श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ५६ ते ६०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


५६.
भजूं एका विठोबास । आणिक न करूं अभ्यास ॥१॥
येथें साधन आहे एक । पाहों विठोबाचें मुख ॥२॥
वर्णूं हरीचे पवाडे । काळ लावूं देशधडे ॥३॥
नामा विष्णुदास ह्मणे । ऐसें करूम हरीकीर्तन ॥४॥

५७.
जीवप्राणें एक विठ्ठालची व्हावा । ऐसिया मी भावा रातलिया ॥१॥
आवडे पंढरी आवडे चंद्रभागा । येती यमुनागंगा प्रतिदिनीं ॥२॥
आवडे पद्मतीर्थ आवडे गरुडपार । राउळीं माहेर पांडुरंग ॥३॥
नामा म्हणे अहो विठाईरुक्माई । आणिकांपाशीं नाहीं चित्त माझें ॥४॥

५८.
न पाहें गे माय विठईविण डोळां । सर्वस्वें कंटाळा आणिकांचा ॥१॥
विठोबाविण कांहीं नायकें मीं कानीं । जडली चरणीं चित्तवृत्ती ॥२॥
आणिकांचे मार्गीं न चालोत पाय । जीव वोढे सय पांडुरंग ॥३॥
नामा म्हणे करीं आणिकांची पूजा । न करीं गरुडध्वजा वांचूनियां ॥४॥

५९.
विठ्ठल कानडें बोलूं जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ॥१॥
युगें अठ्ठावीस झालीं । दोघां नाहीं बोला बोली ॥२॥
कर टे-वूनि कटावरी । उभा भिंवरेच्या तिरीं ॥३॥
नामा ह्मणे स्वामि माझा । उभा भक्तांचिया काजा ॥४॥

६०.
मान तोडावया कर शस्त्रांचे । कठिण बहुतांचे उभारिले ॥१॥
तरी न वदें न वदें आन । आन कांहीं या विठोबावांचून ॥२॥
विठोबा परतें दैवत आहे ह्मणाती । ऐसें श्रुती स्मृती जरी बोलती । तरी ते अपशब्द कानीं पडों न द्यावे । पाखांडी म्हणती जरी उगोंचि असावें ॥३॥
ब्रह्मदेवेसी जालिया भेटी । तोहि जरी वदेंल ऐसिया गोष्टी । या विठोबापरतें दैवत म्हणेल सृष्टीं । चळला पोटीं निभ्रांत जाणा ॥४॥
कोटी कोटी ब्रह्मांडे एक एक रोमीं । व्यापू-नियां व्योमीं वर्ततसे ॥५॥
तो हा माझा विठोबा सर्वांघटीं सम । न सांडावें वर्म ह्मणे नामा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP