मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय २९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढे सांगती । पुरुरवा राज्य करी धर्मनीति । मानवांसी भूमंडळीं प्रीती । पाळिलें त्यानें पुत्रासम ॥१॥
मुनिशापें स्वर्गभ्रष्ट होत । उर्वशी कुरुक्षेत्रीं अवतरत । तेथ पुरुरवा संचार करित । तिजवरी मोहित जाहला ॥२॥
ती त्यास तेव्हां म्हणत । जरी माझा संग तूं वांछित । तरी वचन दे मजप्रत । अटी माझ्या तूं पाळशील ॥३॥
माझे प्रिय दोन मेढें सुतसम असत । त्यांचे रक्षण करावें सतत । रतिक्रीडेव्यतिरिक्त । नग्न देह तुझा मज न दाखवी ॥४॥
तुझ्या घरीं तर मी राहीन । केवळ तूप खाऊन जगेन । हें सर्वही मान्य करुन । भूपति तिज घेऊन गेला ॥५॥
उर्वशीपासून त्यास होत । इंद्रासम तेजयुक्त सहा सुत । आयु मायु अमायुख्यात । विश्वायु शतायु स्थायू नाम ॥६॥
ते सर्व चंद्रवंशाचे अलंकार । जयशाली होते सुंदर । इंद्रे पाठविले गंधर्व तदनंतर । पुरुरव्याच्या सदनांत ॥७॥
विश्ववासु पुरोगम जात । उर्वशीस घेण्या परत । मायारुपें रात्रीं प्रवेशत । निद्रागृहांत तयाच्या ॥८॥
उर्वशीचे दोन उरण चोरिती । त्यांसी पकडून नेती । तेव्हा ते करुनरवें ओरडती । तें ऐकलें उर्वशीनें ॥९॥
ती म्हणे पुरुव्याप्रत । कैसा तूं वीर्यहीन असत । माझे पुत्रसम मेढे नेत । कोणी चोर परी स्वस्थ तूं? ॥१०॥
तिचें तें वचन ऐकत । पुरुरवा तें क्रुद्ध होत । रतिसुख सोडून नग्नचि उठत । खड्‌ग घेऊन धावला ॥११॥
तत्क्षणीं देव निर्मित । वीज निद्रागृहीं चमकत । उर्वशी नृपा नग्न पाहत । अन्तर्धान पावली तत्क्षणीं ॥१२॥
मेष घेऊन गंधर्व जात । आकाशमार्ग स्वर्गांत । उर्वशीसहित ते होती उपस्थित । इंद्रसन्निध सत्वर ॥१३॥
इंद्रासी ते प्रणाम करित । इंद्र झाला हर्षयुक्त । राजा पुरुरवा स्वगृहांत । शोध करी उर्वशीचा ॥१४॥
परी ते यशस्विनी न दिसत । तेव्हां तो हाहाकार करित । त्वरित पडला भूपृष्ठावरी मूर्च्छित । सावध होता विलाप करी ॥१५॥
वसुधातलावरी भरमण करित । सैरावैरा मूढचित्त । उर्वशी दर्शनार्थ आर्त । ऐसें एक वर्ष लोटलें ॥१६॥
एकदा कुरुक्षेत्रांत भटकत । पुरुरवा तो दुःखार्त । तेथ उर्वशीस पाहत । दैवयोगें तें आनंदला ॥१७॥
म्हणे मज सोडून कोठें गेलीस । प्रिये मी तुझा असे दास । माझे प्रेम असे सुरस । आता माझा स्वीकार करी ॥१८॥
मी असे भक्तिसंयुक्त । त्याग करुं नको माझा जगांत । या अप्सरासरोवरांत । ऐक माझी ही प्रार्थना ॥१९॥
नंतर त्याच्या संगतींत । एक रात्र तीं राहत । राजास म्हणे शोकयुक्त । ऐका माझें हितवचन ॥२०॥
मी देवांची अप्सरा स्वर्गांत । गंधर्वांच्या अधीन असत । म्हणोनी पितृयज्ञें पितरांप्रत । आदरें तूं तोषवी ॥२१॥
नंतर तुझा निवास स्वर्गांत । होईल परिणामरुप निश्चित । तेव्हां तुझ्या अधीन नित्य सतत । राहीन मीं राजेंद्रा ॥२२॥
शोकाकुल पुरुखा रडत । अति करुण तिच्या पुढयांत । त्यास विव्हल पाहून म्हणत । देवांगना तयाशी ॥२३॥
प्रतिवर्षी राजा एक रात्रीं राहीन । तुझ्या संगतीत प्रसन्न मन । तुज सुखोपभोग देईन । ऐसें सांगून लुप्त झाली ॥२४॥
राजानें उर्वशीचें वचन । मानिलें नंतर केलें हवन । पितृयज्ञ नेमें करुन । पितृगण त्यानें तुष्ट केले ॥२५॥
पितर त्यास वर देत । उर्वशी तुझ्या अधीन सतत । महामते राहील निश्चित । ऐसें आमुचें वरदान ॥२६॥
तुझ्या नामांकित देवांप्रत । हव्य अर्पितील श्राद्धांत । अक्षय पितृलोक तुज निश्चित । होईल वत्सा सर्वदा ॥२७॥
ऐसें बोलून अंतर्धान । भक्तवत्सल पितर प्रसन्न । अल्पकाळानंतर निधन । जाहलें त्या पुरुरव्याचें ॥२८॥
पुण्यबळें तो स्वर्गांत । पुरुरवा नृप जात । तेथ उर्वशीच्या समवेत । भोगूं लागला विषय भोग ॥२९॥
स्वर्गोद्‌भव भोग भोगित । विषयप्रिय तो नृप आसक्त । ऐसा बहु काळ पितृलोकांत । राहिला पुरुरवा नृपति ॥३०॥
तदनंतर एकदा जात । नारदमुनि पितृलोकांत । पुरुरव्यास बोध करित । दयेनें प्रेरित होऊन ॥३१॥
नारद नृपास म्हणत । माहाभागा तूम विषयांत । झालास एवढा आसक्त । आत्मपतन पावशील ॥३२॥
हें तुज का न दिसत । देह हा बंधनागार असत । तेथ निगडबद्ध तूं असत । बंधहीन हो योगप्रभावें ॥३३॥
ऐसे हे भोग नश्वर । भोगावें का तूं वारंवार । पुनः पुन्हा भोगू नही अज्ञानी नर । तृप्त न होती विषयसुखांत ॥३४॥
तूं प्यावें ब्रह्मामृत । स्वानंददायक सतत । तें त्यागून अल्पसुखांत । सक्त होतां अधःपतन तुझें ॥३५॥
चौर्‍यांयशी लक्ष योनींत । प्राणि जन्म घेत फिरत । त्यांत स्त्रीपुत्रादिक लाभत । तयासी यांत संशय नसे ॥३६॥
मनुष्ययोनींत जन्मत । तेव्हां सर्वार्थंवान नर होत । त्या योनींत ज्ञानयुक्त । प्राणी होय विशेषे ॥३७॥
जरी त्यास नरदेह लाभत । परी कर्मं योग जो न साधित । तो नर नानायोनींत । पुनः पुन्हा मानदा फिरेल ॥३८॥
द्वंद्वभावमय दुःख भोगित । तेथ ब्रह्मसुख नसे शाश्वत । तूं असुनी ज्ञान युक्त । ऐसें कां बा करतोस? ॥३९॥
विषयसुखाचा हव्यास । सोडी तयाची तू आस । योगाभ्यासें स्वात्म्यास । तारुन ने तूं नरसत्तमा ॥४०॥
नारदाचा उपदेश ऐकत । तेव्हां पुरुरवा तयास सांगत । आपण योगिया उचित । उपदेश हा मज दिलात ॥४१॥
माझ्या मनीं तो साठवला । परी विषयदोषें चित्ताला । क्षोभ अत्यंत जाहला । खिन्न झालें माझें मन ॥४२॥
तरी महामुने सांगा ज्ञान । जेणें होईल मन पावन । तेव्हां नारद सांगे वचन । गणेशा भज तूं भावबळें ॥४३॥
तरी तुझें होईल क्षेम । एकाक्षर मंत्र उत्तम । गणेशाचा तू जपता निजनेम । विधिपूर्वक भक्तिभावें ॥४४॥
हृदयांत जो बुद्धिप्रदाता । बाह्यतः सिद्धीचा दाता । योगाकार सर्वत्र नेता । ब्रह्मनायक तुज लाभेल ॥४५॥
चित्ताचा त्याग करुन । तूं स्वयं हो चिंतामणि पावन । ऐसें बोलून मधुर वचन । एकाक्षर गणेश मंत्र दिला ॥४६॥
नंतर त्याचा निरोप घेत । नारद स्वच्छंदे परतत । पुरुरवा उर्वंशीचा त्याग करित । ध्यानीं मग्न जाहला ॥४७॥
एकाक्षर गणेश मंत्र जपत । एकाग्र मनें तो अविरत । कालांतरानें तो होत । गाणपत्य थोर जगीं ॥४८॥
तेव्हां पूर्व कर्म आठवत । तें आपुली निंदा करित । त्यायोगे होत दुखित । पुरुरवा तो अत्यंत ॥४९॥
अहो मी अति मूर्खपणें केलें । पूर्वी ऐसें कर्मभोग कामबळें । स्त्रीकामें मोहून चित्त नासलें । भोगांत निमग्न मी झालों ॥५०॥
अस्थिमांसमय देह असत । तो सदा दुर्गंधयुत । मूत्रगृह जें छिद्र त्यांत । त्यांत आसक्त कैसा झालों? ॥५१॥
सर्व अर्थप्रद मनुष्य देह लाभला । परी त्याचा लाभ ना उठविला । नरकप्रद कर्में करुन त्याला । भ्रष्ट केला मी निःसंशय ॥५२॥
नरदेह दुर्लभ लाभून । त्याचा लाभ न घेऊन । माझ्याविना कोण शठ दुर्जन । स्त्रींत आसक्त होईल? ॥५३॥
गणपतीस सोडून विषयांत । सदैव मी झालों रत । धिक्कार असो मजप्रत । रतिसुखकर्दमीं बुडालों ॥५४॥
ऐसा खेदयुक्त नृप करित । स्मरण गणेशाचें चित्तांत । भक्तिभावें तया पूजित । गणेशयोग तें सिद्ध झाला ॥५५॥
अंती योगबळें गणेशलोकीं जात । पुढतीं सायुज्यमुक्ति लाभत । ऐसा हा त्याचा महिमा असत । पापनाशकर महान ॥५६॥
पुरुरव्याचें हें आख्यान । वाचितो वा ऐकतो जो जन । तो नरोत्तम पापमुक्त होऊन । गणेशाचा प्रिय होतो ॥५७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते पुरुरवसश्चरितकथनं नामैकोनत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP