श्रीगुरुचें जो कोणी, जाया सर्व प्रयास, पद रगडी,
पुरुषार्थ सकळ त्याचे होती, पसरुनि तयास पदर, गडी. ॥५१॥
श्रीगुरुचे जो भगवद्गुणसे प्रेमें द्रवोनि गुण गातो,
श्रीचा, सुकीर्तिचा, किंबहुना सन्मुक्तिचाहि कुणगा तो. ॥५२॥
श्रीगुरुच्या भजनसुखें क्षण देहाचा जया पडे विसर,
त्याच्या षडरातींचा हा ! हा ! हा ! हा ! म्हणे, रडे विसर. ॥५३॥
श्रीगुरुवचनासि, जसा चातक मेघोदकासि, आ पसरी,
न करील तद्यशाची त्या श्रीसुरसिंधुचेंहि आप सरी. ॥५४॥
श्रीगुरु भावें वंदुनि जेणें सानंद घातला उजवा,
तीर्थें म्हणती पाहुनि त्या ‘ स्वात्मा, समय पातला, उजवा. ’ ॥५५॥
श्रीगुरुला जे शरण न जाती, त्यांला घडेचि ना सुगती.
पावति नच शोभा ते. भाते - से, धरुनि मद, वृथा फ़ुगती. ॥५६॥
श्रीगुरुगुणहंसां न, प्राकृतगुणगृध्रवायसां, गाल,
तरि धर्म पुसेल तयां; चुकवाया दंड, काय सांगाल ? ॥५७॥
श्रीगुरु पाहे, नुरवुनि तिळभरिही भेद, सारखे दास
प्रणतांच्या शमवि श्रीगुरुचें वच - वेदसार खेदास. ॥५८॥
श्रीगुरुचें यश, जो जन सुमंलिन, मानूनि तोक या, धूर्तें.
गुरुभक्त म्हणुनि तारी कनककशिपुतेंहि तो कयाधूतें. ॥५९॥
श्रीगुरुपदप्रसादें ध्रुवबाळें सुपद जोडिलें अढळ.
इछितपदार्थदानीं कोणाचा हात बा ! असा सढळ ? ॥६०॥
श्रीगुरु वसिष्ठ केला श्रीरामें हें न काय आइकसी ?
तरती, कपिलातें जरि गुरु न करिति, देवहूति आइ कसी ? ॥६१॥
श्रीगुरुवांचुनि वांचुनि विफ़ळ जिणें. यांत बांकडें काय ?
शुक सांगे भागविला कृष्णें, आनोओनि लांकडें, काय. ॥६२॥
श्रीगुरुसांदीपनिची भार्या आर्या वदे, तदाज्ञा ते
बळ -कृष्ण मानिति जसी श्रुतिची आज्ञा तसी तदा ज्ञाते. ॥६३॥
श्रीगुरु ज्यातें तारी संसाराब्धींत, संत तोचि तरे.
श्रीगुरुसि शरण जाणें चित्ता ! हें होय संततोचित रे ! ॥६४॥
श्रीगुरुच्या शाश्वत सुखरूपी चरणींच, जेंवि पंगु, रहा.
चित्ता ! भवविभवातें न भुलें. अत्यल्पकाळ भंगुर हा. ॥६५॥
श्रीगुरु अनिळाsनळ - सा, पापनिकर वाळला जसा पाला.
गुरु दे भवा, जसा खगपतिनखकरवाळ लाज सापाला. ॥६६॥
श्रीगुरुच्या मूर्तिवरुनि जरि ओंवाळूनि सांडिला काय,
तरि ऋण न फ़िटे. तेथें स्तव भलतासाचि मांडिला काय ? ॥६७॥
श्रीगुरुराया ! ठाव्या बाळा धड काय या स्तवनरीते ?
न अव्हेरिलीच गोपी कृष्णें जडकाय यास्तव नरी ती. ॥६८॥
श्रीगुरुराया ! हा या पायाला याचितो करुनि नमनें,
कीं क्षणहि, यासि सोडुनि, जावें विषयस्पृहा धरुनि न मनें. ॥६९॥
श्रीगुरुदेवा ! सेवा घे वात्सल्येंकरूनि अनवरत.
मन वर तव दासाचें हा पावुनि हो जसेंचि अनव रत. ॥७०॥
श्रीगुरुमाते ! न तुझें मन निष्ठुर देवसिंधुसखि ! लेश.
तो त्वप्रसाद म्हणती वेदपुराणें जयासि अखिलेश. ॥७१॥
श्रीगुरुवर्या ! दे तें, मर्यादेतं न शील जें मोडी.
थोडीहि मनें, विष या विषया जाणुनि, धरूं नये गोडी. ॥७२॥
श्रीगुरुराजा ! नसतां तवपदशरणागतीं असुख - लेश,
सादर भजतिल न तुतें, तरि न रहावेचि हे असु खलेश. ॥७३॥
श्रीगुरुनाथा ! गाथा तव सुयशाच्याचि रविसमा गाव्या.
रचितों मींच सकळ गुरु. पर कोणा रचुनि कविस मागाव्या ? ॥७४॥
श्रीगुरुवरा ! वराभयदात्या ! रक्षीच माय चुकलीला.
गातों तुझ्या यथामति मीं प्रेमें, जेंवि गाय शुक, लीला. ॥७५॥