श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ४१ ते ४५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
४१.
चाळक माझें मन पांगुळ पैं झालें । साक्षात्कारें मन हारपोनी गेलें ॥१॥
मन हारपलें करूं आतां काय । पहावया गेलें तंव परतोनी कांही नये ॥२॥
भक्ति ज्ञान वैराग्य नोहे । अवघेंचि आहे अवघें तो आहे ॥३॥
नामा ह्मणे जनाबाई आहे बो कैसा । बाबा उदकीं घट बुडोनी ठेला जैसा ॥४॥
४२.
केशवाच्या नामीं लागलेंसे ध्यान । देखिल्या नयन तदाकार ॥१॥
जया तया ह्मणे माझा चक्रपाणी । जाय लोटांगणीं सर्व भावें ॥२॥
प्रेम बोथरत नामाचेनि छंद्रें । ह्लदय प्रेमानंदें वोसं-डत ॥३॥
धांवूनि येऊनि चरणाजवळीं । बंदी पायधुळी सर्वभावेम ॥४॥
घन:श्याम मूर्ति सुंदर सांवळी । ध्यान ह्लदयकमळीं नित्य राहे ॥५॥
भाग्यवंत नामा भक्तां शिरोमणी । अखंड उन्मनी भोगितसे ॥६॥
४३.
वेणू वाहूनि चित्त दुहिलें । रूप देऊनि मज मनें मोहि यलें ॥१॥
वेधु वेधकू गोपाळ लाघवी । जीवा लवियली आवडी नित्य नवी ॥२॥
दृष्टीपुढें माझें ध्यान ठेवियेलें । वृत्तिसहित मन तेथें माझें गोविलें ॥३॥
शुद्ध शामकमळदळ लोचनु । पावा वाजवि-तसे देहुडा रुणझुणीं ॥४॥
तया प्रभा दिसती दिशा निर्मळ । कृष्ण पाहतां मन झालें व्याकुळ ॥५॥
नामया स्वामीचें अनुपम्य रूपडें । पाहतां मन फिरलें माघारें ॥६॥
४४.
शाममूर्ति डोळस सुंदर सांवळी । तें ध्यान ह्लदय- कमळीं धरूनि ठेला ॥१॥
सकळ स्थिति सुखाचा अनुभव झाला । सकळ विसरला देहभाव ॥२॥
पांगुळलें मन स्वरूपीं गुंतलें । बोलणें खुंटले प्रपंचाचें ॥३॥
सबाह्याभ्यंतरीं स्वरूप कोंदलें । द्वैत निरसिलें चंद्राकारें ॥४॥
निजरूप निर्धारितं नयन सोज्वळ झाले । रोमांच दाटले रवरवीत ॥५॥
नामामृताचा घन वोळला अंबरीं । वर्षाव सहस्र धारीं होत असे ॥६॥
तें क्षीर सेवितां झालें समाधान । चुकलें जन्म-मरण कल्पकोडी ॥७॥
सहज सुखें निवाला भवदु:ख विसरला । विसांवा भेटला पांडुरंग ॥८॥
नामा ह्मणे देवा दृष्टि लागो झणीं । पुंडलिका धर्में करूनि जोडलासी ॥९॥
४५.
जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल । परमात्मा विठठल विठ्ठल ॥१॥
जनक विठ्ठल जननी विठ्ठल । सोयरा विठ्ठल सांगाती ॥२॥
अहिक्य विठ्ठल परत्र विठ्ठल । निरंतर विठ्ठल तारीता ॥३॥
नाम विठ्ठल रूप विठ्ठल । पति पावन विठ्ठल विठ्ठल नामा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP