मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्ण कथा पुढे सांगती । युधिष्ठिरासी अतिप्रीती । महाभागा धर्मा ऐक सुमती । पापहारिणी ही कथा ॥१॥
लक्ष्मी नारायणासी विचारित । गणेशज्ञानलालस चित्त । महाशांतिप्रद पुनीत । कथिलें आपण रहस्य ॥२॥
तथापि मजला सुशांति लाभावी । मनाची साम्यता व्हावी । हयास्तव युक्ति सांगावी । शांति उपायज्ञ आपण ॥३॥
तेव्हां नारायण म्हणत । षडक्षर मंत्रानें जो पूजित । त्यासी गणनाथ प्रसन्न होत । शांतियोग साध्य तदा ॥४॥
त्याचें दर्शन ज्यास होत । त्यास शांति लाभे त्वरित । त्याची तूं आराधना करी सतत । योगयुक्त मनानें ॥५॥
ऐसें सांगून तिजला देत । महाविष्णु तो मंत्र पुनीत । षडक्षर गणेशप्रिय विधियुक्त । महालक्ष्मीस त्या समयीं ॥६॥
नंतर ती त्यास नमून । वनांत गेली तपार्थ तत्क्षण । हिमाचलशिखरां बसून । उत्तम तप आरंभिलें ॥७॥
षडक्षर विधानें गजानन । ध्यायिला अंतरीं पावन । मंत्रराजाचा जप प्रसन्न । नासाग्र नयन लावून करी ॥८॥
चित्ताई तैशी इंद्रियांची वृत्ति । गजाननीं स्थिर करिती । निराहार राहून तप भक्ति । लक्ष्मी देवी करीतसे ॥९॥
ऐसीं शतवर्षे जात । लक्ष्मी अस्थिचर्म मात्र राहत । तेव्हा गणेश भक्तिबद्ध येत । तिजसन्निध हया समयीं ॥१०॥
गणाधीश जेव्हां प्रकटत । महादेवी तें त्यास नमित । चतुर्भुज महोदर त्रिनेत्रयुत । परशु आदी हातीं त्याच्या ॥११॥
प्रभू तो मूषकध्वज युक्त । मूषकावरी बैसला असत । सिद्धिबुद्धिसमायुक्त । नाना भूषणांनी पूर्ण ॥१२॥
चिंतामणि त्याच्या गळयांत । ज्योतिष्मंतपती तो विलसत । शेष रुळे नाभिवरती विनत । गजास्य शोभे रक्तवस्त्रधर ॥१३॥
त्या प्रभूस नाना उपाचारें पूजित । पुन्हा पुन्हा त्यास नमत । करसंपुट स्तवित । श्रीमहालक्ष्मी त्या वेळीं ॥१४॥
महोदरा नानालीलाधरा । स्वानंदसंस्थाधारा बाहुधरा । भक्तिगम्या भूषकारुढा उदारा । चतुश्चालका तुज नमन ॥१५॥
मूषकध्वजा अनंत आनना । अनंतदेहा गजानना । अनंत विभवा सदा प्रसन्ना । अनंत हस्तपादा नमन ॥१६॥
चराचरमयासी । चराचरविवर्जितासी । योगशांति प्रदात्यासी । योगस्वरुपासी नमन ॥१७॥
अनादीसी गणेशासी । आदिमध्यंतस्वरुपासी । आदिमध्यांत हीनासी । विघ्नेशासी नमो नमः ॥१८॥
सर्वादिपूज्यासी सर्वपूज्यासे । सर्वांच्या कारणासी । ज्येष्ठराजासी विनायकासी । सर्वनायका तुज नमन ॥१९॥
ढुंढिराजाशी हेरंबासी । भक्तेशासी सृष्टिकर्त्यांसी । सृष्टिहर्त्यांसी पालकासी । गणेशासी नमो नमः ॥२०॥
देवेशासी त्रिहीनासी । कर्मांचे फलदात्यासी । कर्मचालकासी लंबोदरासी । कर्माकर्महीना नमन असो ॥२१॥
योगेशासी योग्यांसी । योगदात्यासी गजाननासी । ब्रह्मभूतासी सदा शांतिधनासी । पुनःपुनः नमन असो ॥२२॥
गणनाथा कैसी करुं स्तुति । तूं सदा प्रभू ब्रह्मपति । म्हणोनि तुज प्रणाम करी भावभक्ति । त्यानं तुष्ट तूं होई ॥२३॥
धन्य मी कृतकृत्य जगांत । सफळ माझा जन्म होत । धन्य माझा जनक नाथ । ज्या मीं पाहिला गजानन ॥२४॥
ऐसी स्तुति भक्तियुत । लक्ष्मी करी आनंदाश्रुयुक्त । परमानंदे ती नाचत । कंठ गद्‌गद जाहला ॥२५॥
गणाधीश तिज म्हणत । वर माग जो मनोवांछित । महालक्ष्मी मीं देईन तुजप्रत । भक्तिभावें संतुष्ट ॥२६॥
तूं जें हें स्तोत्र रचिलें । तें मज प्रिय जाहलें । वाचकां वरदान दिलें । भुक्तिमुक्ति लाभाचें ॥२७॥
पुत्रपौत्रादिक सर्व लाभेल । जो हें भक्तिभावें वाचील । धनधान्यादि सुख मिळेल । तया श्रद्धावंतासी ॥२८॥
गणेशाचें ऐकून वचन । महालक्ष्मी म्हणे तयासी प्रसन्न । हात जोडून विनीत मन । महोदरी जरी कृपा तुझी ॥२९॥
तरी तुझी दृढ भक्ती । नाथा देई मजप्रती । तूं कुलदेव आमुचा निश्चिती । भावयुक्त तुझ भजतें ॥३०॥
माझें मन चंचल । पुत्रमोहानें व्याकुळ । तरी पुत्र होऊन माझा प्रबळ । विघ्न दूर करी माझें ॥३१॥
पुत्रवात्सल्यें तुज भजेन । तुझें लालनपालन करीन । गजवक्रादि युक्ताचें पूजन । सांप्रत देवभावीं करतें ॥३२॥
तो तूंच पुत्ररुपें संसारांत । जरी प्रत्यक्ष प्रकट होत । योगरुप तूं साक्षात । तरी मज योगशांति लाभेल ॥३३॥
तुझी मातापितरें बंधयुक्त । राहतां वेदवचन मिथ्या ठरत । म्हणोनी तूं देशील त्वरित । योगशांति आम्हांसी ॥३४॥
तरी आतां होई माझा सुत । गणनायका तूं साह्यभूत । माझा भक्तिभाव जाणून पुनीत । हाच वर मज द्यावा ॥३५॥
करुणानिधे अन्य न वांछित । दुसरा कांहीं वर मनांत । देवदेवेशा तुज प्रार्थित । ऐसें लक्ष्मी विनवीतसे ॥३६॥
तें ऐकून लक्ष्मीचें वचन । सुभावज्ञ गणेश बोले प्रसन्न । ज्ञानशत्रूचें करीन नाशन । तुझा पुत्र होऊनि मी ॥३७॥
तूं जें जें वांछिसी मनांत । तें तें तुज प्राप्त होईल निश्चित । माझ्या वरदानें जगतांत । योगिवंद्य तूं होशील ॥३८॥
तू केलेंस माझें भजन । म्हणोनि तू मोहहीन । योगस्था शांतियुता होऊन । भृगुपुत्री झालीस ॥३९॥
नंतर द्विजशापें मोहसंयुत । समुद्र तुजसी आराधित । म्हणोनी सागरसुता तूं होत । विष्णूची प्रिय दयिता ॥४०॥
तदनंतर तुज माझी विस्मृती । झाली निःसंशय चित्तीं । विष्णू करी बोध तुजप्रती । योगसेवा केलिस तें ॥४१॥
म्हणोनि मजप्रत आलीस । आतां सर्व आण स्मरणांस । अनघे आदिकाळीं सोल्हास । विष्णूनें मज प्रार्थिलें ॥४२॥
पुत्रार्थ तो याचना करित । त्या समयीं जैसा भावयुत । तैसीच तूं समुद्रजे वांछित । पुत्रत्वें मज या समयीं ॥४३॥
तरी विष्णूसहित तुझें हित । करीन मी निश्चित । ऐसें बोलून गणेश जात । स्वानंदकपुरीं परतून ॥४४॥
गणेशात्मा अंतर्धान पावत । लक्ष्मी तें खिन्न होत । योगबळें पुरातन कथा स्मरत । विस्मित झाली मानसीं ॥४५॥
द्विरदानना ती स्मरत । मूर्ती त्याची तेथ स्थापित । वेदपारग ब्राह्मण म्हणत । वेदमंत्र ज्या वेळीं ॥४६॥
त्या मूर्तीची पूजा करुन । लक्ष्मी स्वस्थानीं जाय परतून । महाविष्णूस करुन वंदन । सांगे सर्व वृत्तान्त तयासी ॥४७॥
तो ऐकून अति हर्षित । महाविष्णू लक्ष्मीस म्हणत । जलधिसुते तूं धन्य जगांत । गजानन प्रत्यक्ष पाहिलास ॥४८॥
आता तो विभू प्रसन्न । सत्य करील वरदान । पुत्रभावें जन्म घेऊन । विघ्नप आपणा तोषवील ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते महालक्ष्मीवरप्रदावर्णन नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP