मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । कार्तवीर्याचे शंभर सुत । होते महारथी वीरव्रत । परी पांच यशस्वी त्यांत । धर्मात्मे शूर प्रख्यात ॥१॥
जयध्वज शूरसेन वृषभ असत । पुरुर्जित जयध्वज नामें ख्यात । मुद्‌गल सांगती दक्षाप्रतं । वर्णन त्यांच्या वंशजांचें ॥२॥
जयध्वजाचा तालजंघ सुत । होता बहु प्रतापवंत । त्यास झाले पुत्रशत । ख्यात झाले तालजंघ ऐसे ॥३॥
महाबाहु ज्येष्ठ त्यांच्यात । वीतिहोत्र तो असत । वृषप्रभृती अन्य होत । यादव पुण्यकर्मकर ॥४॥
वृषाचा होता वशंकर । मधुनामें एक पुत्र । त्या मधूचे शतपुत्र । ज्येष्ठ त्यांतील वंशकृत वृष्णि ॥५॥
वीतिहोत्राचा अनंत सुत । दुर्जय त्याचा पुत्र ख्यात । सर्व शास्त्रांत पारंगत । भार्या त्याची गुणवती ॥६॥
ती होती पतिव्रता उदार । दुर्जय प्रेम करी तिजवर । परी एकदा वनांत सुंदर । उर्वशी अप्सरा त्यानें पाहिली ॥७॥
तिच्यावर होऊन आसक्त । आपुल्या पत्नीस न स्मरत । ऐसा बहुत काळ जात । पुढें कण्व त्यासी बोध करी ॥८॥
म्हणोनी तो स्वगृहीं परतत । करी नंतर प्रायश्चित्त । कण्व त्याच्या हस्ते यज्ञ करवित । विनीत तो नृप जाहला ॥९॥
त्याचा पुत्र सुप्रतीक ख्यात । सहस्त्रजिताचे हे कुलसंजात । यदुपुत्राचा वंश सांप्रत । क्रोष्टयाचा ऐक दक्ष प्रजापते ॥१०॥
क्रोष्टाचा वृजिवान्‍ एक सुत । त्याचा च्छवाही ज्ञात । त्याचा कुशेकु पुत्र ख्यात । चित्ररथ सुत त्याचा ॥११॥
चित्ररथाचा पुत्र असत । शशबिंदू नामें प्रख्यात । त्याचे दशलक्ष सहस्त्र सुत । पृथुथवा ज्येष्ठ तयांमध्यें ॥१२॥
उशना नामा त्याचा सुत । धर्म नामें झाला ख्यात । रुचकनामक आत्मज विश्रुत । त्याचे पुत्र पांच होते ॥१३॥
वंशधर त्या माजीं ज्यामध असत । जो होता लोकीं ज्ञात । विदर्भ नामा त्याचा सुत । विदर्भात्मिज कुशक्रय ॥१४॥
लोमपाद त्याचा तृतीय सुत । ब्रभ्रु त्याचा आत्मज ख्यात । त्याचा आत्मज कृतिनाभ असत । उशिक होता कृतिपुत्र ॥१५॥
चेदिनाम उशिक सुत । त्या वेदीचा चैद्य विश्रुत । त्याचा पुत्र महाबाहू ज्ञात । प्रभावें कौशिक नावानें ॥१६॥
त्याचा पुत्र धीमन्त असल । समंतु नामें महाबल । त्याचा पुत्र निःश्वेत प्रबल । त्यास शंभर पुत्र झाले ॥१७॥
दक्षप्रजापते त्या क्रथापासून । कुंति धुष्टी निर्वृति महान । दशर्ह नृप व्योम त्यापासून । व्योमापासून जीमूतक ॥१८॥
त्यानंतर विकृति पुत्र जन्मत । भीमरथ विकृतीचा सुत । भीमरथपुत्र नवरथ ख्यात । त्याचा पुत्र दशरथ ॥१९॥
दशरथाचा पुत्र शकुनी । करंभि जन्मे त्यापासुनी । देवरात करंभिसुत होऊनी । अश्वमेध यज्ञ त्यानें केला ॥२०॥
देवराताचा देवक्षत्र सुत । त्याचा मधु मधूचा कुरु असत । कुरुचे दोन पुत्र ख्यात । सुत्रामा अनु नाम ॥२१॥
अनूचा पुत्र पुरुहोत्र । त्या पुरुहोत्राचा आयु पुत्र । आयूचा सात्त्वत पुत्र । त्यास जाहले सात सुत ॥२२॥
भजमान भजि दिव्य हे तीन । वृष्णि देववृध अंधक महान । महाभोज सातवा बलवान । यादवांत विख्यात जे ॥२३॥
भजमानाचे निम्लोचि सुत । वृष्णी किंकण ख्यात । देववृध पुत्रार्थ आचरत । तप मनोभावें करुनी ॥२४॥
त्याचा बभ्रु नाम सुत । पुण्यश्लोक महायश विख्यात । सर्व शास्त्रार्थ कोविद असत । त्याचे पुत्र श्लोकद्वय ॥२५॥
यश तेज कारणें विराजत । तो राजा त्रैलोक्यांत । महाभोज कुळांत जन्मत । म्हणोनि भोज नामें ज्ञात ॥२६॥
वृष्णीचे पुत्र सुमित्र । युधाजित तैसा अनमित्र । अनमित्राचा शिनिनाम पुत्र । त्याचा सुत निम्न नाम ॥२७॥
सत्राजित प्रसेन विख्यात । निम्नजाचे दोन सुत । सत्राजित सूर्यासी आराधत । स्यमंतक मणि त्यास लाभे ॥२८॥
शिनीचा सत्यसंपन्न आत्मज । सत्यकनामा महातेज । त्याचा पुत्र सात्यकी बलज । जयनामक त्याचा पुत्र ॥२९॥
तदनंतर कुणी धीमन्त । त्याचा युगंधर नाम सुत । अनमित्राचा अन्य सुत । वृष्णिनाम विशारद ॥३०॥
वृष्णीचे श्वफल्क चित्ररथ सुत । श्वफल्क काशिराजाचा जाणत । त्याचा पुत्र अक्रूर ख्यात । साधुसंमत जो होता ॥३१॥
आसंग सारमेयादी ज्ञात । बारा पुत्र त्याचे जगांत । देववानाचा पुत्र उपदेवक असत । चित्ररथाचे सुतद्वय ॥३२॥
पृथु अपृथू नामें ज्ञात । अश्वग्रीव सुबाहू विख्यात । सुधाश्वादी होते सुत । अंधकाचे चार पुत्र ॥३३॥
कुकुर भजमान शुचि तीन । चवथा कंबलबर्ही महान । कुकुरापासून वह्मि जन्मून । त्याचा सुत कपोतरोमा ॥३४॥
त्या कपोतरोमाचा अनुनाम सुत । तो तुंबुरुचा मित्र असत । त्याचा पुत्र अंधक स्मृत । अंधक सुत दुंदुभी ॥३५॥
तो दुंदुभी गोवर्धन पर्वतावर । विपुल तप करी घोर । ब्रह्मदेव देई त्यास वर । मनोवांछित पूर्ण व्हावें ॥३६॥
तुझा वंश अक्षय होईल । कीर्तनादिकांत रमेल । सुरांशी मैत्री जोडतील । कामरुपित्व तव वंशजासी ॥३७॥
त्या दुंदुभीचा अरिद्याते सुत । जो होता तेजयुक्त । अरिद्योताचा पुनर्वसु ख्यात । त्याचा पुत्र आहुक ॥३८॥
आहुकापासून उग्रसेन । देवक तैसा महान । देवकाचे पुत्र पावन । देव उपदेव सुदेव ॥३९॥
देववर्धन नाम बलवान । सात बहिणी त्यांच्या महान । त्या सर्व वसुदेवभार्या होऊन । जगीं ख्यात जाहल्या ॥४०॥
धृतदेवा देवसाश्रित उपदेवा । श्री देवाशांतिदेवा सहदेवा । देवकी सातवी सौम्य स्वभावा । सातही दिल्या वसुदेवासी ॥४१॥
उग्रसेनाचे पुत्र असत । कंस मुख्य महाबळ ज्ञात । भजमानाचा महायश ख्यात । विदूरथ त्याचा सुत असे ॥४२॥
तदनंतर शूर शिनि स्वयंभोज असत । परंपरा ही वंशजांची प्रख्यात । हृदिक देहबाहु शतधनु ज्ञात । कृतवर्मा तदनंतर ॥४३॥
त्यानंतर देवमीढ शूरक । दहा पुत्र वसुदेवादी धर्म उपासक । वसुदेवाचा सुत एक । वासुदेव जगद्‌गुरु ॥४४॥
तो देवकीचा झाला सुत । देवांची प्रार्थना । ऐकून जन्मत । हरीच भूमीवर साक्षात । साधूंचे रक्षण करावया ॥४५॥
वसुदेवापासून लाभत रोहिणी । संकर्षण ज्येष्ठ गुणख्यातजनीं । शेषांश हलायुध वीराग्रणी । उमा देहधारी जाहली ॥४६॥
कौशिकी योगनिद्रा होत । वासुदेवाने योगें यशोदा ज्ञात । जे अन्य वसुदेवाचे ज्येष्ठ सुत । कैसें मारिलें जन्मतां ते ॥४७॥
सुषेण दायि भद्रसेन । महाबळ ऋतु संमर्दन । भद्र तैसा कीर्तिमान । हे वसुदेवसुत कैसे वधिले ॥४८॥
ते मृत्युमुखी पडत । तें रोहिणी जन्म देत । वसुदेवासी प्रख्यात । हलायुध बलभद्रासी ॥४९॥
बलरामा जन्मानंत प्रसवत । देवकी आत्मा अच्युत । कृष्ण जो श्रीवत्सलांछन वक्षयुक्त । अन्य वंशवर्णन पुढिल अध्यायीं ॥५०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीनमौद्‌गले महापुराणें तृतीये खंडे महोदरचरिते हरिवंशवर्णन नामाष्टत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP