श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग १ ते ३
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१.
निर्गुणींचें वैभव आलें भक्तिमिषें । तें हेम विठ्ठलवेषें ठसावलें ॥१॥
बरविया बरवें पाहतां नित्य नवें । ह्लदयीं ध्यातां निवे त्रिविधताप ॥२॥
चोविसांवेगळे सहस्रां आगळें । निर्गुणा निराळें शुद्धबुद्ध ॥३॥
वेदां मौन पडे श्रुतींसी कां नडे । वर्णितां कुवाडें पुराणांसी ॥४॥
भावाचें आळुक भुललें भक्तिसुखें । दिधलें पुंडलीकें सांधूनियां ॥५॥
नामा ह्मणे आह्मां अनाथां लागुनी । निडारले नयनीं वाट पाहें ॥६॥
२.
निर्विकल्प निराकारू । नि:शून्य निराधारू । निर्गुण अपरंपारु । चिदानंद सांबळें ॥१॥
तया पुंडलिकासाठीं । येऊनि उभें वाळवंटीं । दोन्ही कर ठेवुनि कटीं । प्रसन्न दृष्टि पाहातसे ॥२॥
ह्मणऊनि उठा घ्यारे वाट । ठाका पंढरी वैकुंठ । येर वावगे काय रे कष्ट । ब्रह्मी भेट पंढरीये ॥३॥
मूळप्राम मायापुर । पडिले भूत ग्रामा-चार । ह्मणऊनि कर जघनावर । उभा राहूनि दावितसे ॥४॥
वि-ठ्ठल नाम ह्लदयीं धरा । हाचि उतार पैलपारा । मग नाहीं येरझारा । शंभु कुमार सांगतसे ॥५॥
भेटी चौघे मुरडले । अठरा धांवतां भागले । पंथीं साहि भांडले । ते अद्यापि बुझले नाहीं ॥६॥
जो सहस्त्रा माजी न दिसे । चोविसांत न भासे । दो सहस्र अनारिसे । पाहतां अरे न दिसेचि ॥७॥
लयलक्ष लावूनि समाधि । योगियां होचि उपाधि । उघडा डोळा प्रेमपदीं । रे विठोजी न्याहाळा ॥८॥
येर वाउगि खटपट । ठाका पंढरी वाळुवंट । हरूनि मनुष्यपण दृष्ट । चतुर्भुज करिल ॥९॥
जना ऐहिक पाहारे हित । हें पंढरीचें कुळदैवत । येर वाउगे खेचर भूत । रे संगीत चित्रिंचें ॥१०॥
पूर्वज उद्धरावयाचि चाडु । तरी वेणुनादीं जेवण करा गोडु । कोटि-कुळें उद्धरती तुमच्या सुरवाडु । रे पावाल कैवल्य ॥११॥
धन्य धन्य तो संसारीं । जेणें देखिली पंढरी । जेणें सप्रेम होऊनि महाद्वारीं । लोटांगण घातलें ॥१२॥
केलें चंद्रभागे स्नान । आणि संतचरणीं दर्शन । नामघोषें निवे मन । समाधान जीवासी ॥१३॥
पंढरी हे वैकुंठ भुवन । म्हणऊनि करीं कांरे दरुषन । मग नाहीं आया गमन । रे सुरगण वंदिती ॥१४॥
भुक्ति मुक्तिचा दातारू । तो हा वोळगा सारंगधरू । नामया स्वामीचा दातारू । रुक्मादेवीवरु पंढरीये ॥१५॥
३.
अनिर्वाच्य ब्रह्म निगम ह्मणती शिणले वेवादति अठरा साही ॥१॥
तें हें पुंडलिकें चोहोंटा उभें केलें । भावें भुलविलें पंढरीये ॥२॥
घ्यारे घ्
यारे तह्मी कैवल्याचेम पीक । देतो पुंडलीक सकळ जीवां ॥३॥
उपनिषदांचें मथितार्थ जें साराचें यथार्थ । तो हा पंढरीनाथ प्रगट जगीं ॥४॥
हरिहर विरंचि त्रिमूर्ति हाची । माउली दीनांची लोभा पर ॥५॥
जो श्रवणांचा श्रवण नयनांचा नयन ज्ञानाचा दर्पण दृष्ट होय ॥६॥
आदि मध्यें अंतीं व्यापक सर्वांभूतीं । तो हा झाला व्यक्ति भक्तिभावें ॥७॥
सदा चित्ता आनंदघन परिपूर्ण । कारणें महा कारण प्रभा हेचि ॥८॥
चित्ता चेतविता बुद्धीतें पाळिता । मनादि चाळिता इंद्रियांसी ॥९॥
तो या चराचरीं जीवलग सोइरा । ह्मणोनि अनुसरा पांडुरंगा ॥१०॥
नामा ह्मणे काया वाचा मनें त्याचें । नाम जपा कैचें जन्ममरण ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : January 03, 2015
TOP