श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ६१ ते ६५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


६१.
बांधिलें राहीना वैरलें खाईना । दवडिलें जाईना जाणते हो ॥१॥
तय खुंटा नांदावें सौरसें बांधावें । कशानें करावें वोढाळें हो ॥२॥
तया नेत्र ना पाय तिन्ही एक पाहे । न देखावे ते ठाय देखताहे ॥३॥
नामा म्हणे श्रोता विचारावें ज्ञानीं । केश-वाचे नयनीं उतरला ॥४॥

६२.
ध्यान धारणा नलगे टाळी । विठो पाहावा उघडे डोळीं ॥१॥
विठो समाधीचें सुख । पाहतां हरे तहान भूक ॥२॥
नामा ह्मणे न करीं कांहीं । चित्त रंगलें हरीचें पायीं ॥३॥

६३.
येतियां पुसे जातियां धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥
येंई विठाबाई आई माउलीये । निढळावरी कर ठेऊनि पालवीये ॥२॥
पिवळा पितांबर गगनीं झळकला । गरुडावरी बैसोनी माझ कैवारी आला ॥३॥
डोळ्यांतील बाहुली माझी विठाई झाली । घनानंद मूर्ति माझ्या ध्यानासी आली ॥४॥
विठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जीवेंभावें ओंवाळी ॥५॥

६४.
विठ्ठलेंविण जया न गमे एक घडी । सर्वस्व आवडी विठ्ठालाची ॥१॥
विठ्ठालचि माता विठ्ठालचि पिता । भगिनी आणि भ्राता विठ्ठालचि ॥२॥
विठ्ठालचि क्रिया विठ्ठालचि कर्म । विठ्ठाल सकल धर्म कुळदैवत ॥३॥
गुज गौप्य जीविचें विठ्ठाल सांगावे । विठ्ठालें पुर-वावें कोड त्याचें ॥४॥
सर्वकाळ करणें विठ्ठालाची कथा । विठ्ठाल जडला चित्ता जयाचिया ॥५॥
विठ्ठाल जागृति स्वप्र आणि सुषुप्ति । अखंड वदती विठ्ठाल विठ्ठाल ॥६॥
ऐसें सर्वस्वेसीं विठ्ठाल भजतां । सुख आलें हातां विठ्ठालाचे ॥७॥
नामा ह्मणे त्याचे चरणरज होऊन । जाहलोंसे पावन ह्मणे आतां ॥८॥

६५.
विठ्ठाल विसांवा सकळिकां । विठ्ठाल आधार तिही लोकां । विठ्ठाल नकळे ब्रह्मांदिकां । विठ्ठाल रेखा पंढरीये ॥१॥
विठ्ठाल डोळस सांवळा । विठ्ठाल धरारे मानसीं । विठ्ठाल सोडवील अहर्निशीं । विठ्ठालावीण मुक्ति कैंची । कुंटणी गणिकेसी उद्धरिलें ॥३॥
विठ्ठाल उभा भीमातिरीं । कर ठेवूनि कटावरी । विठ्ठाल भक्ताकाज कैवारी । विठ्ठाल हरी महादोष ॥४॥
विठ्ठाल अनाथ कोंवसा । विठ्ठाल नुपेक्षी भरवंस। विठ्ठालेंविण शून्य दाही दिशा । विठ्ठालविण नाहीं हे अनेक ॥५॥
श्रीविठ्ठल भक्तीरस । श्रीविठ्ठल परम पुरुष । विष्णुदास ह्मणे नामा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP