे देवांनी कथिलें असत । तैसेंचि घडलें अकस्मात । आपुली भेत जाहली ॥२७॥
आता ज्ञान मार्ग सांगावा । कृपानिधे मजला बरवा । जेणें मजला बोध व्हावा । प्रार्थना माझी ही विनमर ॥२८॥
हें ऐकून हर्षसमन्वित । परमयोगी कृष्ण सांगत । त्या महाभागासी ज्ञान अद्भुत । अपूर्व गणेश अभेदाचें ॥२९॥
मी महामते गणेश्वर असत । पूर्णत्वें कांहीं भेद नसत । हेंच परम ज्ञान चित्तांत । ठसवावें तूं नृपोत्तमा ॥३०॥
पंचविध चित्ताचा त्याग करुन । त्याचें मोहप्रद ऐश्वर्य सोडून । योगसाहाय्यें आचरुन । गणेशत्व पावशील ॥३१॥
चित्तरुपा महाबुद्धि असत । ती मोहरुपा जगांत । तैसीच सिद्धि या माया वर्तत । तेथ बिंब जें स्थित ॥३२॥
तोच हा गणनाथ असत । हे योगसेवेनें पहावें सतत । बिंबभव भरम त्यागून चित्तांत । चिंतामणीचें दर्शन घे ॥३३॥
गकारात्मक रुपा सिद्धि जाण । णकाररुपा बुद्धि सुजाण । त्यांचा स्वामी गणेश्वर ही खूण । त्यास भजावें महाभागा ॥३४॥
तेणें शांतिलाभ होईल । ऐसें हे गुह्यतम ज्ञान निर्मल । नृपसत्तमा तुज अमल । क्रथिलें परम दुर्लभ जें ॥३५॥
ऐसा उपदेश ऐकत । नंतर कृष्णाची पूजा करित । पुनरपि कृष्ण मथुरेंत । परतून गेला प्रतापी ॥३६॥
तेथ यवनांसी मारित । बलराम समवेत अगणित । जरासंध येता पळून जात । द्वारकेंत तो श्रीकृष्ण ॥३७॥
तदनंतर पृथ्वीतलावर । मुचुकुंद झाला योगपर । जैसा कृष्णें कथिला समग्र । तैसा त्याग आचरिला ॥३८॥
त्या राजर्षीस शांति लाभत । पुढे तो विविध स्थळीं भटकत । गणेशाची भजे अविरत । प्राणत्यागगापर्यंत ॥३९॥
मुचुकुंदाचें हें चरित । जो मर्त्य वाचित अथवा ऐकत । त्यास गणप प्रभु सर्व देत । यात संशय कांहीं नसे ॥४०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते मुचुकुंदचरितं नाम चतुर्विशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP