श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ७१ ते ७५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
७१.
भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥
भलें घालूनियां कोडें । परब्रम्हा दारापुढें ॥२॥
घाव घातला निशाणीं । ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥
जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूंचि तिहीं लोकां ॥४॥
७२.
पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥
भुक्ति मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥
उदार चक्रवर्ती बाप पंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥
७३.
अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया ॥१॥
तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥
तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे ॥३॥
उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी ॥४॥
७४.
जन्म खातां उष्टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥
राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥
देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥
जनी म्हणे देवराज । करी भक्ताचें हो काज ॥४॥
७५.
ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निसग ॥१॥
अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥
जैसी वांझेची संपत्ति । तैसी संसार उत्पत्ति ॥३॥
तेथें कैचि बा धरिसी । ब्रम्हीं पूर्ण जनी दासी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 15, 2015
TOP