मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सूर्य कथा पुढती सांगत । क्रोधसमायुक्त । परशु आदी स्वायुधें घेत । प्रतापवान स्वकरीं तें ॥१॥
द्विजहो मूषकावरी बसत । देवर्षिगणांच्या सहित निघत । मोहासुरा मारण्या जात । त्याच्या नगरीं त्वेषानें ॥२॥
दैत्याधिपांसमवेत । मोहासुर बसला होता सभेंत । अकस्मात नारद तेथ जात । गानपरायण देवर्षि ॥३॥
त्यांस पाहून मोहासुर । विनयें करी नमस्कार । आसन देउनी पूजा उपचार । करुनी नंतर विचारी ॥४॥
म्हणे मुने कांहीं विचित्र । पाहिलें कां आपण परत्र । दैत्याचा प्रश्न ऐकून सुसूत्र । सांगे कथा तयासी ॥५॥
जरी पुण्य पावन कथा असत । दैत्यास ती विषासमान वाटत । नारद म्हणे हर्षयुक्त । मोहासुरा ऐक हितवार्ता ॥६॥
मी जें आश्चर्य पाहिलें । तें सांगेन तुज सगळें । देवांनी असे विनविलें । महोदरासी तुझा वधार्थ ॥७॥
त्यांनी केलें तप । ध्यान पूजन अमाप । तोषविला देव सुरुप । महोदर एकदन्त ॥८॥
तो मूषकारुढ होऊन । तुझ्यावरी येतसे चालून । आता आहे दयायोजन । दूर तुझ्यापासुनी ॥९॥
ऐसे सांगून धरी मौन । दैत्यराज झाला मनीं उद्विग्न । परी उग्र दुःख मनीं ठेवून । नारदास विचारी तो ॥१०॥
नारदमुने ऐका वृत्तान्त । मज मृत्यू नसे जगांत । जो कोणी नामरुप युक्त । ऐशा कोणापासुनी ॥११॥
तेव्हां तो देवरक्षक महोदर । जरी आहे नामरुपधर । तो मज काय करील व्यग्र । मीच त्यास मारीन ॥१२॥
मोहासुराचें तें वचन । ऐकून म्हणे नारद हसून । महायोगी मोहासुरा संबोधून । दैत्याधिपा ऐक हित ॥१३॥
महोदर नसे नर । तैसाची तो ना कोणी असुर । देव अथवा गंधर्व । नसे तो कोणी यक्ष राक्षस ॥१४॥
नामरुपाविहीन वेदांत । ब्रह्म जें असें ख्यात । तो नामरुपाचा निर्माता येत । मोहासुरा तुज मारावया ॥१५॥
त्याचा क्रोध भयंकर । तो सर्वथैव असे अमर । म्हणोनि त्यास शरण सत्वर । जाशील तर वाचशील ॥१६॥
तुज सुख प्राप्त होईल । हें ऐकून दैत्यराज व्याकुल । योगज्ञा नारदा विनवी सबल । भ्रमनाश माझा करावा ॥१७॥
जरी महोदर नामरुपहीन । तरी देहधारी कैसा तो अजून । नामरुप समन्वित म्हणून । वर्णन आपण करिता त्याचें ॥१८॥
नामरुपमय ब्रह्म असत । नामरुप विवर्जित । योगभावें तें सर्वत्र स्थित । यांत संशय कांहीं नसे ॥१९॥
हा आपुला हा पर । ऐसा मोह तेथ ना भ्रमकर । देवदैत्यादी भेदा ना थार । सर्वत्र समस्थित ब्रह्म ॥२०॥
हा महोदर जरी ब्रह्म असत । तरी देवपक्षपाती कां होत? । दैत्याच्या वधाचा करित । विचार कां तो सममती? ॥२१॥
विप्रा हें वाटे विपरीत । आपुलें वचन सांप्रत । संशय माझ्या मनांत । प्रभो तो दूर करावा ॥२२॥
त्या महोदराचें अन्य चेष्टित । सांगावें कैसें त्याचें रुप असत । कैसा स्वभाव पराक्रम वर्तत । तें सर्व सांगा मजला ॥२३॥
तो महोदर कुठें निवसत । त्याचें ब्रह्मरुप कैसें असत । हें सर्व विस्तारें मजप्रत । करुणानिधे ज्ञान द्यावें ॥२४॥
सूर्य कथा सांगें पुढती । महायोगी स्मरे गणपति । भक्तिभावें आपुल्या चित्तीं । नंतर त्यासी सांगतसे ॥२५॥
मोहासुरा महाभागा असत । मती तुझी योगिसंमत । योगरुपाविषयीं ऐकण्या वांछित । म्हणोनि तुज सांगेन सारें ॥२६॥
एकमनें ऐक सांप्रत । ढुंढीचें योगप्रद चरित । नामरुपमय वर्तत । जग सर्व हें चतुर्विध ॥२७॥
नामरुपविहीन जें असत । तें देहिरुप जगाचें हित करित । त्या दोघांच्या संयोगे होत । दैत्येंद्रा बोध सर्व संमत ॥२८॥
तें ब्रह्म पूर्णभावें संस्थित । योगवाचक तें ख्यात । दैत्यपुंगवा जाण तूं सांप्रत । तोच हा आला महोदर ॥२९॥
देहदेहीकृत भोग उदरांत । स्वस्व आनंदपर जो समस्त । सर्वत्र जो विलसत । मुक्तभोग त्यास म्हणती ॥३०॥
जरी उदरभोग भोगित । ब्राह्य परायण जीव जगांत । ते होती मरणयुक्त । स्वल्पकाळेंचि दैत्येंद्रा ॥३१॥
स्वस्व आनंदमय भोग । सर्व भावें भोगितां सुयोग । सर्व ब्रह्में तशी जगें सुभग । निश्चित होती विश्वांत ॥३२॥
विश्वीं भिन्न भोग आत्म्यांत । अमृतात्मक जो असत । एकभावमय भोगयुक्त । ऐसे द्विविध वर्ततीं ॥३३॥
देहांत भिन्न असे जठर । आत्म्यांत जें संमत उदार । एकभावात्मक तें अक्षर । जाण दैत्या योगसेवेनें ॥३४॥
जरी विश्व आत्मा योगविहीन । कां करिती विशेष यत्न । त्याचें सांगतों तुज निदान । नाना रुपधर विश्व असे ॥३५॥
तें विश्व भोगार्थ जन्मत । नानारुपविहीन देही असत । विश्वासाठीं देहीं संजात । ऐसा हा कार्यकारण भाव ॥३६॥
भोगाची जरी इच्छा नसेल । तर द्विविध का होईल । म्हणोनि दैत्येंद्रा प्रबल । भोगयुक्त उभयही ते ॥३७॥
विश्वात्म्याच्या उदरात । गणनायक असे स्थित । म्हणोनि महोदर नामें ख्यात । महात्मा तो जगांत ॥३८॥
द्विविधाचे जठर असत । स्वस्वभोग परत्वें ख्यात । स्वल्पवाचक महामते वर्तत । ऐसें रहस्य जाणावें ॥३९॥
सर्वांच्या उदरांत सदा स्थित । विशेषत्वें तो अविरत । म्हणोनि महोदर ऐसें वर्णित । वेदवादी तयासी ॥४०॥
विश्व त्याचें देहमय ख्यात । आत्मवाचक मस्तक असत । त्यांच्या योगें जगी ज्ञात । गणेश तोची गजानन ॥४१॥
ज्यापासून सकळ उत्पन्न । ज्याच्यांत अंती लय पावून । दैत्यनायका तेची प्रसन्न । गजरुप तूं जाणावें ॥४२॥
विश्वात्मे दोन निर्मित । त्यांपासून ज्ञानार्थ जणांत । तपानें जेव्हां आराधित । देव देहधारी तें जाहला ॥४३॥
त्याचा प्रकृत देह नसत । दैत्यपा सर्वांहून तो भिन्न असत । भुक्तिमुक्तिसाठी घेत । स्वेच्छेनें देहधारणा तो ॥४४॥
स्वसंवेद्य योगानें लाभत । गणनायक स्वसंवेद्य नगरांत । सिद्धि भरांतिप्रदा माया असत । तिच्या प्रभावें भरम जनांसी ॥४५॥
बुद्धि भरांतिधरा ख्यात । चित्तरुपा ती विशेषतेः असत । पंचविध आहे चित्त । त्याचें ऐश्वर्य भरमात्मक ॥४६॥
त्याचा त्याग करित । तेव्हां योगज्ञा शांति लाभत । योगसेवेनें सतत । ऐसे सत्य जाण तूं ॥४७॥
सिद्धिबुद्धींचा स्वामी प्रख्यात । महोदर हा आला असत । महादैत्या शरण जा तयाप्रत । भजन करी तयाचें ॥४८॥
अन्यथा तुजला मारील निश्चित । सुरासुरमय विश्व तो निर्मित । स्वस्वधर्मसमायुक्त । त्यानें खेळतो विघ्नप तो ॥४९॥
जेव्हां देव दैत्यांचा विनाश करिती । तेव्हां हा सिद्धिप्रद दैत्याप्रती । देहधारी होऊनी जगतीं । असुरांसी वरदान देत असे ॥५०॥
परी देवविनाश इच्छिति । ते दैत्य जेव्हां दुष्टमती । तेव्हां हा महोदर जगतीं । पक्षपाती होत देवांचा ॥५१॥
दैत्याचें तो हनन करित । दुष्टवृत्तींचा नाश करिता । धर्मनिष्ठांचा पक्ष घेत । महोदर देव गजानन ॥५२॥
देव संख्यायुत वृद्धिक्षयहीन । दैत्य अपार वृद्धिक्षययुक्त दुर्मन । त्या गोह्गांचेंही करी हनन । अधर्म जेव्हां ते आचरती ॥५३॥
स्वस्वर्धांत जेव्हां रत । होती हे सुरासुर जगांत । तेव्हां गणेश योगरुप निवसत । ब्रह्मनायक जठरांत ॥५४॥
ऐसें हें सर्व कथन केलें । दैत्या गणेशरुप भलें । ब्रह्मभूतापासून उपजलें । जगद्‌ब्रह्य अंशांतून ॥५५॥
म्हणोनि त्यास जा शरण । जरी टाळूं पाहसी मरण । भोग मोक्षप्राप्तीकारण । जीवितासी आशा जरी ॥५६॥
ऐसें बोलून अंतर्धान । नारद मुनि पावले करुणाघन । अविरत करी तो वीणावादन । गणेश गानीं निमग्न जे ॥५७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते मोहासुरज्ञानप्रदानं नाम नवमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP