आरती - आरती चवथी
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
विपुल दयाघन गर्जे तव ह्रदयांबरिं श्रीरेणुके हो ।
पळभर नर - मोराची करुणावाणी ही आयके हो ॥धृ०॥
श्रमलिस खेळुनि नाचुनि गोंधळ घालुनि ब्रह्मांगणीं हो ।
निजलिस कशि दिनांची चिंता सोडुनि अंतः करणीं हो ।
उठ लवकर जगदंबे, त्रैलोक्याची तूं स्वामिणी हो ।
विधि - हरि - हर अज्ञानी, पूर्णज्ञानी तूं शाहणी हो ।
समर्थ परमेश्वरि तूं, अनंत ब्रह्मांडनायके हो ॥१॥
शरणागत मी आलों, परि बहु चुकलों बोलावया हो ।
तुज जननीचें नातें लाज न वाटे लावावया हो ।
परि तूं जननि दिनांची, अनाथांची बहु तुज दया हो ।
ही श्रुति सत्याऽसत्य कीं, अनुभव आलों मी पहावया हो ।
कळेल तैसें करि, परि निज ब्रीद रक्षी मां पालके हो ॥२॥
भवगदें पिडलों भारी, मजला दुःख हें सोसेना हो ।
अझुनी अंबे, तुजला माझी करुणा कां येइ ना हो ।
तारी अथवा मारी, धरिलें चरण मी सोडिना हो ।
कृपा केल्यावांचुनी परतुनि विन्मुख मी जाइ ना हो ।
तुजविण जगिं कोणाचें वद पद प्रार्थावे अंबिके हो ॥३॥
ऐकुनि करुणावाणी ह्रदयीं सप्रेमें द्रवली हो ।
प्रसन्नमुख जगदंबा, अंबा, प्रसन्न जाहली हो ।
अजरामर वर द्याया, प्रकटुनि पुढें उभी राहिली हो ।
भक्तांकित अभिमानी विष्णूदासाची माउली हो ।
जी निज इच्छामात्रें सूत्र हालवी कौतुकें हो ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP