खंड ३ - अध्याय २८
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । शौनक म्हणती सूताप्रतं । सर्वसिद्धिप्रद आख्यान अद्भुत । तूं सांगितलें आम्हांप्रत । परी तृप्ति न झाली ॥१॥
अमृतपानें जैसा पूर्ण तृप्त । नर जैसा न होत । पुनःपुन्हा तें पान इच्छित । तैसी स्थिति माझी असे ॥२॥
दक्षानें मुद्गलापासून । ऐकिलें जें चरित्र महान । सर्वसंमत प्रसन्न । पुनरपी मज सांगावें ॥३॥
सूत म्हणे ऐका वृत्तान्त । सूर्य वालखिल्य संवाद ऐकत । ब्रह्मदायक तो पुनीत । तेव्हा दक्ष विनवी मुद्गलासी ॥४॥
ऐकलें हेरंबमाहात्म्य ब्रह्मप्रद । आणखी सांगा मोदप्रद । अद्भुत तैसें सुखप्रद । महोदराचें चरित्र मजला ॥५॥
योगिसत्तमा सारखें ऐकिलें । तरी चित्त ना तृप्त झालें । ऐसें हें कथानक भलें । ब्रह्ममय सुधेसम ॥६॥
दक्षाचें वचन ऐकत । हृष्टरोमा मुद्गल जें सांगत । तें ऐकावें स्वस्थचित्त । शौनक महर्षे आपण ॥७॥
युधिष्ठिरें महोदर मानप्रद । आराधिला मोक्षप्रद । विशेषभावें तो सुखद । योगी झाला पांडव ॥८॥
दक्ष म्हणे मुद्गलाप्रत । युधिष्ठिरांचें सांगा चरित । चंद्रवंश उत्पत्तिपासून आद्यंत । पुण्यप्रद तें होईल ॥९॥
अत्रीच्या नेत्रांतून । जन्मला पूर्वी चंद्र कांतिमान । त्यानें सेविला गजानन । दीर्घ तपें करुन ॥१०॥
गणेशवरदान त्यास लाभत । नारायणांचा अधिप तो होत । तैसाचि औषधींचा स्वामी प्रतापयुक्त । विप्रांचा तो पति झाला ॥११॥
पुढें तो विप्रराजा मोहित । गणेश भजनाचा त्याग करीस । जाहला अत्यंत भोगयुक्त । विघ्नपीडित त्या वेळीं ॥१२॥
मोहांत पडून करित । कर्म अत्यंत निन्दित । बृहस्पतीची भार्या तारा असत । यौवनशालिनी रुपसुंदरी ॥१३॥
एकदा ती तारा स्नान करित । उभी होती तीर्थांत । तिज पाहून मोहयुक्त । पकडिलें तिज चंद्रानें ॥१४॥
नको नको ती म्हणत । हाहाकार मुखें करित । परी तें चंद्र न ऐकत । हट्ट करोनी चुंबन घेई ॥१५॥
गुरुपत्नीचें घेऊन चुंबन । एकाकिनी तिज पाहून । घेऊन गेला तिज धरुन । पर्वत गुहांत त्या वेळी ॥१६॥
तुजसवें नाना भोग भोगित । कामबाणांनी पीडित । भोगी तिजला मनसोक्त । बहुत काळ लोटला ॥१७॥
तेव्हां तिच्या गर्भांत । चंद्राचें वीर्य वाढत । तरी तिज तो ना सोडित । मोहमग्न चंद्रमा ॥१८॥
गर्भिणीसवें विषयासक्त । भोग भोगी चंद्र अविरत । तिकडे बृहस्पतीस तो वृत्तान्त । कळतां क्षुभित तो झाला ॥१९॥
चन्द्रे कोठें नेली कान्ता । याचें ज्ञान त्याला होता । तेथ जाउनी प्रार्थितो । जाहला तो चंद्रासी ॥२०॥
नाना यत्नें याचित । बृहस्पति चंद्रा सांगत । माझी तारा दे परत । भार्येवरी हक्क पतीचा असे ॥२१॥
परी तो शठ न ऐकत । तेव्हां गुरु शिवास भजत । अंगिरस शिष्य शंभू होत । क्रोधयुक्त त्या वेळीं ॥२२॥
इंद्रादि सर्व देवांसहित । चंद्रास मारण्या जात । क्रोधें अरुण नय्न बलयुक्त । तेव्हां शशी घाबरला ॥२३॥
होऊनीया भयभीत । चंद्र शुक्रासी शरण जात । त्या आंगिरसाच्या वैर्यासी देत । आश्रय तोही आनंदे ॥२४॥
शुक्राचार्य दैत्यां बोलावित । प्रल्हाद प्रमुखां समस्त । त्यांच्यासवें लढण्या जात । शिवासवें तो महाबळी ॥२५॥
तेव्हां त्यांचें तुमुल युद्ध होत । रोमहर्षक अद्भुत । देवदैत्यांचा विनाश होत । उभय पक्षीं तेधवां ॥२६॥
एक मास युद्ध चालत । अहोरात्र ते लढत । देवगण दैत्यगण त्वेषांत । परी अन्त न लागे ॥२७॥
त्या समयीं बृहस्पति चित्तांत । गणनायकासी स्मरत । आपणांसी मनीं निंदित । निंदा करी चंद्राचीही ॥२८॥
म्हणे मी भ्रातृविरोध केला । त्यानें ज्ञानाचा नाश झाला । गणेश चित्तांतून गेला । म्हणोनि विघ्न सांप्रत आलें ॥२९॥
देवदैत्यांचा नाश होत । मजकारणें हा अद्भुत । काय होनार पुढें रणांत । गजानना तुज नमन असो ॥३०॥
ढुंढे देवा तुज नमन । आता करी मज निर्विघ्न । दयानिधे मूल उच्छेदन । देव दैत्यांचें न व्हावें ॥३१॥
तैशाचि परी चंद्रही चित्तांत । देवा गजाननासी स्मरत । विघ्नहर तेव्हां करीत । त्या दोघांवरी कृपा ॥३२॥
ब्रह्मा सर्व पितामहा येत । तेव्हां त्या युद्ध क्षेत्रांत । देवदानवांचा विनाश होता ज्ञात । दयान्वित त्या वेळीं ॥३३॥
शंकरादी देवांसी । तैसांची प्रल्हादादी दानवांसी । करी विनंती उभयतांसी । युद्ध थांबवा हें दारुण ॥३४॥
सर्वज्ञ विधाता होता उपस्थित । देवदानव युद्ध थांबवित । कर जोडूनी प्रणाम करित । युद्ध थांबलें विनाशकर ॥३५॥
चंद्राचा तिरस्कार करुन । तारा बृहस्पतीस देऊन । म्हणे पतीची भार्या हें धर्मवचन । मूर्खा कैसें विसरलास? ॥३६॥
तेव्हां बृहस्पति आणि चंद्रांत । गर्भविषयीं वाद होत । तो कोणाचा गर्भ असत । चंद्राचा कीं बृहस्पतीचा? ॥३७॥
तारेच्या उदरीं वाढत । गर्भ हें सत्य संशयातीत । परी तो कोणाचा हें निश्चित । देवगणांसी न समजे ॥३८॥
तेव्हां विधि तारेस म्हणत । सूनबाई गर्भ त्यागावा त्वरित । कोणाचा हा अंश तें आम्हांप्रत । महाभागे सांग आतां ॥३९॥
विधीची आज्ञा मानित । तारा गर्भाचा त्याग करित । तेव्हां पुत्र एक तेजयुक्त । जन्मला त्या गर्भांतून ॥४०॥
त्या पुत्रास पाहून विस्मित । देव जाहले समस्त । तारा लाजेनें मान लववित । मौन तिनें राखिलें ॥४१॥
तेव्हां तो पुत्र स्वतः तेथ सांगत । ब्रह्मदेवासी आदरयु क्त । मी चंद्राचाच गर्भ असत । तारेनेंही मग तें मानिलें ॥४२॥
देव त्या पुत्राचें नाम ठेविती । बुध ऐसें प्रसन्नमति । चंद्रासी मग तो पुत्र देती । ब्रह्मदेव तदनंतर ॥४३॥
संग्राम समाप्त होत । सर्व देव दानव स्वगृहीं परतत । ऐसा पूर्वी तारकांसाठी होत । तारकामय संग्राम ॥४४॥
दैत्यदेवांचा विनाश होत । अतीव भयंकर त्या युद्धांत । बुधाचें सांगितलें चरित । संपूर्ण तुजला दक्ष प्रजापते ॥४५॥
बुधाचा पुत्र पुरुरवा होत । महायश तो इलेपासून जन्मत । तोही राजर्षि जगांत । पितृतृप्तिकर झाला ॥४६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते बुधोत्पत्तिवर्णन नामाष्टविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP