श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ७६ ते ८०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
७६.
स्मरतांचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥१॥
ऐसा नाहीं न घडे देवा । वांयां कोण करी सेवा ॥२॥
न पुरतां आस । मग कोण पुसे देवास ॥३॥
कोठें चक्रपाणी । तुज आधीं लाही जनी ॥४॥
७७.
बाप रकुमाबाई वर । माझें निजाचें माहेर ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर । जग मुक्तीचें माहेर ॥२॥
तेथें मुक्ति नाहीं म्हणे । जनी न पाहे याचें वदन ॥३॥
७८.
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥१॥
पितांबर माल गांठीं । भाविकांसी घाली मिठी ॥२॥
त्याचे पाय चुरी हातें । कष्टलीस माझे माते ॥३॥
आवडी बोलें त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥
ऐसा ब्रम्हींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥
७९.
देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥
तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥
जनी म्हणे पूर्ण काम । विठ्ठा देवाचा विश्रास ॥३॥
८०.
योगीं शीण झाला । तुजवांचुनी विठ्ठला ॥१॥
योग करितां अष्टांग । तुजविण शुका रोग ॥२॥
बैसला कपाटीं । रंभा लागे त्याच्या पाठीं ॥३॥
तईं त्वांचि सांभाळिला । जेव्हां तुज शरण आला ॥४॥
सांगोनी पुत्रातें । त्वांचि छळिलें कश्यपातें ॥५॥
अमराच्या राया । म्हणे जनी सुखालया ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 15, 2015
TOP