खंड ३ - अध्याय २७
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । नरनारायण मार्कंडेया सांगती । ऐसे हें राममहात्म्य जगतीं । शक्ति होतसे कुंठित गति । मायामय हें सर्व जाण जगतीं ॥१॥
ब्रह्मदेव ज्यासी निर्मित । विष्णु ज्याचें पालन करित । शिवशंकर संहार करित । मायाविरचित तें ब्रह्मांड ॥२॥
ऐसी ब्रह्मांडे अनंत । सर्वत्र स्थित विश्वांत । महाकारण रुपें धारण करित । ऐसे जाण तूं मानदा ॥३॥
मायात्मक हीं सर्व असतीं । विशेषयुत जाणावीं तीं । भ्रमनाशकर योगें मति । जाण हें रहस्य निःसंशय ॥४॥
मनोवाणीमय भरमरुप असत । मनोवाणी विहीन समस्त । भरमरुप हें सर्व वर्तत । एकाचीच रुपें दोन्ही ॥५॥
धर्म, अर्थ, काम, मोक्ष । ब्रह्मभूतत्वाची साक्ष । भरमकारक मायापक्ष । योग्यांच्या हृदयीं भासतसे ॥६॥
रामाचें पूर्ण चरित । सांगितलें तुज संक्षेपयुत । प्राज्ञा, अजुनी ऐकण्या इच्छित । काय चित्त तुझें सांग ॥७॥
आतां जाऊ निजाश्रमांत । ऐसें नरनारायण सांगत । तेव्हां मार्कंडेय काय म्हणत । ते सांगे सूर्य वालखिल्यांसी ॥८॥
प्रणत होऊन विनवित । नरनारायणांनो पावन केलेंत । अमृतासम कथा सांगितल्यात पुनीत । तरीही तृप्ति ना झाली ॥९॥
म्हणोनी गणेशयोग मज सांगावा । जो जाणतां मज साधावा । रामासम शांतियोगचा आश्रय बरवा । ब्रह्मभूत मी व्हावें ॥१०॥
तेव्हां नरनारायण सांगत । गणेशयोगमार्ग उचित । जो वर्णावया नसत । संपूर्ण शक्ति आम्हांजवळी ॥११॥
चित्त पंचविध असत । तेथ चिंतामणि निवसत । तो पंचवृत्ति निरोधें लाभत । यात नसे संशय ॥१२॥
भरांतिदा सर्व भावांत । सिद्धि सर्वत्र भरांति धारकरुपा असत । बुद्धि ऐसें बुध म्हणती ॥१३॥
त्यांचें बिंब जें उक्त । तोच गणनायक जगांत । स्वभावें खेळतो मोहयुक्त । मुनिसत्तमा हें जाण ॥१४॥
बिंबिभाव सोडून । तूं व्हावेंस गजानन । ‘मी गणेश असे महान’ । हा योगविचार शांतिप्रद ॥१५॥
पंचविध चित्त त्यागून । त्याचें भरमात्मक ऐश्वर्य नंतर सोडून । योगाचा आश्रय घेऊन । गणनाथ तूं होशील ॥१६॥
मनोवाणीमय सर्व असत । गकाराक्षरें व्यक्त । मनोवाणीविहीन वर्तत । ‘ण कारानें अभिव्यक्त ॥१७॥
त्यांचा स्वामी गणेशान असत । ऐसें महामुनें वेद सांगत । त्यास भज तूं अविरत । तेणें शांतिलाभ तुज होईल ॥१८॥
ऐसें सांगून वालखिल्यांनो थांबत । नरनारायण अन्ती म्हणत । त्या गणनायका जाणावें समुचित्त । तेव्हां म्हणे मार्कडेय ॥१९॥
प्रणाम करी मीं प्रतापवंत । धन्य मी आपुल्या दर्शनें जगांत । मोहकरी माया जी शाश्वत । पहाण्या तिज इच्छितसे ॥२०॥
भगवंतानो करितों प्रणाम । महामायेचें घडवावें दर्शन । भानू सांगे वर्तमान । नरनारायणें तें मानिलें ॥२१॥
मार्कंडेया पुढें महामाया पाहशील । चित्त तुझें होईल निर्मल । हें ऐकता पूजी अमल । योगींद्रासीं मार्कंडेय ॥२२॥
नंतर ते गाणपत्य परतत । महर्षि आपुल्या आश्रमाप्रत । पुढें एकदा आश्रमांत । होता मार्कंडेय संस्थित ॥२३॥
त्या नरनारायणांसी ध्यात । महायोग्यांसी मनीं प्रार्थित । मायादर्शनाची लालसा चित्तांत । उत्कट होती तयाच्या ॥२४॥
तेव्हां महानाद तो अकस्मात । ऐकून झाला भयभरांत । मेघगर्जना भयंकर होत । वृष्टि झाली अनिवार ॥२५॥
हत्तीच्या सोंडसेम धारा वर्तत । सर्व जगा करिती मज्जित । सागर जणूं अन्य हेलावत । चराचरा गिळावया ॥२६॥
मासे जलचर अन्य पसरती । मार्कंडेया किंचित् क्षती । पोचता सारे गणनाथा चित्तीं । तेव्हां एक शिशू दिसला ॥२७॥
वटपत्रावरी होता स्थित । अंगुष्ठपर्व मात्र आकार असत । सर्व अर्थप्रद विष्णु प्रकतत । त्या रुपानें त्या समयीं ॥२८॥
त्यास प्रणाम करुन स्तवित । मार्कंडेय महर्षि विनीत । अथर्वशीर्ष जपून करित । संतुष्ट त्या देवासी ॥२९॥
त्या विप्रेन्द्रा देव विचारित । काय इच्छिसी मुने चित्तांत । सांग मी तें देईन निश्चित । वरदान आज मी तुला ॥३०॥
त्यास प्रणाम करित । मार्कंडेय म्हणे प्रसन्न चित्त । तुझी माया मजप्रत । दाखवी विष्णुदेवा अतां ॥३१॥
ती माया जाणून । रुप तिचें पाहून । मी तिजला त्यागीन । ऐसी इच्छा मनीं असे ॥३२॥
तेव्हां विष्णु बालरुपांत । त्याच्या भक्तीनें जित । म्हणे हास्यसंयुक्त । भक्तरक्षणीं जो तत्पर ॥३३॥
बालविष्णु मार्कंडेया सांगत । ज्ञानदृष्टि देतों तुजप्रत । तिनें महामुने सांप्रत । पहा माझी माया तूं ॥३४॥
मार्कंडेय चक्षुसमन्वित । मायेसी तेव्हां पाहत । नाना भाव प्रकाशिका समस्त । आनंदाने त्या वेळीं ॥३५॥
व्याप्यव्यापक रुपें संस्थित । नानागुणभेदें नरांसी मोहवित । कोठे ब्रह्मांडनाश होत । कोठे ब्रह्मांड पालन ॥३६॥
कोठें त्या योगें उत्पत्ती । कोठें शून्यमय स्थिति । अन्यत्र पूर्णरुपासी पुन्हां प्राप्ती । ऐसी माया पाहिली ॥३७॥
ध्यानसंस्थ परब्रह्म पाहत । मुनिसत्तम माया प्रभावयुत । कोठे योगार्थ अत्यंत । लोक परम भाविक ॥३८॥
कोठें भोगार्थ होते लिप्त । कोठें मोक्षार्थ यत्न करित । पुनःपुन्हा निर्माण होत । पुनःपुन्हा मरती ते ॥३९॥
ईश्वर कोणी अनीश्वर कोणी । ऐसें नर पाहिले झणीं । अमृत विषरुप एक त्या क्षणीं । विष होई अमृतदायक ॥४०॥
तेथ सूर्य जाहला शीतळ । ऐसें आश्चर्य त्या वेळ । पाहतसे स्थळी जळ । जळांत स्थळ नाना विकारी ॥४१॥
मुक्त तैसा बद्ध नर । पाहिला भरान्तिपद ईश्वर । म्हणोनी होऊन अनिवार । जगत् आणि जगदात्मा ॥४२॥
तें सर्व पाहून विस्मित । नानाविध भाव समस्त । वर्णन करण्या असंभव असत । शतकोटी वर्षांतही ॥४३॥
ऐसी माया पाहून विस्मित । बालविष्णूसी स्तवित । नाना स्तोत्रें म्हणत । प्रार्थना करीं मनोभावें ॥४४॥
हरी रे माया घे परत । करी मजला पूर्ववत । तेव्हां पुन्हां आश्रमीं नेत । विष्णु त्याला त्याचिया ॥४५॥
डोळे उघडून पाहत । आपणासी स्वआश्रमीं स्थित । स्वप्न पाहिलें अद्भुत । ऐसें वाटलें तयासी ॥४६॥
स्वप्नांत जे प्राणी दिसती । जागे होता ते नष्ट होती । तैशापरी झाली स्थिति । मार्कंडेय मुनीची तें ॥४७॥
नव्हती वृष्टि नव्हता पूर । कुठलें सागरासम तें नीर । तेथ नव्हते भय अनिवार । बालरुप विष्णु न दिसे ॥४८॥
बालरुपधर विष्णूनें निर्मिली । ती माया तेथ सरली । वालखिल्यांनों त्या वेळीं । भरमात्मिका ती तो सोडी ॥४९॥
माया सोडून गणेश भजनांत । सक्त होऊन उत्तम मंत्र जपत । नरनारायणें जो पुनीत । सांगितला होता तयांसी ॥५०॥
त्या विष्णूसी उपासना करित । हेरंबमंत्रयोगें भक्तियुक्त । जो योग पूर्वी साधित । रामानें तो योग साधी ॥५१॥
गाणपत्य स्वभावें होत । शांतियुत पूर्ण तो चित्तांत । अनन्य मनें भजत । गणनायका योगज्ञ तो ॥५२॥
मार्कंडेय अंतीं गणेश देहांत । भक्तीनें सायुज्य लाभत । ऐसे नानाविध विप्र संभवत । गणेशयोगीं निमग्न जे ॥५३॥
हें मृकंडपुत्राचें चरित । जो वाचित किंवा ऐकत । त्यावरी कदापि न पडत । मायाबंधाचा प्रभाव ॥५४॥
महोदर देव हेरंब नामें ख्यात । विद्याधीश पुरांत । भक्तिसिद्धिद तेथ वसत । म्हणोनि त्यासी मीं भजतों ॥५५॥
भानू वालखिल्यांसी ऐसें सांगत । योगभावें समन्वित । त्यासी भजत मी भक्तियुक्त । गणेशयोग सिद्ध करुन ॥५६॥
ऐसें भानूचें ऐकून वचन । वालखिल्य करिती नमन । विविध स्तोत्रें करिती स्तवन । तदा सूर्यनारायणाचें ॥५७॥
मुद्गल सांगती दक्षाप्रत । कथाभाग हा पुनीत । कर जोडुनि वालखिल्या प्रार्थित । पुनरपि ते भानूसी ॥५८॥
सर्वप्रिया देवा केलेंत । कृतकृत्य आम्हां जगतांत । यांत संशय कांहीं नसत । काय देऊं आम्हीं तुला? ॥५९॥
महात्म्या तुज समर्पित । आमुचा देह भक्तिभाव युक्त । त्यानें तुष्ट हो चित्तांत । आमुचा स्वामी गुरुं तूं ॥६०॥
तदनंतर सर्व वालखिल्य पूजित । भानूसी ते प्रणाम करित । ज्ञान लाभून जाती वनांत । तपश्चर्या करण्यासी ॥६१॥
यथायोग सारेम आचरित । जें जें ऐकिलें सूर्योक्त । त्यायोगें ते सर्ववंद्य होत । गणेशयोगी विशेषें ॥६२॥
हेरंबासी अविरत । ध्याती भजती अनन्यचित्त । योगशांति अंति लाभत । ऐसी कथा तयांची ॥६३॥
महोदर कलात्मक हेरंबावतार । कथिला तुजसी सुखकर । दक्षा प्रजापाला सुंदर । नाना आख्यान समन्वित ॥६४॥
ऐसे त्या हेरंबाचे अवतार । महोदरअंशे आश्चर्यकर । परम अद्भुत त्याचें चरित्र । मानदा अशक्त वर्णावया ॥६५॥
कोणीही न शके करण्या वर्णन । मी अल्प केलें कथन । दक्ष प्रजापते तुज जाणून । भक्ति प्रेम प्रेरित ॥६६॥
सूर्य वालखिल्यांचा संवाद । परम अद्भुत ब्रह्मभूयप्रद । धर्मकाम अर्थ मोक्षप्रद । कथिला तुज जैसा मज स्मरला ॥६७॥
हा संवाद सर्वसंपत्प्रद मोह नाशकर । प्रभावयुक्त समग्र । काय ऐकूं इच्छिसी मोक्षकर । अन्य तें आतां सांगावें ॥६८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते सूर्यवालखिल्यसंवादसमाप्तिवर्णन नाम सप्तविंशतितमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP