श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ४६ ते ५०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
४६.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल निर्मतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला । ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥
४७. माता पिता बंधु भगिनी इष्टमित्र विठ्ठल तूं रे ॥धृ०॥
बापा यावें भेटावें विसांवा माझा गा तूं । माझा कुळाचार माहेर रे जिव्हार विठ्ठल तूं ॥१॥
माझें विद्याधन आयुष्य आरोग्यता विठ्ठल तूं गा । माझें तप व्रत तीर्थ दान पुण्य विठोबा तूं गा ॥२॥
माझा गुरुमंत्र दैवत आगम निगम विठ्ठल तूं गा । भूपति सुरपति ब्रह्म-मूर्ति विठोबा तूं गा ॥३॥
माचा आचार विचार सत्यवाद धीर धर्म विठोबा तूं गा । यश कीर्ति निवृत्ति आतां माझी तृप्ति विठोबा तूं गा ॥४॥
माझे यम नियम प्राणायाम प्रत्याहार विठोबा तूं गा । नामा ह्मणे विठोबा केशव परमात्मा माझा तूं गा ॥५॥
४८.
नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडिया ॥१॥
वेदांसी कानडें श्रुतीसी कानडें । परब्रह्म उघडें पंढरीये ॥२॥
नामा ह्मणे विठो त्रिभुवन बरवें । त्याहूनि बरवें प्रेम तुझें ॥३॥
४९.
बरवेपणें बरवा बाप मदनाचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥१॥
उदारपणें उदार दाता त्रैलोक्याचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥२॥
झुंझार आणि शूर अरी त्या दैत्यांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥३॥
चतुरपणें चतुर बाप ब्रह्मयाचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥४॥
पवित्रपणें पवित्र उद्धार तीर्थांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥५॥
नामा म्हणे आधार सकळां जीवांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥६॥
५०. विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही वाह्या ॥१॥
गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळी भेटे वेळोवेळां केशिराज ॥२॥
ऐसा दयावंत घेत समाचार । लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥
सर्वांलागीं देतो समान दरुशन । उभा तो आपण सम पायीं ॥४॥
नामा ह्मणे तया संतांची आवडी । भेटावया कडाडी उभाची असे ।\५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP