आरती - श्री गुरुदासाची

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( श्री विष्णुकवि महाराज यांचे बंधु संतवर्य श्रीगुरुदास महाराज यांची आरती )
आरती श्री गुरुदासाची । परात्पर गुरुवर चरणाची ॥धृ०॥
महिमा सदगुरुरायाचा । वदाया दुर्बळ ही वाचा ।
परंतु प्रेमोदधिवरती । सुखोर्मी सहजचि सरसरती ।
चाल - दयाब्धे श्रीसदगुरुनाथा । चरणरज शिरीं,
धरुनि बहूपरी । स्तवूं अंतरीं ।
चरण महिमान, सदा ज्याची । उन्मनी वृत्ति प्रेमळाची ॥ आरती० ॥१॥
शुकासारखें ब्रह्मचर्य । निरंतर घडे धर्मकार्य ।
सोवळी परी कर्मवार्ता । पतित पातक्यांस उद्धरता ।
चाल - अहर्निशि अनाथांस दाता । ज्ञानदानास ।
निपुटुनि आस । वासनावास, नुरे तिळमात्र कृपा
ज्याची । परम कोमल अंतराची ॥ आरती० ॥२॥
दृष्टि कोवळी कशी वाणूं । कल्पना काय व्यर्थ ताणूं ।
सुधाघन जणु करुणामूर्ति । वरुषला करुणामृत वरती ।
चाल - सुखानें तनुमनांतरंग । सुटे भवसंग ।
भक्तिचा रंग । चढे मग दंग ।
नावरे वृत्ति अंतराची । पदीं पांगळी होय साची ॥ आरती० ॥३॥
जणूं शोभला शंभुमूर्ति । शांति वैराग्य अंगकांति ।
लाभली जया पादगंगा । मुक्ति झोंबली तया अंगा ।
चाल - शिष्य परिवार वसिष्ठाचा । जणूं सेवेस ।
अहर्निशि वास । शिरीं चरणांस ।
धरुनि पदकमलिं वृत्ति ज्यांची । सदोदित लीन तन्मयाची ॥ आरती० ॥४॥
घडो सर्वदा पादसेवा । हीच मागणी देवदेवा ।
पामरा पादयुग्म दावा । निरंतर तिथें वास द्यावा ।
चाल - वास दूसरी अंतरंगीं । नसे माउले,
काय पाउले । नेणती भले ।
ऐक सोज्वळे हाक याची । रुक्मिणी - तनय अंतराची ॥ आरती० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP