खंड ३ - अध्याय ३१
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा सांगती । नहुषासी पाच पुत्र होती । देवांसम ते तरल मति । त्यांची नावें ऐकावी ॥१॥
यभ्याति ययाति संयाति । आयति अश्वक पाचवा जगतीं । ययातीची त्यांत महती । त्याचें चरित्र तुज सांगेन ॥२॥
शुक्राचार्यांचीं सुता । देवयानी त्याची करिता । वृषपर्व राजाची दुहिता । शर्मिष्ठा ही दुसरी पत्नी ॥३॥
यदु तुर्वस नामें ख्यात । देवयानीचें दोन सुत । द्रुह्य अनु पुरु सुत । शर्मिष्ठेसी तीन झाले ॥४॥
ज्येष्ठ पुत्रांचा करुन अतिक्रम । पुरुस राज्याभिषेक उत्तम । कनिष्ठ असुनी पितृवाक्य परम । वंदनीय जया झालें ॥५॥
दक्ष विचारी मुद्गलाप्रत । ययाती कां करीं ऐसें विपरीत । तें सर्व सांगावें मजप्रत । योगींद्रा आपण आदरें ॥६॥
मुद्गल म्हणती दक्षाप्रत । वृषसर्वा दैत्याधिप ख्यात । त्याची पुत्री शर्मिष्ठा असत । महाभागा अतिप्रिय ॥७॥
शुक्राची सुता देवयानी । एकटीच लाडकी असोनी । तीही लाड करोनी । वाढविली होती तयानें ॥८॥
एकदा शर्मिष्ठा सख्यांसहित । खेळत होती राज्यवाटिकेत । हर्षयुक्त अति चित्तांत । तेव्हां देवयानी तेथ आली ॥९॥
देवयानी सहित खेळत । नानाविध क्रिडा कन्यका समस्त । नंतर त्या सर्व श्रमसंयुक्त । स्नानार्थ गेल्या त्वरित । कूपाच्या काठावर ठेवित आपापली वस्त्रें त्या ॥१०॥
विवस्त्र जलक्रीडा करुन । शर्मिष्ठा प्रथम बाहेर येऊन । संभ्रमें नेसली देवयानीचे वसन । नंतर आली देवयानी ॥११॥
आपुलें वस्त्र शर्मिष्ठा नेसली । हें पाहून ती क्रुद्ध झाली । राजपुत्रीस उपरोधें म्हणाली । मर्मभेदक निंदावचन ॥१२॥
मीं ब्राह्मणाची पुत्री असत । कां नेसलीस मम वस्त्रें पुनीत । कुत्री पवित्रवस्तूस स्पर्शत । तैसें महादुष्टें तूं केलें ॥१३॥
ब्राह्मणांचे राजन्य असत । द्वारपाल ऐसें शास्त्र सांगत । ऐश्या राजन्याची सुता अपुनीत । अयोग्य अससी सर्वदा ॥१४॥
ऐश्या नानाविध वाक्यें निंदित । देवयानी शर्मिष्ठेप्रत । तेव्हां होऊन कुपित । प्रति वचन देती झाली ॥१५॥
दुष्टे माझ्या सान्निध्यांत । काय बढाई तूं मारित । राजप्रासाद संसर्गे होत । ब्राह्मण सन्माननीय जगीं ॥१६॥
आमच्या प्रसादें तुज लाभत । अन्न वस्त्रादिक समस्त । माझेंच अन्न खाऊन गर्वित । कावळी स्पर्श करी जणु बळीस ॥१७॥
ऐशी नानाविध वाक्यें करित । निर्भर्त्संना ती नंतर लोटित । एका जलरहित विहिरींत । देवयानीस शार्मिष्ठा ॥१८॥
सख्यांसहित परत जात । होउनी मनीं अति दुःखित । देवयानी त्या कूपांत । अंधारांत राहिली ॥१९॥
दैवयोगें तेथ येत । ययाति नृप मृगयासक्त । देवयानीस कूपांत पाहत । करुणा आली तयासी ॥२०॥
आपुला उजवा हात आधार देऊन । देवयानीस वरती काढून । परतूं लालाग राजा प्रसन्न । देवयानी तें त्यास म्हणें ॥२१॥
देवयानी हर्षसमन्वित । म्हणे नृपा माझा कर करांत । घेतलास आतां वृत्तान्त । सर्व सांगावा आपुला ॥२२॥
तेव्हां महीपाल तिज म्हणत । वरवर्णिनी ऐक वृत्तान्त । नाहुष क्षत्रवंशांत । ख्यात ययाती नामें मीं ॥२३॥
मृगयेसाठीं वनांत । आलों होतीं तें अवचित । जाहलें दर्शन तुझें मजप्रत । आता जाई स्वगृहीं तूं ॥२४॥
मीही जाईन स्वगृहाप्रत । तेव्हां देवयानी म्हणे हर्षित । प्रजानाथा मी शुक्रसुता ख्यात । माझा पति होई तूं ॥२५॥
मी विशेष बुद्धीनें स्वीकारला । माझ्या हातांत कर तुझा भला । तुझ्या विना जगतीं मजला । अन्य कोणी प्रिय न होईल ॥२६॥
तिचें हें वचन ऐकून । ययाति म्हणे मी क्षत्रिय म्हणून । ब्राह्मण कन्या तू तूं शुक्रसुता महान । कैसा वरुं तुजला मीं? ॥२७॥
तेव्हां देवयानी तयास म्हणत । कचाचा शाप मज असत । ब्राह्मण पति जीवनांत । मजला मिळणें असंभव ॥२८॥
म्हणोनी होऊन भयहीन । मज स्वीकारी तूं प्रसन्न । राजसत्तमा मी सांगेन । शुक्राचार्यांसी निश्चय माझा ॥२९॥
बाबांची आज्ञा घेऊन । पत्नी तुझी मी होईन । तिची विनंती मान्य करुन । नृप परतला स्वनगरासी ॥३०॥
ययाती महाभागा परतत । जरी आपुल्या राजधानींत । देवयानी त्याच स्थळीं राहत । तेथ कोणी नर येई ॥३१॥
त्यास विनवी शुक्राचार्यांप्रत । माझा निरोप पोचवा त्वरित । तुमची पुत्री देवयानी सांप्रत । मुनींद्रा कूपाजवळ आहे ॥३२॥
ती घरीं न येणार । महामते हा तिचा निश्चय उग्र । शुक्रासी सांगे तो नर । देवयानीचा हा निरोप ॥३३॥
तो ऐकतां मुनींद्र त्वरित जात । जेथ देवयानी होती वनांत । देवयानी खिन्न रडत । प्रियसुतेचें सांत्वन करी ॥३४॥
सुविह्रल ती सर्व वृत्तान्त । पित्यास सांगे त्वरित । तो ऐकून अत्यंत कुपित । काव्य गेला वृषवर्त्याजवळी ॥३५॥
वनवासार्थ उल्बणा वृत्तियुक्त । आनंदानें निर्णय घेत । दैत्याधिप तें फार दुःखित । ऐकून सारा वृत्तान्त ॥३६॥
शुक्राचार्या जवळीं जात । महामुनीस त्या वंदित । धावत जाऊनी शुक्र सदनाप्रत । वृषपर्वा तो दैत्याधिप ॥३७॥
म्हणे भक्तिसंयुक्त वचन । दैत्यनायक तो विनीतमन । गुरो तुमच्या अधीन । माझें राज्य तसा देह ॥३८॥
मुनिसत्तमा मज सोडून । कोठें जाण्यास उद्यत मन । मींही राज्यादिकांचा त्याग करुन । राहीन तुमच्या सन्निध ॥३९॥
त्याची ती प्रार्थना ऐकून । शुक्र देवयानीस वनीं जाऊन । म्हणे राजकन्येस क्षमा करुन । क्रोधे आपला सोडून देई ॥४०॥
शर्मिष्ठेचा अपराध असत । परी त्यास्तव दैत्यराज क्षमा मागत । आता हट्ट सोडून स्वसदनाप्रत । परतण्या संमति देई तूं ॥४१॥
देवयानी तें ऐकून म्हणत । मनीं क्रोध समन्वित । मी न परत येईन नगरींत । देहत्याग परी करीन ॥४२॥
शोकसंकुल काव्य सुतेप्रत । म्हणे काय इच्छिसी सांग त्वरित । त्याचा उपाय करीन निश्चित । संशय नको तुझ्या मनीं ॥४३॥
जें कांहीं तुझ्या मनी । तें सांग मज देवयानी । जरी पुरवाल म्हणे इच्छा मानुनी । तरी मी प्रसन्न होईन ॥४४॥
शर्मिष्ठा आपुल्या सख्यांसहित । होईल दासी माझी विनीत । हें जरी वृषपर्वा मान्य करित । तरीच मी परत येईन ॥४५॥
ताता, जेथ मज विवाहीं द्याल । तेथ ती माझ्यासवें येईल । सतत माझ्या दास्यांत राहील । ऐसी अट माझी असे ॥४६॥
ही अट मान्य असत । तरीच दैत्याधिपाच्या नगरांत । येईन मी आनंदे परत । जाऊन विचारा तयासी ॥४७॥
पुत्रीवरी स्नेह अत्यंत । म्हणोनी शुक्र तें मान्य करित । दैत्यराजासी सांगत । देवयानीनें जें मागितलें ॥४८॥
दैत्याधिप तें मान्य करित । राज्य रक्षणाचा हेतु मनांत । तेव्हां देवयानी परत जात । प्रसन्न होऊन चित्तांत ॥४९॥
शुक्राचार्य विधानपूर्वक देत । नाहुष ययातीस विवाहांत । आपुली सुता आनंदांत । शर्मिष्ठा अर्पिली तिज दासी ॥५०॥
ययाती देवयानीसहित । परतला राजधानींत । शर्मिष्ठा दासी त्यांसी सेवित । ऐसा समय कांहीं गेला ॥५१॥
तदनंतर शर्मिष्ठा ऋतुयुक्त । एकदा एकटी होती वाटिकेंत । तेथ ययाती राजा येत । दैवयोगें त्या वेळीं ॥५२॥
त्यास शर्मिष्ठा विनयान्वित । म्हणे देवयानीनें वरिलें तुज जगांत । मीही मनोभावें निश्चित । वरिले पति म्हणोनि तुला ॥५३॥
मी तिची दासी असत । तुम्ही स्वामी माझेही जगांत । मी ऋतुयुक्त कामातुर प्रार्थित । भक्तिपूर्वक मज स्वीकारा ॥५४॥
नाहुष ययाती तें मानित । गुप्तपणें तिज भोगिन । देवयानीस तें वृत्त अज्ञात । होतें दक्ष प्रजापते ॥५५॥
परी निसर्ग आपुलें काम करित । शर्मिष्ठा गर्भवती होत । तें पाहून मुनिसुता विचारित । देवयानी तिजप्रती ॥५६॥
कोणाचें वीर्य उदरांत । वाढदिवसी तें सांग मजप्रत । दैत्यराजासी लांछन असत । अथवा दैवयोगें हें घडलें ॥५७॥
शर्मिष्ठा तिज खोटें सांगत । मी न केलें लांछनयुक्त । कर्म कांहीं या जगांत । गुप्तपणें ब्राह्मण एक सेविला ॥५८॥
त्या ब्राह्मणाचें महावीर्य उदरांत । गुप्तभावें मी वाढवित । देवयानीस तें मान्य होत । पुढें पुत्र झाले शर्मिष्ठेस ॥५९॥
ते सर्व देवसम शोभत । राजा शर्मिष्ठेस नित्य भेटत । वाटिकेंत गुप्तपणें भोगित । ऐसे चाललें बहुकाळ ॥६०॥
परी एकदा तदनंतर जात । देवयानी त्या वाटिकेंत । तेथ मुलांसवें ययातीस पाहत । जे त्यास पिता म्हणती ॥६१॥
तें ऐकून अत्यंत क्षुभित । देवयानी उमजली सर्व वृत्तांत । क्रोधवश ती गृहीं परतत । ययाती तिचें सान्त्वन करी ॥६२॥
देवयानी शुक्राकडे जात । राजर्षि भयाकुळ चित्तांत । असमर्थ तिज आणण्या परत । शुक्रास समजली सर्व घटना ॥६३॥
तेव्हां अत्यंत तो कुपित । ययतीस शाप देत । वार्धक्य येईल तुजप्रत । ययाती तत्क्षणी वृद्ध झाला ॥६४॥
उशनस शुक्राप्रत जाऊन । शोकसंतप्त बोले वाचन । श्वशुरा अतृप्त माझें मन । कामभोगार्थ लालसा प्रबळ असे ॥६५॥
तरी वार्धक्यनाशाचा उपाय । सांगा आपण सदय । न स्पर्शीन देवयानीशिवाय । कोणीही स्त्री यापुढें मी ॥६६॥
तें वचन ऐकून संतोषयुक्त । शुक्राचार्य तयास सांगत । महाभागा तुझे सुत । सांप्रत यौवनयुक्त जे असती ॥६७॥
त्यांना हे वार्धक्य देऊन । तू लाभशील पुनरपी यौवन । जो पुत्र स्वीकारील वार्धक्य प्रसन्न । त्या पुत्रा राज्याधिकार देई ॥६८॥
ऐसें करिता दोष न लागेल । ऐसा हा उपाय सबळ । तो मानून मनीं विहवल । देवयानीसह परत गेला ॥६९॥
स्वनगरांत जाऊन । ज्येष्ठ पुत्रांस सांगे वर्तमान । म्हणे माझे वार्धक्य स्वीकरुन । यौवन कोण मज देईल? ॥७०॥
परी मूर्खभावें कोणी न मानित । ज्येष्ठ पुत्र ते भययुक्त । परी कनिष्ठ सुत पुरु स्वीकारित । वृद्धत्व आपुल्या पिंत्याचें ॥७१॥
ययातीस यौवन लाभत । पुरु तत्क्षणीं वृद्ध होत । शुक्र वरदानें न लागत । दोष ययाती नृपासी ॥७२॥
पुरुसी राज्यपद आश्वासित । ययाति अनेक भोग भोगित । मनीं जाहला बहु तृप्त । तीर्थयात्रा बहु केल्या ॥७३॥
महाभाग तो यज्ञ करित । सांगोपांग समस्त । द्रव्य सारें कोशगत । भूषणादीही दान देई ॥७४॥
ब्राह्मणांसी दान देत । राज्यकोश झाला रिक्त । तेव्हां गालव मुनी तेथ येत । ययातीसी भेटतसे ॥७५॥
मातीची भांडी धरांत । ययातीच्या होतीं व्यवहारांत । ऐश्या त्या धनहीन स्थितींत । गालव याचना करी त्यास ॥७६॥
खेदसंयुक्त त्यास म्हणत । म्हणे नृप मी आलों तुजप्रत । गुरुदक्षिणा देण्या अशक्त । तुझें साहाय्य मागतसे ॥७७॥
श्यामकर्ण अश्व सहस्त्र मागत । माझा गुरु मजप्रत । गुरुदक्षिणा न देता तयाप्रत । मज कैसी मुक्ति मिळे? ॥७८॥
तूं श्रेष्ठ सकल नृपांत । म्हणोनि मी हें याचित । गुरुदक्षिणा देण्या जगांत । समर्थ मजला तूं करावें ॥७९॥
ययाती आपुली कन्या देत । माधवी नामक तयाप्रत । त्या मुलीच्या साहाय्यें होत । मनोरथ पूर्ण गालवाचें ॥८०॥
तदनंतर तो राजशार्दूल घेत । यौवन देऊन वार्धक्य परत । पुरुस राज्यपद अर्पित । तुर्वसूस पाठवी दक्षिण पूर्वेला ॥८१॥
यदूस दक्षिण पश्चिम दिशेंत । ययाती करी नियुक्त । वायव्य दिशेचा स्वामी नेमित । द्रुहयु नामक पुत्रासी ॥८२॥
त्या पुत्रांनी ही पृथ्वी समस्त । जिंकून पाळिली धर्मयुत । सर्वत्र सार्वभौमत्व लाभत । पुरु राज्य करीतसे ॥८३॥
तो धर्मयुक्त विनीत । सत्यसंध प्रतापवंत । ययाती जाई वनांत । उत्तम तप करीतसे ॥८४॥
अंतीं जात स्वर्गांत । नानाभोगयुक्त जो लोक असत । तेथ उत्तम भोग भोगित । सर्वांहून विशेष भावें ॥८५॥
माझ्या सम पुण्यभोग भोगित । ऐसा अन्य न कोणी या स्वर्गांत । ऐसा गर्व चित्तांत । उपजला त्या ययातीच्या ॥८६॥
तेव्हां इद्र तया विचारित । कोणतें महत्पुण्य केलें जीवनांत । ते सांगावें मजप्रत । नरशार्दूला मोह तें झाला ॥८७॥
तो इंद्रासी गर्वे सांगत । माझ्या पुण्याची गणना नसत । स्वर्गांत हे जे देव स्थित । त्यांचें पुण्य न अल्पांशही ॥८८॥
माझें पुण्य अतुलनीय असत । माझ्यासम पुण्यकर कोणी नसत । त्याचें तें वचन ऐकून म्हणत । इंद्र तेव्हां ययातीसी ॥८९॥
महाराजा हयांचा पुण्यप्रभाव अज्ञात । तुज म्हणोनी ऐसें म्हणत । तूं मोह समन्वित । आपुली आपण स्तुति करिसी ॥९०॥
स्वप्रशंसा तूं करित । आपुलें पुण्य मुखें उच्चारित । म्हणोनि तें पुण्य समस्त । नष्ट झालें नृपा तुझें ॥९१॥
आतां महीपृष्ठीं पुन्हा जाऊन । करी तपाचें अनुष्ठान । ययाती दुःखयुक्त मन । स्वर्गभ्रष्ट जाहला ॥९२॥
भूपृष्ठीं तो पडत । तें शिबिमुख्य नातू पाहत । मातामहास जाणून अर्पित । आपुलें पुण्य तयासी ॥९३॥
त्यांच्या पुण्ययोगें स्वर्गांत । पुनरपी ययाती जात । देवासम तो विराजत । मोद मानसीं बहु त्याच्या ॥९४॥
तदनंतर नारद योगी तयाप्रत । एकदा म्हणे करुणायुत । पुण्यविनाशकर विघ्न तुजप्रत । कष्ट कारण झालें असें ॥९५॥
विघ्नेशासी जरी भजसी । तरी अंतीं स्वानंदलोकीं जासी । अन्यथा भूलोकपतन तुजसी । निःसंदेह लाभेल ॥९६॥
ययाती नारदासी विनवीत । तेव्हा दशाक्षर गणेशमंत्र देत । नारद त्या ययातीप्रत । जप करी तो भक्तिभावें ॥९७॥
गणेशाचें ध्यान करित । पूर्वंपुण्य जेव्हां झाले समाप्त । राजेंद्र शुक्लगतीनें जात । गणेशलोकीं सत्वर ॥९८॥
गाणपत्य महायश ययातीचें चरित । संक्षेपें तुज कथिले पुनीत । जो श्रवण करील तयाप्रत । इच्छापूर्तीचें साधन ॥९९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते ययातिचरितं नामैकंत्रिंशत्तिमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP